निवडणुकीत मोदींचा पराभव करणे शक्य नसल्याने, या निवडणुकांच्या वैधतेवरच प्रश्नचिन्ह लावण्याचा डाव राहुल गांधी यांनी टाकला. यासाठीच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी त्यांनी, आंदोलनाचा मार्ग अवलंबिला. ही सरळसरळ झुंडशाहीच! देशात अराजक निर्माण करण्याचा त्यांचा कट असून, त्यानुसार आता सर्वोच्च न्यायालयालाही लक्ष्य केले जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवडणुकीत रीतसर पराभूत करून सत्ता मिळविणे शक्य नसल्याच्या वस्तुस्थितीची जाणीव झाल्याने, कमालीचे वैफल्यग्रस्त झालेल्या राहुल गांधी यांनी त्यांना सत्तेवरून दूर करण्यासाठी थेट हिंसाचाराचा मार्ग अवलंबिला आहे. दररोज नवनवे; पण पूर्णपणे असत्य आरोप करायचे, त्यावरून झुंडगिरी करायची आणि समाजात भीतीचे वातावरण तयार करायचे, या त्यांच्या धोरणाचा सामान्य माणसाला फटका बसत आहे. पोलीस यंत्रणेवरही बराच ताण निर्माण झाला आहे. निवडणुकीत मोदी यांना पराभूत करता येत नसेल, तर त्या निवडणुकांच्याच निष्पक्षपातीपणावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा त्यांचा नवा डाव. त्यासाठी आता त्यांनी निवडणूक आयोगालाच, त्यातही मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना लक्ष्य केले. निवडणुकाच चुकीच्या आधारावर घेतल्याचे सिद्ध झाले, तर मोदी यांची सत्ता आपोआपच अवैध ठरेल, अशी त्यांची भाबडी समजूत! म्हणूनच ज्ञानेश कुमार यांनी भाजपला अनुकूल निकाल लावल्याचा आरोप करून, राहुल गांधी यांनी त्यांच्या राजीनाम्यासाठी झुंडगिरी सुरू केली आहे.
आपल्या झुंडशाहीला लोकशाहीतील आंदोलनाचा मुखवटा चढविण्याचा त्यांचा प्रयत्न असला, तरी तो सपशेल अपयशीच ठरला. आधी त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना, आपल्या कुटिल राजकीय डावपेचांत ओढण्याचा प्रयत्न केला. दहा विरोधी नेत्यांचे शिष्टमंडळ घेऊन, राहुल गांधी यांनी मुर्मू यांची भेट घेतली. भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी अत्यंत खोडसाळपणे, राष्ट्रपतींना या वादात गोवण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रपती मुर्मू यांनी आपल्या ‘व्होटचोरी’च्या आरोपाचा स्वीकार केल्याचे सांगून, त्यांनी आपल्याला त्यासंबंधीचे पुरावे देण्याचे आवाहन केल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले. अर्थात, सामान्य माणूस राहुल गांधी यांच्याइतका मूर्ख नसल्याने, त्याला त्यामागील मखलाशी चांगलीच कळली.
आता त्यांनी सर्वोच्च न्यायालयालाच जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न चालविला आहे. ‘व्होटचोरी’प्रकरणी विरोधी पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात काही याचिका दाखल केल्या असून, त्यांची सुनावणी न्यायालय करीत आहे. असे असताना राहुल गांधी यांनी या विषयावर चर्चा करण्यासाठी, देशाचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या भेटीची वेळ मागितली. न्या. सूर्य कांत यांनी अशी भेट देण्यास औचित्याच्या मुद्द्यावरून नकार दिला. तेव्हा आता राहुल गांधी यांनी, सर्वोच्च न्यायालयावरच ‘मोर्चा’ नेण्याचा प्रयत्न केला. तसेच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा आणि ‘एसआयआर’ प्रक्रिया थांबविली जावी, या मागणीसाठीही राहुल गांधी आणि प्रमुख विरोधी नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयात काल एक याचिका दाखल केली असून, तिच्यावर आजच सुनावणी केली जाईल, असे न्यायालयाने म्हटले आहे. खरेतर याचिकेतील मागणी पूर्ण करण्याचा आदेश देण्याचे अधिकारच न्यायालयाला नाहीत.
"संसद, निवडणूक आयोग, ‘कॅग’, सर्वोच्च न्यायालय यांसारख्या सर्व घटनात्मक संस्था या पक्षपाती असून, त्या भाजपला निवडणुकीत जिंकून देतात,” असा प्रचार करून, या घटनात्मक संस्थांवरील सामान्य माणसाचा विश्वास उडवायचा, हा राहुल गांधी यांच्या झुंडशाहीचा पहिला टप्पा आहे. अर्थात, सामान्य माणसाचा या संस्थांवरील विश्वास डगमगायला लावणे, हीसुद्धा सोपी गोष्ट नाही. कारण, कितीही उणिवा असल्या, तरी या सर्व संस्था बहुतांशी निष्पक्षपातीपणे आणि सचोटीने आपले काम करीत असतात, याचा अनुभव सामान्य माणसाला येतच असतो. म्हणूनच, आपल्या या टोकाच्या आणि पूर्णपणे असत्य मागण्यांचा सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठी, राहुल गांधीसारख्या नेत्यांनी झुंडगिरीचा मार्ग अवलंबिला आहे. सध्या देशात होत असलेली कथित आंदोलने हा याच झुंडगिरीचा भाग. या अनाचारात सर्व विरोधी पक्ष काँग्रेसला साथ देत आहेत, ही मोठी दुर्दैवाची बाब आहे. काँग्रेसच्या केरळ समाजमाध्यम खात्याने तर, ‘काम जमत नसेल तर पद खाली करा, आम्ही तुम्हांला पर्याय शोधू’ असे म्हणून, सरन्यायाधीशांनाच धमकावले आणि त्यावरून वादंग होताच नंतर हा संदेश त्यांनी डिलीटही केला. पण, या संदेशातून त्यांच्यातील अराजकवादी विचारांचे दर्शन भारताला झालेच.
राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, ‘कॉकरोच जनता पार्टी’ आणि अन्य विरोधी पक्ष यांच्या या राजकीय डावपेचात आणि काश्मीरला भारतापासून अलग पाडण्याच्या पाकिस्तानच्या डावपेचांमध्ये एक मोठे साम्य आहे. काश्मीरवर थेट हल्ला करून ते भारतापासून तोडणे अशक्य आहे हे लक्षात आल्यामुळे काश्मीरमध्ये, तसेच भारताच्या विविध शहरांमध्ये दहशतवाद आणि हिंसाचार पसरवून सामान्य लोकांना जीव नकोसा करून टाकायचा, हे पाकिस्तानचे धोरण होते. सामान्य भारतीय माणूस कंटाळून ‘पाकिस्तानला काश्मीर देऊन टाका आणि आम्हाला मोकळा श्वास घेऊ द्या,’ असा दबाव सरकारवर निर्माण करील, अशीच पाकिस्तानची रणनीती. अर्थात, सामान्य भारतीय देशभक्त असल्याने त्याने हा सारा हिंसाचार सहन केला; पण काश्मीरला दूर केले नाही. आता राहुल गांधी देशांतर्गत राजकारणात हेच करू पाहात आहेत. कथित आंदोलने आणि खोटेनाटे आरोप करणे, विकत घेतलेले पत्रकार आणि इलेट्रॉनिक मीडिया यांच्याद्वारे भ्रामक प्रचार पसरविणे आणि लोकशाहीच्या नावाखाली देशात अराजक निर्माण करणे, हे राहुल गांधी यांचे षड्यंत्र आहे.
‘इसापनीती’तील एक गोष्ट प्रसिद्ध आहे. वाहत्या ओढ्यावर पाणी पिणार्या कोकराला खाण्यासाठी एक लांडगा त्याच्यावर खोटे आरोप करतो. ‘तू माझे पाणी उष्टे केलेस,’ असे लांडगा म्हणतो. "पण, मी तर ओढ्याच्या खालच्या अंगाला आहे आणि तुम्ही वरच्या अंगाला आहात,” असे कोकरू म्हणताच, लांडगा म्हणतो की, "तू नाही, तर तुझ्या पूर्वजांनी केले असेल. त्याची शिक्षा म्हणून मी तुला खाणार.” असे म्हणून, तो कोकराला ठार मारतो. यातून बोध एकच घ्यायचा की, दुष्ट आणि अनैतिक व्यक्तीला खरे कारण लागतेच असे नाही. तो कुठलाही काल्पनिक बनाव रचून, आपल्या बळीला लक्ष्य करतो. राहुल गांधी यांचे राजकारण आता याच वळणावर येऊन ठेपले आहे. मोदी यांना कायदेशीर मार्गाने सत्तेवरून दूर करणे, ही त्यांच्या आणि अन्य सर्वच विरोधी पक्षांच्या आवायाबाहेरची गोष्ट आहे. त्यामुळे सरळ मार्गाने त्यांना सत्ताभ्रष्ट करता येत नसेल, तर वाकडा मार्ग अवलंबिण्याची त्यांची तयारी आहे. सध्या ते करीत असलेले आरोप आणि झुंडशाही हा त्याच कार्यपद्धतीचा भाग ठरावा!