जगण्यातले सामाजिक भान!

    13-Oct-2026
 
 
Ranjana Irim Talasari
 
अतिशय वंचित परिस्थितीमध्येही स्वतःसोबत समाजाच्या प्रगतीचा विचार आणि त्यासाठी कार्य करणार्‍या तलासरीच्या रंजना सुरेश इरीम यांच्या कार्याचा मागोवा घेणारा हा लेख...
 
९० चे दशक असेल. तलासरीच्या गावातून सुक्या लाकूडफाट्याची मोळी घेऊन रंजना आत्यासोबत साधारण पाच-सहा तास चालत गुजरातच्या गावात जायची. गावात मोळी विकायची. त्याबदल्यात मक्याचे जाडेभरडे पीठ तिला मिळायचे. त्या पिठावर उन्हाळ्यात भूक भागायची. याच रंजना इरीम तलासरीमध्ये कष्टकरी महिलांसाठी काम करत आहेत. काही वर्षांपूर्वी पाड्यात अनेक समस्या होत्या. अंधश्रद्धा, व्यसन, अज्ञान, अल्पशिक्षण, रोजगाराच्या संधी नसणे वगैरे वगैरे. या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी, समाजाच्या मूळ प्रवाहात येण्यासाठी आदिवासी समाज स्वतः पुढे आला. समाजाने प्रगतीच्या वाटा शोधण्याचे प्रयत्न सुरू केले. या प्रवाहात अखंड कार्यरत असलेल्या आणि समाजातील महिलांच्या प्रगतीसाठी-विकासासाठी काम करणार्‍या तलासरीच्या रंजना इरीम.
 
त्यांच्याही आयुष्यात कष्ट होतेच. कष्ट म्हणजेच जगणे हे समीकरण. आपण काही वेगळे जगत आहोत, हे रंजना यांच्या गावीही नव्हते. तलासरीहून ट्रक पकडून कधी सिल्वासा, तर कधी संजानला मोलमजुरी करतानाही त्या कधीच थकल्या नाहीत. पण, या कष्टातसुद्धा त्यांच्या मनात उमेद होती की, आपण शिकावे. आजूबाजूच्या मुलींची वयात येताच लग्नं होत होती. पण, रंजना दहावीपर्यंत का होईना, शिकल्या. ‘मुलगी शिकली, प्रगती झाली’ म्हणतात. त्याप्रमाणे रंजना शिकल्या आणि त्यांनी समाजातील महिलांसाठी संस्थेच्या माध्यमातून काम सुरू केले. प्रशासकीय मार्गदर्शन आणि सहकार्याने ४१ बचत गट बनवले. या बचत गटांतील ४१० महिलांना फिरते भांडवल आणि कौशल्य शिकण्याची संधी मिळाल्याने त्यांचे आयुष्य उज्ज्वल झाले. कदाचित, आकड्यांच्या दुनियेत ही संख्या कमी असेल. पण, तलासरीच्या दुर्गम खेड्यापाड्यांत आयुष्यभर कष्ट करणार्‍या आणि कोणत्याही संधीपासून वंचित असलेल्या महिलांचा विचार करता, ही संख्या गुणात्मकरीत्या खूप मोठी आहे. रंजना महिलांना आर्थिक नियोजनासंदर्भात, तसेच सरकारी लाभासाठी सहकार्य करत आहेत. विधवा पेन्शन असू दे, सरकारी योजनेतून घर बांधणे असू दे की, मुलींचे शिक्षण असू दे, यासाठी त्या मार्ग दाखवतात. एकल विधवा महिलांचा बचत गट बनवून त्यांना सक्षम करण्याचा त्यांचा प्रयत्न महत्त्वाचा आहे. त्यांच्या जीवनाचा मागोवा घेऊ.
 
तलासरीच्या सूत्रकार गावातील वारली समाजाचे रामजी आणि ताई आंबात यांना आठ अपत्ये. रामजी हे चार महिने ताडी काढायच्या कामाला जायचे आणि उरलेले महिने मोलमजुरी करायचे, शेतात राबायचे. पण, यातून घरखर्च भागत नसे. कोंड्याची भाकर आणि पाणी प्यायला मिळाले की झाले. या परिस्थितीमध्ये रंजना शाळेत जाऊ लागल्या. घरातल्या फाटया कपड्याची पिशवी बनवून त्यात पाटी-पेन्सील ठेवले की झाले. मात्र, शाळेत गेल्यामुळे रंजना यांना शिक्षणाचे महत्त्व कळले. त्याच वेळी त्यांच्या आजूबाजूला पिढ्यान्पिढ्या काय घडत होते? तर लोक डास, साप विंचू चावून मरणे, छोटीशी जखम होऊन त्यात विष पसरून मृत्यू येणे. प्रत्येक महिला भयंकर कष्ट करायची; पण नशिबातील दुःख संपत नसे. दुसरीकडे मुले-मुली लहानपणीच शाळा सोडून मोलमजुरी करायचे. थोडे पैसे हातात आल्याने पुन्हा ते शाळेत कधीच जायचे नाहीत. एकवेळच्या अन्नासाठी वणवण आणि अपार कष्ट. हे सगळे कसे बदलणार? यातूनच रंजना यांच्या मनात जिद्द निर्माण झाली की, आपण काहीतरी केले पाहिजे. ‘इच्छा तिथे मार्ग’ असतोच. त्यांचे काका धर्मा आंबात हे ‘विश्व हिंदू परिषदे’चे काम करायचे. त्यामुळे माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी रंजना यांनी विश्व हिंदू परिषदेच्या आश्रमशाळेत प्रवेश घेतला. तिथे रा. स्व. संघाचे अप्पा जोशी यांच्याशी संपर्क झाला. संघ-परिसस्पर्शाने विचारांमध्ये सकारात्मक परिवर्तन आले.
 
पुढे सुरेश इरीम यांच्यासोबत विवाह झाला. सासरचे लोक चांगले मिळाले. त्यामुळे त्या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्य करू लागल्या. दरम्यान, त्यांच्या परिचित राधा कौम यांनी सुचवल्याप्रमाणे त्यांनी ‘विश्व हिंदू परिषदे’च्या माध्यमातून नोंदणी केली. त्या महिलांसाठी काम करू लागल्या. आज परिसरात शेकडो बचत गट आहेत आणि हजारो महिला त्याद्वारे विकास साधत आहेत. तलासरीहून लाकडाची मोळी घेऊन अनवाणी पायाने चालत जात गुजरातच्या गावात मोळी विकणार्‍या रंजना आज गावातल्या मुलींनी शिक्षण सोडू नये, महिलांनी पारंपरिक शेतीकामासोबत जोडधंदा करावा, यासाठी काम करत आहेत. या सगळ्या आयामात त्यांच्यासमोर काही प्रश्नही उभे राहतात. पण, रंजना म्हणतात, "समाजाला सोबत घेऊनच समाजाचे प्रश्न सुटतील. बचत गटाच्या माध्यमातून शासकीय योजनांद्वारे समाजात आमूलाग्र बदल होत आहे. खेड्यापाड्यांतल्या आमच्या भगिनींच्या जीवनात आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक विकास निर्माण व्हावा, यासाठी मी आयुष्यभर काम करणार आहे.” रंजना यांच्या कार्याची व्याप्ती समाजासाठी मोठी आहे. त्यांच्या कार्याला शुभेच्छा!
 
-योगिता साळवी
९५९४९६९६३८




संबंधित मजकूर