मुंबई (AVS Raju) : देशाच्या पायाभूत सुविधा क्षेत्रावर तसेच समाजावर अमिट ठसा उमटविणारे एनसीसी लिमिटेडचे संस्थापक आणि कंपनीचे मानद अध्यक्ष पद्मश्री डॉ. अल्लुरी वेंकट सत्यनारायण राजू (ए. व्ही. एस. राजू) यांचे मंगळवार, दि. १३ ऑक्टोबर रोजी हैदराबादमधील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ८९ वर्ष होते. दिग्गज उद्योगपती असण्याबरोबरच ते दानशूर व्यक्तिमत्त्व आणि कवी म्हणूनही प्रसिद्ध होते.
राजू यांचा जन्म १८ एप्रिल १९३७ रोजी डॉ. बी. आर. आंबेडकर कोनसीमा जिल्ह्यातील (तत्कालीन पूर्व गोदावरी जिल्हा) सखिनेटिपल्ली मंडलातील अंतर्वेदिपालेम येथे झाला. त्यांनी १९५६ मध्ये व्यवसायाला सुरुवात केली. कठोर परिश्रम, दृढनिश्चय आणि तत्त्वनिष्ठेच्या बळावर त्यांनी आपले व्यावसायिक साम्राज्य उभे केल्याचे त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले. त्यांनी १९७८ मध्ये नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनी (एनसीसी) लिमिटेडची स्थापना केली. ही संस्था १९९० मध्ये पब्लिक लिमिटेड कंपनी झाली. पुढे देशातील शेअर बाजारांमध्ये सूचीबद्ध असलेल्या अग्रगण्य बांधकाम कंपन्यांपैकी एक म्हणून ती नावारूपाला आली. इमारत बांधकाम, वाहतूक, जलसंपदा, पर्यावरण, सिंचन प्रकल्प, वीज वितरण, खाणकाम आणि रेल्वे अशा विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या या समूहात सुमारे १३,००० कर्मचारी आहेत. भागधारकांसाठी दीर्घकालीन मूल्य निर्माण करणे हा ए. व्ही. एस. राजू यांचा दृष्टिकोन असल्याचे कंपनीने नमूद केले.(AVS Raju)
उद्योगक्षेत्र आणि समाजासाठी केलेल्या सेवांची दखल घेऊन भारत सरकारने २०१० मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, हैदराबाद मॅनेजमेंट असोसिएशन, दिल्ली तेलुगू अकादमी यांसारख्या संस्थांकडूनही त्यांना जीवनगौरव पुरस्कार मिळाले. आचार्य नागार्जुन विद्यापीठाने त्यांना मानद डॉक्टरेट प्रदान केली.(AVS Raju)
ए. व्ही. एस. राजू यांनी विविध विषयांवर २५,००० हून अधिक कविता लिहिल्या. सत्यसाईबाबांवर अपार श्रद्धा असलेल्या राजू यांनी पुट्टपर्तीच्या सत्यसाईबाबांना समर्पित ४२ खंडांमध्ये २४,००० हून अधिक पद्यरचना केल्या. सर्वाधिक कवितांचा समावेश असलेल्या एकत्रित काव्यसंग्रहासाठी २००८ मध्ये त्यांच्या नावाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली. बाबांवर लिहिलेल्या कवितांसाठी सलग नऊ वर्षे त्यांना लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्येही स्थान मिळाले. लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी एनसीसी फाउंडेशनतर्फे शिक्षण, आरोग्यसेवा, कौशल्यविकास, ग्रामीण विकास आणि पर्यावरण संवर्धनाशी संबंधित उपक्रम राबविले जातात.(AVS Raju)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक