मुंबई (Ashutosh Ranka Sourav Das) : दिल्लीतील जंतर-मंतर येथे मंगळवारी झालेल्या आंदोलनाप्रकरणी कॉकरोच जनता पार्टीचे नेते आशुतोष रांका आणि सौरव दास यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दोन्ही नेते मंगळवारी जंतर-मंतर येथे आंदोलन करण्यासाठी पोहोचले होते. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. दिल्लीतील विशेष कार्यकारी दंडाधिकारी न्यायालयाने सीजेपीचे सौरव दास आणि आशुतोष रांका यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यांची तिहार तुरुंगात रवानगी करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.
या दोन्ही नेत्यांनी यापूर्वी निश्चित केलेल्या जामीन हमीपत्रातील (बेल बॉन्ड) अटींचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. दरम्यान, याच प्रकरणातील तिसरे नेते अजिंक्य शिंदे यांना न्यायालयाने दिलासा दिला. त्यांच्याकडून नव्याने जामीन हमीपत्र भरून घेऊन आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. सीजेपीच्या नेत्यांची बाजू मांडणारे त्यांचे वकील अभिष्ट हेले यांनी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. (Ashutosh Ranka Sourav Das)
नेते एखादा गुन्हा करू शकतात, या निराधार शक्यतेच्या आधारेच पोलिसांनी त्यांना कोठडीत पाठवल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, तिन्ही नेत्यांनी सर्वसामान्य नागरिकांना त्या ठिकाणी जमण्याचे आवाहन केले होते, असे पोलिसांनी न्यायालयात सांगितले; मात्र हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे वकिलांनी म्हटले. नेत्यांनी असे कोणतेही आवाहन केले नव्हते आणि जामीन हमीपत्रातील कोणत्याही अटीचे उल्लंघनही केले नव्हते, असा दावा त्यांनी केला. (Ashutosh Ranka Sourav Das)
जंतर-मंतरला आंदोलनासाठी निर्धारित स्थळांच्या यादीतून वगळण्यात आल्यानंतरही सीजेपीच्या नेत्यांनी तेथे आंदोलन केले. आशुतोष रांका, सौरव दास आणि पक्षाचे अन्य कार्यकर्ते बॅरिकेड्स ओलांडून आत गेले. त्यांनी तिरंगा फडकावत घोषणाबाजी केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. मतदार यादीच्या विशेष सखोल पुनर्निरीक्षणावरून (एसआयआर) सीजेपी आणि विरोधी पक्ष निवडणूक आयोगाचा निषेध करत असताना ही कारवाई करण्यात आली.
राष्ट्रध्वज फडकवणेही बेकायदेशीर झाले का?
आता राष्ट्रध्वज फडकवणेही बेकायदेशीर झाले आहे का? आशुतोष आणि सौरव यांना पाच दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. त्यांची चूक काय? जंतर-मंतरवर तिरंगा फडकवणे! नरेंद्र मोदी, थोडे धैर्य दाखवा. विरोधाचा आवाज दडपण्याचा तुमचा निर्धार इतकाच पक्का असेल, तर अशा भ्याड मार्गांचा आधार घेण्याऐवजी अधिकृतपणे आणीबाणी घोषित करण्याचे धाडस दाखवा.
- अभिजित दिपके, संस्थापक, कॉकरोच जनता पार्टी (Ashutosh Ranka Sourav Das)
जंतर-मंतरला आंदोलनस्थळांच्या यादीतून वगळल्याने वाद
दिल्ली पोलिसांनी १२ ऑक्टोबर रोजी जंतर-मंतरला आंदोलनासाठी निर्धारित स्थळांच्या यादीतून वगळल्यानंतर हा वाद अधिक वाढला. अधिकाऱ्यांनी आंदोलनासाठी रामलीला मैदान, बुराडी मैदान आणि पूर्व दिल्लीतील सीबीडी मैदान यांसारखे पर्यायी पर्याय निश्चित केले. सीजेपीने या निर्णयाला विरोध करत जंतर-मंतरवरच आंदोलन करण्याची मागणी केली. आंदोलनाची तारीख निश्चित करण्यासाठी पक्षाने पोलिसांना वेळही दिला होता. यापूर्वी १० ऑक्टोबर रोजी अभिजीत दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर ११ ऑक्टोबर रोजी एक वर्ष शांतता राखण्याच्या अटीवर त्यांची सुटका करण्यात आली. मात्र, आंदोलन करण्यापासून रोखणारे कोणतेही हमीपत्र आपण भरले नसल्याचा दावा अभिजीत दिपके यांनी केला होता. त्यानंतर पक्षाने आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला. (Ashutosh Ranka Sourav Das)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक