गाझासाठी अश्रू ढाळायचे; पण रियाधसाठी मौन!

    13-Oct-2026
 
Riyadh Attack Political Reaction
 
दुटप्पी भूमिका आणि काँग्रेस यांचे नाते जुनेच! वास्तविक हे एकमेकाला पर्यायी शब्द म्हणूनही वापरता येतील. असे का, तर याचा परिचय अलीकडेच काँग्रेसने दिला. ओवेसी यांनी मुस्लीम हिताचे गळे काढताना मतपेटीचीच चिंता केली. यांचे बिंग फोडण्यास कारण ठरले हुतींचा रियाधवरील हल्ला! दोन्ही पक्षांकडून निषेधाचे चार शब्दही न येणे, सर्वकाही सांगून जाते...
 
विदेशी धोरणांबाबत दुटप्पी भूमिका घेणार्‍या काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी आणि ‘मुस्लीम इत्तेहादुल मुस्लिमीन’चे नेते असदुद्दीन ओवेसी यांच्यावर, विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल यांनी जोरदार टीका केली आहे. भारतीय विदेशी धोरणांबाबत सातत्याचा अभाव आणि नैतिक जबाबदारीचे भान न ठेवता वक्तव्य करणार्‍या या नेत्यांवर, विनोद बन्सल यांनी टीका केली. येमेनमधून ‘हुती’ अतिरेयांनी थेट सौदी अरबच्या रियाध विमानतळावर जो हल्ला केला, त्याबद्दल प्रियांका गांधी किंवा ओवेसी यांनी मौन बाळगल्याबद्दल या नेत्यांना बन्सल यांनी धारेवर धरले. एकीकडे दहशतवादाला कोणताही धर्म नसतो, असे म्हणायचे. पण, त्याच वेळी आपल्या मतपेढीवर डोळा ठेवून आपल्याला सोयीची वक्तव्ये करायची, असे तंत्र हे नेते अवलंबित असल्याकडेही विनोद बन्सल यांनी लक्ष वेधले आहे. निरपराध लोकांचे जे रक्त सांडले गेले, त्याकडे राजकीय चष्मा लावूनच पहायचे, असा या नेत्यांचा निर्धार असल्याचेच यावरून दिसून येते.
 
प्रियांका गांधी किंवा ओवेसी हे सातत्याने इस्रायलच्या विरोधात आणि पॅलेस्टाईनच्या बाजूने उभे राहिले आहेत. प्रियांका गांधी यांचा काँग्रेस पक्ष तर पॅलेस्टाईनवर हल्ला झाला की, नेहमीच अश्रू ढाळत आला आहे. इंदिरा गांधी यांच्या काळात तर, पॅलेस्टाईनचे दिवंगत नेते यासर अराफत यांचे तर खूपच कोडकौतुक केले जायचे! गाझा प्रदेशात इस्रायलने केलेल्या हल्ल्यांचाही, काँग्रेस आणि ओवेसी यांच्या पक्षाने वारंवार निषेध केला. पण, सौदी अरबची राजधानी असलेल्या रियाधच्या विमानतळावर, ‘हुती’ अतिरेक्यांनी हल्ला करून काही निरपराध लोकांचे बळी घेतले किंवा त्या हल्ल्यात शेकडो लोक जखमी झाले, त्याबद्दल मात्र या दोन्ही नेत्यांनी किंवा त्यांच्या पक्षांनी आवाज उठविला असल्याचे दिसून आले नाही.
 
गाझामध्ये जे निरपराध लोक मारले गेले, त्यांच्याबद्दल निषेध करणे हे जसे योग्य; तसेच रियाधमध्ये जे निरपराध लोक मारले गेले, त्यांचा निषेधही या नेत्यांनी करायला नको का? निरपराध जनतेला मारणे हा गुन्हा आहे. मग, तो कोणत्याही देशात आणि कोणाकडूनही घडलेला असो. त्यामुळे दहशतवाद्यांकडून जो हिंसाचार घडविण्यात येतो, त्याला जागतिक स्तरापासून सर्वत्रच एक फूटपट्टी लावायला हवी! एकास एक आणि दुसर्‍यास वेगळी असा भेदभाव केला जाता कामा नये. असदुद्दीन ओवेसी यांनी तर लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतानाही ‘जय पॅलेस्टाईन’ अशी घोषणा दिली होती. तर, प्रियांका गांधी यांनी सार्वजनिकरीत्या पॅलेस्टाईनला उघड पाठिंबा दिला आहे.
 
या पार्श्वभूमीवर ‘विश्व हिंदू परिषदे’चे नेते विनोद बन्सल यांनी, राजकीय नेते पॅलेस्टाईनला पाठिंबा देण्यासाठी, त्यांचे समर्थन करण्यासाठी एवढे उतावीळ होताना दिसतात. मग त्यांचा तो उतावीळपणा रियाधवर जो अतिरेकी हल्ला झाला, त्यावेळीही दिसून यायला नको का? प्रत्येक संघर्ष किंवा प्रत्येक देशासाठी या तत्त्वाचा समान वापर केला जायला नको का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. अशी भूमिका घेण्यास खरे म्हणजे कोणत्याही नेत्यास वावगे वाटायला नको पण, तसे होताना दिसत नाही. त्यांच्या भूमिका विसंगत असल्याचे वारंवार दिसून येते. आपल्या राजकारणासाठी अशी भूमिका घेणे सोयीचे नसल्याने, त्या नेत्यांची भूमिकाच दुटप्पी असल्याचे दिसते. खरे म्हणजे सौदी अरब आणि त्यांच्यावर हल्ला करणारे ‘हुती’ हे दोन्हीही मुस्लीमच. पण, या हल्ल्यांचा जगभरातील ५६हून अधिक मुस्लीम देशांकडून निषेध करण्यात आला नाही. पण, मोदी सरकारने या घटनेचा निषेध करून, मानवी हक्कांचे रक्षण करणे ही प्रत्येक समाजाची आणि प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी असल्याचे याद्वारे दाखवून दिले.
 
पण, भारतातील विरोधी पक्ष मात्र आपल्याला सोयीची भूमिका घेत असल्याचे दिसले. आपण वेगळी भूमिका घेतली, तर आपल्या मतपेढीचे काय होणार, असेच त्या पक्षांना वाटत आले आहे. त्यातूनच मग असे पक्ष आणि त्यांचे नेते दुटप्पी भूमिका घेताना दिसून येतात. ‘विश्व हिंदू परिषदे’चे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल यांनी असे वर्तन करणार्‍या विरोधकांचे पितळ उघडे पाडले आहे. असे असले, तरी विरोधी नेते किंवा पक्ष यांना आपलीच भूमिका योग्य आहे असे वाटत असेल, तर त्यांच्यापुढे कितीही आदळआपट केली; तरी त्यात बदल होण्याची शक्यता आहे का?
 
ओडिशात ‘अभाविप’ची मुसंडी!
 
‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’ने ओडिशा राज्यातील ६० महाविद्यालयांमध्ये, २५२ जागा बिनविरोध मिळविल्या असून, ही मोठीच उपलब्धी मानली जात आहे. २०२६-२७च्या विद्यार्थी संघटनांच्या निवडणुका होण्याआधी, विद्यार्थी परिषदेने हे घवघवीत यश प्राप्त केले. विद्यार्थ्यांशी सातत्याने संपर्क आणि महविद्यालय परिसरात वर्षभर होत असलेल्या विविध उपक्रमांमध्ये सहभागामुळे, ‘अभाविप’ला हे यश प्राप्त झाले.
 
‘अभाविप’ने दिलेल्या माहितीनुसार, अध्यक्षपदाच्या १२ जागा, सचिवपदाच्या १७ जागा, उपाध्यक्षपदाच्या २२ जागा आणि संयुक्त सचिवांच्या २३ जागा ‘अभाविप’ने बिनविरोध जिंकल्या आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर, या विजयावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब करण्यात येईल. अनेक महाविद्यालयांमध्ये काँग्रेसशी संलग्न असलेल्या ‘एनएसयूआय’ आणि ‘बिजू जनता दला’शी संलग्न असलेल्या ‘बिजू छात्र जनता दल’ यांना, आपले उमेदवारच उभे करता आले नाहीत. बेहरमपूर विद्यापीठातील महत्त्वाच्या जागा ‘अभाविप’ने जिंकल्या आहेत. ‘अभाविप’ने २०२६-२७ या वर्षासाठीचे आपले १३ कलमी संकल्पपत्र नुकतेच प्रसिद्ध केले. "आमच्या संघटनेला विद्यार्थ्यांचा वाढता पाठिंबा मिळत आहे, हेच या निकालांवरून दिसून येते,” असे ‘अभाविप’ने म्हटले आहे. विद्यार्थ्यांशी सातत्याने संपर्क आणि त्यांचा संपादन केलेला विश्वास हेच आमच्या यशाचे गमक असल्याचे, ‘अभाविप’चे राष्ट्रीय सचिव श्रावण बी. राज यांनी म्हटले आहे.
 
अयोध्येत दीपोत्सवाची तयारी!
 
प्रभू रामचंद्रांच्या अयोध्यानगरीमध्ये १०व्या दीपोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. पुढील महिन्यात दि. ५ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत हा दीपोत्सव होत आहे. या महोत्सवात ३३ लाख दिव्यांनी अयोध्यानगरी, शरयू नदीचे घाट उजळून निघणार आहेत. शरयू तीरावरील ‘राम की पैडी’सह, सुमारे दोन किलोमीटरच्या पट्ट्यात हे दिवे लावण्यात येणार आहेत. ३३ लाख दिव्यांनी उजळून निघणारी अयोध्यानगरी आपला १०वा दीपोत्सव साजरा करीत असून, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली या महोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. यानिमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, त्यासाठी शरयू किनारी विशेष रंगमंचाची व्यवस्था करण्यात येत आहे. या महोत्सवात ३३ लाख पणत्या लावण्यात येणार असून, त्यासाठी ६५ लाख वाती आणि ५५ हजार लिटर इतके तेल लागणार आहे. ठरलेल्या कालावधीत सर्व व्यवस्था पूर्ण व्हाव्यात, यासाठी विविध यंत्रणा कामास लागल्या आहेत. हा दीपोत्सव यशस्वी करण्यासाठी, सुमारे ३४ हजार स्वयंसेवक कार्यरत राहणार आहेत. या कालावधीत अयोध्यानगरीतील विविध मंदिरांवर आकर्षण रोशणाईही करण्यात येणार आहे. या दीपोत्सवास होणारी भाविकांची संख्या लक्षात घेऊन योग्य सुरक्षाव्यवस्था, सुयोग्य वाहतूक व्यवस्था, स्वच्छता या सर्वांकडे लक्ष दिले जाणार आहे. अयोध्यानगरीत होणार्‍या या १०व्या दीपोत्सवात पर्यटक, भाविक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे गृहीत धरूनच, त्यादृष्टीने उत्तम व्यवस्था करण्याची तयारी उत्तर प्रदेश सरकारकडून केली जात आहे.
 
दत्ता पंचवाघ
९८६९०२०७३२




संबंधित मजकूर