‘वंदे मातरम्’च्या १५० व्या वर्षानिमित्त कोलकात्यात दुर्गापूजा मंडपातून राष्ट्रभक्तीचा जागर

    13-Oct-2026   


Vande Mataram 150th Anniversary

 
मुंबई (Vande Mataram 150th Anniversary) : पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी यांनी रविवारी कोलकात्यातील संतोष मित्र स्क्वेअर येथील दुर्गापूजा मंडपाचे उद्घाटन केले. राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’च्या १५० व्या वर्धापनदिनानिमित्त यंदा या मंडपाची संकल्पना ‘वंदे मातरम्’ अशी ठेवण्यात आली आहे. या उद्घाटन सोहळ्याला भाजपचे पश्चिम बंगाल प्रभारी सुनील बन्सल, प्रदेशाध्यक्ष समिक भट्टाचार्य, केंद्रीय मंत्री सुकांत मजुमदार यांच्यासह पक्षाचे अन्य नेते उपस्थित होते.
 
यावेळी बोलताना शुभेंदु अधिकारी म्हणाले की, यंदाचा दुर्गापूजा उत्सव सनातन संस्कृतीचा गौरव करणारा असेल. “ही ‘वंदे मातरम्’ संकल्पनेवर आधारित दुर्गापूजा आहे. कालपासून दुर्गापूजेला सुरुवात झाली आहे. सर्वत्र आनंदाचे वातावरण असून, यंदा सनातन संस्कृतीचा सन्मान करत दुर्गापूजा साजरी केली जाईल,” असे त्यांनी सांगितले.(Vande Mataram 150th Anniversary)
 
संतोष मित्र स्क्वेअर येथे यंदा ९१ व्या दुर्गापूजेचे आयोजन करण्यात आले असून, या मंडपातून भारताचा स्वातंत्र्यलढा आणि फाळणीच्या वारशाचे स्मरण करण्यात आले आहे. या मंडपाची रचना भारताच्या नकाशाच्या आकारात करण्यात आली आहे. त्यामध्ये फाळणीच्या काळातील छायाचित्रे, लाल किल्ल्याची प्रतिकृती आणि १९४७ मध्ये फाळणीदरम्यान झालेल्या मोठ्या स्थलांतराचे चित्रण करणारी रेल्वेगाडीची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. या रेल्वेच्या देखाव्यात मानवी आकृत्या आणि विशेष दृश्यात्मक परिणामांचाही वापर करण्यात आला आहे.(Vande Mataram 150th Anniversary)
 
स्वातंत्र्यसैनिक खुदीराम बोस आणि मातंगिनी हाजरा यांनाही या मंडपातून अभिवादन करण्यात आले आहे. कोलकात्याला समर्पित करण्यात आलेल्या एका भिंतीवर श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. प्रकाश आणि ध्वनियोजनेच्या माध्यमातून भारताच्या स्वातंत्र्यापासूनच्या प्रवासाचे दर्शन घडवण्यात आले असून, स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानावरही प्रकाश टाकण्यात आला आहे. कमळाच्या संकल्पनेवर आधारित प्रवेशद्वारावर भारतमाता आणि भगवान शिव यांच्या प्रतिमा साकारण्यात आल्या आहेत. तर, देवी दुर्गेची मूर्ती पारंपरिक स्वरूपात विराजमान करण्यात आली आहे.(Vande Mataram 150th Anniversary)
 
दरम्यान, रविवारी सकाळी कोलकात्यातील ईडन गार्डन्स येथे महालयानिमित्त आयोजित भव्य सोहळ्यालाही मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमातून दुर्गापूजेच्या उत्सवाची सुरुवात करण्यात आली. या सोहळ्यात ड्रोन शो, त्रिमितीय प्रोजेक्शन मॅपिंग, लेझर आणि प्रकाशयोजना तसेच आतषबाजीचे आयोजन करण्यात आले होते.(Vande Mataram 150th Anniversary)
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर