छाया सौजन्य - अक्षय देशपांडे
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मध्य आशियातील काही भागांतून लांब पल्ल्याचे स्थलांतर करुन वसईतील गोगटे मिठागर परिसरात ‘व्हाइट स्टॉर्क’ (White Stork) म्हणजेच पांढरा करकोचा या पक्ष्यांचे आगमन झाले आहे (White Storks). सध्या या परिसरात तीन पांढऱ्या करकोचा पक्ष्यांचा वावर दिसून येत असल्याने पक्षी निरीक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे (White Storks). मुंबई महानगर प्रदेशात या पक्ष्यांची नोंद यापूर्वीही झाली असली, तरी येथे त्यांचे दर्शन तुलनेने दुर्मीळ मानले जाते(White Storks). विशेषतः मिठागरांसारख्या पाणथळ अधिवासात या पक्ष्यांचा मुक्काम स्थलांतराच्या मार्गावरील थांब्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरू शकतो. (White Storks)
व्हाइट स्टॉर्क हा उंच, लांब पायांचा आणि पांढऱ्या शरीरावर काळ्या पंखांची उठावदार रंगसंगती असलेला पक्षी आहे. त्याची लांब, लाल चोच आणि लाल पाय ही ओळखण्याची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. युरोपातील अनेक देशांसह उत्तर आफ्रिका आणि मध्य आशियातील काही भागांत या पक्ष्यांची वीण होते. हिवाळ्यात तापमानातील घट आणि अन्नाची उपलब्धता यांमुळे काही समूह दक्षिणेकडे स्थलांतर करतात. भारतातही हा पक्षी हिवाळी पाहुणा म्हणून आढळतो. मात्र, महाराष्ट्रात आणि विशेषतः मुंबई परिसरात त्याच्या नोंदी तुलनेने कमी आहेत.सध्या या पक्ष्याचे दर्शन वसईतील गोगटे मिठागर परिसरात होत असल्याने अनेक पक्षीनिरीक्षकांची पाऊले याठिकीणी वळत आहेत.
युरोपातील प्रजनन क्षेत्रांतून हे पक्षी हिवाळ्यात आफ्रिकेतील तसेच आशियातील अनुकूल प्रदेशांकडे जातात. भारतात येणारे पक्षी हे मध्य आशियातील कझाकस्तान, उझबेकिस्तान, किर्गिझस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान या देशातून येतात. गोगटे मिठागरातील पांढरा करकोचा नोंदवल्याची ही पहिलीच नोंद नाही. २०१६ मध्ये याच परिसरात तीन पांढरे करकोचे आढळल्याची नोंद जॉन्सन वर्गीस आणि अभय हुले यांनी संशोधनपर लेखात केली आहे. ३ नोव्हेंबर २०१६ रोजी दोन प्रौढ आणि एक निमवयस्क पक्षी दिसले होते. पुढील काही दिवसांत त्यांचे निरीक्षण करण्यात आले आणि १४ नोव्हेंबरपर्यंत त्यांची संख्या सात झाल्याची माहितीही या लेखात नोंदवली आहे. या निरीक्षणामुळे गोगटे मिठागर हे या प्रजातीच्या स्थलांतराच्या प्रवासातील संभाव्य थांब्याचे ठिकाण असल्याचे महत्त्व अधोरेखित झाले होते. गोगटे मिठागर परिसरात उथळ पाणथळ जागा, चिखलाचे पट्टे, गवताळ भाग आणि पाण्याचे लहान तलाव आढळतात. या अधिवासांमध्ये पक्ष्यांना कीटक, लहान जलचर आणि इतर खाद्यजीव मिळतात. त्यामुळे स्थानिक पक्ष्यांबरोबरच स्थलांतरित पक्ष्यांसाठीही हा परिसर महत्त्वाचा ठरतो.