माईकची साथ लाभलेला मंत्रमुग्ध करणारा आवाज आणि हातांमध्ये महिलांचे आयुष्य बदलण्याची कला असे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजे अनुराधा फाटक! वयाच्या ६५व्या वर्षी कथाकथनाची नवी ‘इनिंग’ सुरू करणार्या आणि खेड्यापाड्यातील महिलांना शिवणकाम शिकवून त्यांना स्वतःच्या पायावर उभे करणार्या स्वावलंबी नवदुर्गेची ही प्रेरणादायी कहाणी...'
अनुराधा यांचे वडील भास्कर हे पशुवैद्यक असल्याने त्यांचे काम कायम फिरते राहिले. त्यामुळे त्यांचे शिक्षणही फिरते राहिले. शिक्षणाचा सुरुवातीचा काळ अमरावती येथे गेला. त्यामुळे वैदर्भीय भाषेवर त्यांचे चांगले प्रभुत्व आहे. शाळा एकसंध नसल्याने त्यांची संस्कृत शिकण्याची इच्छा अपूर्णच राहिली. अनुराधा यांनी हिंदी भाषेवरही प्रभुत्व मिळविले आहे. धरमपेठ विद्यालय, नागपूर येथून त्यांनी दहावी पूर्ण केली. पदवीच्या दुसर्या वर्षाला असताना त्यांना लग्नासाठी स्थळ चालून आले. १९६४ साली त्यांची लग्नगाठ जर्नादन फाटक यांच्याशी बांधली गेली. अनुराधा यांचे पदवीचे एक वर्ष बाकी होते. त्यांच्या पतीने त्यांना "पदवी पूर्ण कर,” असा सल्ला दिला. त्यामुळे लग्नानंतर डोंबिवलीच्या रहिवासी झालेल्या अनुराधा पुन्हा माहेरी एक वर्ष राहिल्या आणि त्यांनी आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यांनी राज्यशास्त्र, अर्थशास्त्र आणि मराठी विषयात पदवी संपादन केली आहे. अनुराधा यांना घरातून कायम प्रोत्साहन मिळाले आहे. अनुराधा यांना वाचनाची आवड आहे. त्यांची ही आवड पाहता, त्यांच्या पतीने त्यांना ‘लायब्ररीयन’चा अभ्यासक्रम शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले. ठाण्याला त्यांनी तीन महिन्यांचा अभ्यासक्रमही शिकून घेतला. टिळकनगर विद्यामंदिरात त्यांनी नोकरीसाठी मुलाखत दिली. पण अनुराधा यांना त्यांच्या पतीने "त्या जागेवर कोणीतरी गरजू महिला काम करू शकते,” असे सांगितले. त्यांनाही पतीचा विचार पटला आणि त्यांनी नोकरी न करण्याचे ठरविले. "जीवनात पैसा खूप महत्त्वाचा आहे. पण पैसा कमावताना कुठेतरी थांबले पाहिजे,’ असा खूप चांगला विचार आपल्याला पतीकडून मिळाला,” असे अनुराधा सांगतात. "१९७४ मध्ये रेल्वेचा संप झाला होता. त्याचा फटका बसलेली एक महिला त्याठिकाणी रुजू झाली, त्याचेही मला समाधान वाटते,” असे त्या म्हणाल्या.
अनुराधा यांचे चिरंजीव जयंत आणि हेमंत हे सेंटल झाल्यानंतर त्यांच्याकडे खूपच मोकळा वेळ होता. त्यांनी ब्राह्मण सभेच्या ग्रंथालयात नऊ वर्षे काम केले. त्यामुळे त्यांनी घेतलेल्या प्रशिक्षणाचा उपयोग झाला. ‘पद्मजा महिला मंडळ’, ‘ब्राह्मण महिला समिती’ आणि ‘चित्पावन महिला संघ’ यांच्याशी अनुराधा जोडल्या गेल्या. या महिला मंडळासोबतच त्या काम करू लागल्या. विविध सण समारंभ, व्याख्याने, चर्चासत्रे यांबरोबरच स्पर्धेत सहभागी होणे, अशा उपक्रमांत त्या सहभागी होऊ लागल्या. एकदा एका वृत्तवाहिनीकडून ‘मंडळवार्ता’ कार्यक्रमाचे शूटिंग ब्राह्मण सभेत होते. त्याठिकाणी रेकॉर्डिंग करण्यासाठी आलेल्या व्यक्तींनी "तुमचा आवाज खूप चांगला आहे,” असे सांगितले. हाच क्षण अनुराधा यांच्यासाठी ‘टर्निग पॉईंट’ ठरला. त्यांनी आपला चांगला आवाज आणि वाचनाची आवड या दोन्हींची सांगड घालत, कथाकथनाचे कार्यक्रम करण्यास सुरुवात केली. वयाच्या ६५व्या वर्षी त्यांनी कथाकथनाची एक नवी ‘इनिंग’ सुरू केली. अमरावती, नाशिक, पुणे, नागपूर, सातारा, मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातही त्यांनी कथाकथनाचे कार्यक्रम केले आहेत. पुण्यात होणार्या नांदी संमेलनात ‘आम्ही सिद्ध लेखिका’ या मंडळाला आमंत्रित केले आहे. त्या मंडळाने अनुराधा यांना कथाकथन कसे असावे, याबाबतच्या मार्गदर्शनासाठी आमंत्रित केले आहे. हीदेखील अनुराधा यांच्यासाठी एक अभिमानाचीच बाब आहे.
अनुराधा यांची आई विमल जोशी या शिवणकाम करायच्या. त्यांचे पाहून अनुराधादेखील शिवणकाम शिकल्या. अनुराधा यांना लग्नानंतर त्यांच्या पतीने शिलाईमशीन घेऊन दिले होते. त्यावर त्या शिलाई करत असत. महिलांना त्या मोफत शिलाई करून देत असत. शिलाईचे काम त्यांनी १९९१ला सुरू केले. त्यांनी महिलांना केवळ मोफत शिलाई करून दिली नाही, तर गरजू महिलांना मोफत प्रशिक्षणही दिले. लोटे परशुराम येथील ‘घरडा कंपनी’ येथील २५ गृहिणींपासून त्यांनी प्रशिक्षणाला सुरुवात केली. त्यानंतर ‘शबरी सेवा समिती’च्या रंजना करंदीकर यांनी अनुराधा यांना कर्जत येथे राहण्यास बोलाविले. दोन वर्षे कर्जतला राहून त्यांनी शहादा, नंदूरबार, वाडा, जव्हार, मोखाडा येथील महिलांना बॅग आणि पर्सेस बनविण्याचे प्रशिक्षण दिले. १९९७ पासून त्या महिलांना मोफत प्रशिक्षण देत आहेत. त्यांच्या सुनेनेदेखील त्यांच्याकडे बॅग आणि पर्सेस बनविण्याचे प्रशिक्षण घेतले आहे. आजही कोणाला बॅग आणि पर्सेस बनविण्याचे प्रशिक्षण हवं असल्यास ते मोफत देण्याची त्यांची इच्छा आहे. पण त्या महिलेला शिलाई मारता यावी, एवढीच त्यांची अट आहे. ८५व्या वर्षी आजदेखील त्या दारात सुबक रांगोळी काढतात. "दहा मिनिटांची रांगोळी त्यांच्यासाठी दिवसभरासाठी प्रेरणास्रोत असते,” असे त्या सांगतात.