यवतमाळ हा राज्यातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्यांचा जिल्हा असून, पारधी समाजसुद्धा इथे मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. अंधश्रद्धा, गरिबी आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाचे पुनर्वसन करण्यासाठी ‘दीनदयाळ सेवा प्रतिष्ठान’ जिल्ह्यात कार्यरत आहे. पारधी समाज आणि आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या भागात लोकसहभागातून काम करणे, हा साधा व सोपा विषय नव्हता. परंतु, संघाचे तत्कालीन विभाग प्रचारक सुनील देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘दीनदयाळ सेवा प्रतिष्ठान’चे काम सुरू झाले. आज हा सेवा प्रकल्प समाजासाठी आशेचा किरण व सामाजिक क्षेत्रात काम करणार्या संस्थांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशासाठी आणि समाजासाठी काय करतो, असा प्रश्न अनेक वर्षांपासून अनेक अज्ञानी माणसं उपस्थित करत असतात. काहींना संघ समाजासाठी काय करतो किंवा कितीतरी मोठमोठे सेवा प्रकल्प चालवत आहे, हे माहीत असतानासुद्धा जाणीवपूर्वक समाजात संभ्रमनिर्मितीचे काम ते करतात. वास्तविक पाहता, संघाच्या स्वयंसेवकांनी देशाच्या विविध भागांत छोटे तांडे, लहान पाडे आणि दुर्गम भागांत आदिवासी आणि वंचित समाजाच्या उत्थानासाठी हजारो सेवा प्रकल्प उभे केले आहेत. दुर्गम भागातील जनजाती समाज तथा शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबासाठी आशेचा किरण ठरलेला सेवा प्रकल्प म्हणजे यवतमाळमधील ‘दीनदयाळ सेवा प्रतिष्ठान.’ घनदाट जंगल आदिवासी समाजाचे तांडे, पाडे, दुर्गम छोट्या वस्त्या आणि १६ तालुयांची भौगोलिक रचना असलेला विस्तीर्ण असा यवतमाळ जिल्हा आणि हाच जिल्हा महाराष्ट्रातील सर्वांधिक शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. गरिबी, अंधश्रद्धा आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त क्षेत्रामध्ये सामाजिक काम करणे, शेतकर्यांना आपल्या पायावर उभे करणे, म्हणजे साधे-सोपे काम नाही, तर एक मोठे आव्हानच. परंतु, संघाच्या शाखेतील गीतांच्या ओळीप्रमाणे- "भगवंताचे जया लाभले| चिर विजयी वरदान| संघा वाचून कोण स्वीकारील| काळाचे आव्हान॥” उपरोक्त प्रेरणादायी गीताच्या ओळींमध्ये समाजात किंवा देशात जेव्हा कठीण प्रसंग किंवा समस्यांचे आव्हान येते, तेव्हा संघाचे स्वयंसेवक धावून जातात व संकटांचा सामना करतात, याचे वर्णन उपरोक्त गीतामध्ये असून, समाजसेवेचे संस्कारसुद्धा अशा गीतामधून हृदयात कोरले जातात.
शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यात संघाच्या स्वयंसेवकांनी वंचित आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त परिवारात १९९७ साली काम करण्यास सुरुवात केली. तत्कालीन संघाचे विभाग प्रचारक विद्यमान अखिल भारतीय सहसंपर्कप्रमुख सुनील देशपांडे यांनी या कामी पुढाकार घेऊन सेवा प्रतिष्ठानची मुहूर्तमेढ रोवली होती. प्रतिष्ठानच्या माध्यमातून यवतमाळच्या दुर्गम भाग व शेतकरी आत्महत्या कुटुंबात शैक्षणिक, वैद्यकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक स्वावलंबी उपक्रमांच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रम केले जातात. वर्तमानात यवतमाळ जिल्ह्यात १ हजार १०० गावांतील जवळपास ३० हजार कुटुंब ‘दीनदयाळ सेवा प्रतिष्ठान’सोबत जोडले गेले आहेत.
यवतमाळ येथील पारधी समाज, वंचित आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबासाठी काम करणार्या ‘दीनदयाळ सेवा प्रतिष्ठान’ला नुकतीच भेट दिली. महाराष्ट्राच्या लालपरीने यवतमाळकडे निघालो. पहिलेच ओळख असलेल्या सेवा प्रतिष्ठानमध्ये पोहोचलो व प्रत्यक्ष सेवा प्रकल्प पाहण्याचा योग आला.
निळोणा जंगलात सुमारे ३४ एकर जागेवर हा सेवा प्रकल्प उभा आहे. परिसरात शेतीमध्ये हळदीपासून ज्वारीचे पीक ते सेंद्रिय शेती एक वेगळाच आनंद देते. त्याच परिसरात पारधी समाजाच्या मुलांसाठी निवासी शाळा असून स्वच्छ आणि सुंदर असलेली ‘स्वामी विवेकानंद निवासी शाळा’ लहान मुलांचे उज्ज्वल भविष्य घडविणारे मंदिरच. त्याच दिवशी दुपारी यवतमाळच्या दारव्हा रस्त्यावरील ‘चिंतामणी कृषी उत्पन्न बाजार’च्या प्रांगणात ‘अंत्योदय’ विचाराचे प्रणेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती व संस्थेच्या त्रिदशकपूर्तीनिमित्त आदिवासी समाज व शेतकरी बांधवांचा मेळावा रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याने तेथे पोहोचलो. ‘दीनदयाळ सेवा प्रतिष्ठान’च्या परिवाराचा मेळावा नव्हे, एखाद्या कुटुंबाचा कार्यक्रम असावा, असे तेथे वातावरण होते. कुटुंबप्रमुख आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी आले आहेत, अशा पद्धतीचा उत्साह आणि आनंद सगळ्यांच्या चेहर्यावर ओसंडून वाहत होता. शेतकरी मेळाव्यास जवळपास १५ हजार परिवार स्वखर्चाने व सशुल्क नोंदणी करून एकत्र आला होता. यवतमाळमध्ये प्रवेश होत असलेल्या वेगवेगळ्या स्थानावर सर्वांची भोजनव्यवस्थासुद्धा करण्यात आली होती. डॉ. मोहनजी भागवत यांनी आपल्या उद्बोधनात पं. दीनदयाळ यांचे नाव घेण्याचा अधिकार आपण आणि ‘दीनदयाळ सेवा प्रतिष्ठान’ने प्राप्त केला आहे. उपस्थित शेतकरी यांच्या विकास, प्रगतीचा आलेख पाहून तुम्हास मी नमस्कार करीत असल्याचे भाष्य करून कार्यक्रमाची सांगता झाली. महाराष्ट्राचे मंत्री डॉ. अशोक उईके आणि संजय राठोड यांचीसुद्धा यावेळी उपस्थिती होती. संपूर्ण कार्यक्रमाची नीटनेटकी आणि शिस्तबद्ध रचना संस्थांचे अध्यक्ष नरहर देव, सचिव विजयराव कद्रे, मुख्य अधिकारी गजानन परसोडकर यांनी केली होती.
लाभार्थी नव्हे, तर सहप्रवासी मेळावा
‘दीनदयाळ सेवा प्रतिष्ठान’ येथे वंचित, पीडित, आदिवासी बंधू आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त परिवाराचा झालेला मेळावा म्हणजे, लाभार्थी किंवा ‘चलो यवतमाळ’वाला कार्यक्रम नव्हता, तर तेथे आलेले सर्व बंधू स्वखर्चाने आणि सशुल्क नोंदणी करून आलेले सहप्रवासी होते. त्यांमध्ये कोणी लाभार्थी नव्हता किंवा कोणी लाभ देणारासुद्धा नव्हता; तर ‘व्यक्तिनिर्माणामधून राष्ट्रनिर्माण - आसेतू हिमाचल’ ही उदात्त राष्ट्रीय भावना घेऊन सोबत काम करणारे सहप्रवासी होते. कार्यक्रमस्थानी शेतकरी बंधूंपासून नोकरदार आणि तांडे पाड्यातील पारधी समाजापासून उच्चशिक्षित माणसांची उपस्थिती सर्वांचे लक्ष वेधून घेणारी होती. तेथे आलेल्या शेतकरी बंधूंच्या एका डोळ्यात दुष्काळाच्या सावटाचे दुःख, तर दुसर्या डोळ्यात नैसर्गिक शेतीच्या प्रयोगामधून आलेल्या सुबत्तेमुळे आनंदाश्रू तरळत होते. एकीकडे आकाशाकडे डोळे लावून पावसाची वाट पाहणारा, दुष्काळाची चाहूल घेणारा शेतकरी, तर दुसरीकडे किमान मूल्याधारित शेती व सेंद्रिय खताचा वापर करून सदन झालेला शेतकरीसुद्धा तेथे उपस्थित होता.
शेतकरी आत्महत्येला लगाम
महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा असलेल्या यवतमाळमध्ये जवळपास ५०० शेतकर्यांनी आजवर आत्महत्या केल्या आहेत. दुःखाचा डोंगर आणि आपत्ती अशा विदारक परिस्थितीमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या पाठीशी उभे राहून त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचे कठीण कार्य ‘दीनदयाळ सेवा प्रतिष्ठान’ करीत आहे. ‘दीनदयाळ सेवा प्रतिष्ठान’ने ४८७ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना दत्तक घेतले असून, त्यांपैकी ३८३ कुटुंबाचे नैसर्गिक शेती आणि शेतीआधारित जोडव्यवसाय माध्यमातून त्यांचे यशस्वी पुनर्वसनसुद्धा झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब लघुउद्योग, शेळीपालन, दुग्धव्यवसाय आणि इतर उद्योगांद्वारे अनेक कुटुंब आर्थिक विवंचनेतून मुक्त झाली असून, तेथे आज सुबत्ता नांदत आहे. हवामानबदलाच्या समस्येमुळे कमी खर्चाच्या शेतीसाठी नैसर्गिक तथा सेंद्रिय शेतीचा प्रसारसुद्धा सेवा प्रतिष्ठान करते. त्याचा परिणामसुद्धा जिल्ह्यात जाणवत आहे. जिल्ह्यातील जवळपास ३८५ गावांत ११ हजार ५०० पेक्षा अधिक शेतकर्यांनी २५ हजार ५०० एकर जमिनीवर नैसर्गिक शेतीचा पर्याय स्वीकारला आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील ‘शेतकरी आत्महत्या’ विषयाला फार मोठा लगाम लागला आहे.
महिला सन्मान व सक्षमीकरणसाठी भाऊबीज उत्सव
समाजातील एखाद्या शेतकर्याने आत्महत्या केल्यास त्याचे संपूर्ण कुटुंब उघडे पडते. अनेक वेळा नातेवाईकसुद्धा दुरूनच नमस्कार करून पाठ फिरवतात. तेव्हा आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांची अवस्था फार बिकट होऊन जाते. त्यामुळे ‘दीनदयाळ सेवा प्रतिष्ठान’ने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांचे सक्षमीकरण, उपजीविका विकास तथा सामाजिक सन्मान, सामाजिक आधार देण्यासाठी कार्य करीत आहे. शेतकरी कुटुंबासोबत नियमित संपर्क ठेवण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. त्यांपैकी एक उपक्रम म्हणजे, ‘भाऊबीज उत्सव.’ दिवाळीच्या काळात ‘भाऊबीज स्नेह मेळावा’ हा उत्सव शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबासोबत साजरा केला जात असतो. कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, शैक्षणिक साहित्य आणि उच्चशिक्षणासाठी मार्गदर्शनसुद्धा केले जाते. अशा विविध उपक्रमांमधून शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांमध्ये आत्मविश्वास तथा महिला सन्मान आणि सक्षमीकरणासाठी उपक्रम राबविले जातात.
यवतमाळ येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकाच्या पुढाकाराने १९९७ साली लहानसा सेवा प्रकल्प सुरू झाला होता. शासकीय मदत न घेता, लोकसहभागामधून सुरू झालेला ‘दीनदयाळ सेवा प्रतिष्ठान’ प्रकल्प आज एका मोठ्या उंचीवर येऊन पोहोचला आहे. वंचित, पीडित, पारधी समाजासाठी आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांसाठी ‘दीनदयाळ सेवा प्रतिष्ठान’ आशेचा किरण ठरलेला असून, इतर सेवा प्रकल्पांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
अशोक राणे
९४२३६५८३८५