मुंबई (Ban on Cow Slaughter): कथावाचक संत मोरारी बापू यांनी गोहत्याविरोधी कायदा करण्याची मागणी केली आहे. केंद्रीय गृहमंत्री म्हणून गुलजारीलाल नंदा कार्यरत असताना गोहत्याविरोधी कायद्याच्या मागणीसाठी संसदेबाहेर आंदोलन करणाऱ्या संतांवर गोळीबार करण्यात आला होता, असे मोरारी बापू यांनी सांगितले. गुलजारीलाल नंदा आपल्या खिडकीतून हे दृश्य पाहत राहिले होते, असेही ते म्हणाले. कोणाचेही नाव न घेता, आज इच्छाशक्ती दाखवली तर गोहत्याविरोधी कायदा करण्याचे ते अपूर्ण राहिलेले कार्य पूर्ण करता येऊ शकते, असे त्यांनी सूचित केले. भारत स्वस्तिक यात्रेदरम्यान कर्नाटकातील हंपी येथे मंगळवारी मानसकथेचे वाचन करताना मोरारी बापू यांनी हे विचार मांडले.
गायीचे चार आंचळ केवळ दूध देण्यासाठी नाहीत, असे सांगताना मोरारी बापू म्हणाले की, ते धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थांचे प्रतीक आहेत. ज्या प्रकारे अंश म्हणजे जीवाच्या अस्तित्वावरून अंशी अर्थात परमात्म्याच्या अस्तित्वाचा पुरावा मिळतो, त्याचप्रमाणे गोमातेच्या चार आंचळांकडे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांच्या अस्तित्वाचे प्रतीक म्हणून पाहिले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. (Ban on Cow Slaughter)
हंपीच्या भूमीला ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व असल्याचे मोरारी बापू यांनी सांगितले. भगवान हनुमान चारही युगांमध्ये अस्तित्वात होते, अशी मान्यता असल्याने हंपी प्रदेशाचा संबंधही चारही युगांशी जोडता येतो, असे ते म्हणाले. ही भूमी भगवान विरुपाक्ष आणि माता पार्वतीचे पंपा स्वरूप यांच्याशीही संबंधित आहे. हंपीची भूमी माता अंजनी यांच्या तपोभूमीशी, माता शबरी यांच्या अद्भुत आध्यात्मिक प्रेमाशी, तुंगभद्रा नदीशी तसेच माता स्वयंप्रभा आणि माता भुवनेश्वरी यांच्याशी संबंधित आहे. याशिवाय, माता सीतेच्या शोधाशीही या प्रदेशाचे नाते जोडलेले आहे. प्रभू रामांनी सीतेचा शोध याच प्रदेशातून सुरू केला होता, असे मोरारी बापू यांनी सांगितले. (Ban on Cow Slaughter)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक