जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त, दि. १० ऑटोबर रोजी ‘एफएम रेनबो’वर माझा कार्यक्रम झाला. त्यावेळी श्रोत्यांकडून एक प्रश्न आवर्जून विचारला गेला की, "समाज माध्यमांचा मुलांच्या मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतो?” यातूनच याबद्दलची समाजातील चिंता प्रकर्षाने जाणवली. आजच्या डिजिटल युगात समाजमाध्यम हा किशोरवयीन मुलांच्या जीवनाचा अविभाज्य भाग. समाज माध्यमामुळे मुलांची स्वतःकडे पाहण्याची दृष्टी, इतरांशी असलेले संबंध आणि मानसिक स्वास्थ्यांवर परिणाम होतो. समाज माध्यमावरील नकारात्मक अनुभवांमध्ये स्वतःची इतरांशी तुलना करणे, नकारात्मक आशय पाहणे, ऑनलाईन छळ सहन करणे आणि प्रत्यक्ष सामाजिक जवळीक निर्माण करण्याचा वेळ समाजमाध्यमांमुळे घटणे, यांचा समावेश होतो. समाजमाध्यमाचा परिणाम प्रत्येक व्यक्तीवर सारखाच होत नाही. काही व्यक्तींना असे जाणवते की, दररोजच्या समाजमाध्यम वापराचा त्यांच्या मन:स्वास्थ्यावर नकारात्मक परिणाम होतो; तर काहींना असा परिणामच जाणवत नाही. समाजमाध्यमाचा वापर कसा केला जातो आणि कोणत्या प्रकारचा आशय पाहिला जातो, यावरच या अनुभवांचा परिणाम होतो.
सायबरबुलिंग :
आज डिजिटल युगात ‘सायबरबुलिंग’ ही मानसिक आरोग्याशी संबंधित एक गंभीर आहे. समाज माध्यम, ऑनलाईन व्यासपीठांच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीला जाणीवपूर्वक त्रास देणे, अपमानित करणे किंवा धमकावण्याला ‘सायबरबुलिंग’ म्हणतात. यात अपमानास्पद टिप्पणी करणे, आक्षेपार्ह संदेश पाठवणे, परवानगीशिवाय त्यांची खासगी माहिती किंवा छायाचित्रे प्रसारित करणे आणि धमक्या देणे, अशाचा समावेश होतो. ऑनलाईन जगात आपली ओळख लपवता येत असल्याने, काही व्यक्ती प्रत्यक्ष भेटीत कधीही करणार नाहीत, असे वर्तन करतात. अभ्यासानुसार, सुमारे ३४ टक्के किशोरवयीन मुले ‘सायबरबुलिंग’चा बळी ठरल्याचे नोंदवले आहे. याशिवाय, किशोरवयीन मुलांवर केलेल्या अभ्यासात असे आढळले की, समाज माध्यमांवरील अधिक वापर आणि छळाचा बळी ठरणे यांच्यात संबंध दिसून येतो. विशेषतः मुलांमध्ये हा संबंध अधिक आढळला.
‘सायबरबुलिंग’चे मानसिक परिणाम :
‘सायबरबुलिंग’चा परिणाम केवळ त्या बुलिंगच्या क्षणापुरताच मर्यादित नाही. सतत अपमानास्पद संदेश किंवा धमया मिळाल्याने मुलांमध्ये ताण, चिंता, उदासीनता आणि आत्मविश्वासाचा अभाव निर्माण होऊ शकतो. ऑनलाईन छळाचा त्रास घरात शिरल्यावरही संपत नाही; कारण मोबाईल किंवा इंटरनेटच्या माध्यमातून तो पुन्हा पुन्हा अनुभवावा लागतो. या मानसिक तणावाचा परिणाम शारीरिक आरोग्यावरही होऊ शकतो. काही मुलांमध्ये मानसिक तणावामुळे पोटदुखी आणि डोकेदुखीच्या तक्रारी निर्माण होतात. इतर मुलांचा छळ होताना पाहणार्या मुलांनाही अपराधीपणा, असाहाय्यता किंवा अस्वस्थता जाणवू शकते.
‘सायबरबुलिंग’ला आळा कसा घालावा?
‘सायबरबुलिंग’ रोखण्यासाठी पालक, शाळा आणि समाज यांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे. शाळांमध्ये छळविरोधी नियमांची प्रभावी अंमलबजावणी करणे, मुलांना जबाबदारीने इंटरनेट वापरण्यास शिकवणे आणि तक्रार करण्यासाठी सुरक्षित व्यवस्था उपलब्ध करून देणे महत्त्वाचे. मुलांमध्ये सहानुभूती, परस्परांचा आदर आणि डिजिटल माध्यमांचा जबाबदारीने वापर करण्याची जाणीव निर्माण केली पाहिजे. सायबरबुलिंग’चे गांभीर्य ओळखून, त्याविरुद्ध योग्य पावले उचलल्यास मुलांसाठी अधिक सुरक्षित आणि आधार देणारे डिजिटल वातावरण निर्माण करता येईल.
शरीराच्या दिसण्याविषयी चिंता आणि समाजमाध्यम:
समाजमाध्यमांमुळे किशोरवयीन मुलांना, विविध प्रकारच्या छायाचित्रांचा आणि व्हिडिओंचा सतत सामना करावा लागतो. याचा त्यांच्या स्वतःच्या शरीराकडे पाहण्याच्या दृष्टिकोनावर मोठा परिणाम होतो. समाजमाध्यमांवर अनेकदा सुंदर, आकर्षक आणि निर्दोष दिसणार्या शरीरांचे चित्रण केले जाते. नितळ त्वचा, सुडौल शरीरयष्टी आणि परिपूर्ण दिसणारे व्यक्तिमत्त्वांचे फोटो वारंवार पाहिल्याने, मुलांच्या मनात सौंदर्याविषयीच्या अवास्तव अपेक्षा निर्माण होतात. या प्रतिमांशी स्वतःची तुलना करताना, अनेक मुलांना स्वतःच्या शरीराविषयी असमाधान वाटू लागते. अनेक संशोधकांच्या अभ्यासात समाजमाध्यमांवरील अवास्तव सौंदर्यकल्पनांचा, किशोरवयीन मुलींच्या स्वतःविषयीच्या धारणा आणि मानसिक स्वास्थ्यावर होणारा नकारात्मक परिणाम अधोरेखित करण्यात आला आहे. दुसर्या एका अभ्यासानुसार, समाजमाध्यमांवर अतिशय सडपातळ किंवा आदर्श शरीरयष्टीच्या प्रतिमा पाहण्याचा संबंध, शरीराविषयी वाढणार्या असमाधानाशी आणि वजन नियंत्रित करण्याच्या अस्वास्थ्यकारक पद्धतींशी आढळतो.
मुलांमध्ये शरीराविषयी सकारात्मक दृष्टिकोन कसा निर्माण करावा?
समाजमाध्यमांवर दिसणार्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवण्याऐवजी, त्यामागील वास्तव समजून घेण्याची क्षमता मुलांमध्ये विकसित करणे आवश्यक आहे. अनेक छायाचित्रे विशिष्ट कोनातून घेतलेली, संपादित केलेली किंवा फिल्टर वापरून बदललेली असू शकतात, याची जाणीव त्यांना करून द्यावी. मुलांना स्वतःच्या शरीराचा स्वीकार करायला शिकवणे, दिसण्यापेक्षा त्यांच्या गुणांना, क्षमतांना आणि प्रयत्नांना महत्त्व देणेही आवश्यक आहे. कुटुंबात आणि शाळेत शरीराविषयीच्या चिंतांवर मोकळेपणाने चर्चा केल्यास, सौंदर्याविषयीच्या हानिकारक समजुती कमी करण्यास मदत होऊ शकते. पुढील लेखात आपण समाज माध्यमांचे व्यसन, काहीतरी चुकत असल्याची भीती, शरीराच्या दिसण्याविषयी चिंता याबद्दल जाणून घेणार आहोत. (क्रमशः)
-डॉ. शुभांगी पारकर