सांख्यिकी, भौतिकशास्त्र आणि गणित विषयात ‘बीएससी’चे शिक्षण घेतल्यानंतर पुण्यातील आयटी कंपनीत चांगली नोकरी मिळाली. मात्र, हे क्षेत्र आपल्यासाठी नाही, ही हुरहुर कायम मनात होती. अखेर आवडीचा नव्याने शोध घेत आयटी क्षेत्राला रामराम करून निसर्गाला वाहून घेतलेल्या नागपूरच्या प्राची माहुरकर या निसर्गकन्येची ही प्रेरणादायी कहाणी...
ची माहुरकर यांचा जन्म नागपूरचा. बुटीबोरीजवळ वडिलांचे शेत. आई-वडील अत्यंत धाडसी. वडील अक्षरशः साप खिशात घेऊन फिरायचे. दुर्दैवाने, प्राची लहान असतानाच वडिलांचे निधन झाले. वडील गेल्यानंतर आईने आपले उच्च शिक्षण पूर्ण केले आणि हिमतीने नोकरी सांभाळत मुलांना वाढवले. पुढे लग्नानंतर प्राची पुण्यात स्थायिक झाल्या.
त्यावेळी आयटी क्षेत्राची प्रचंड भुरळ. त्यामुळे त्यांनीसुद्धा एका खासगी कंपनीत नोकरी सुरू केली. मात्र, हे क्षेत्र आपल्यासाठी नाही, असा विचार वारंवार त्यांच्या मनात यायचा. वयाच्या पस्तिशीत निसर्ग आणि शेती यांकडे आपला कल आणि आवड असल्याचे त्यांना जाणवले. पुढे त्यांनी नैसर्गिक संसाधनांचा शाश्वत विकास आणि निसर्ग संवर्धन या विषयात पदव्युत्तर पदविका प्राप्त केली. पुण्यातील ‘इकोलॉजिकल सोसायटीं’सोबत काही काळ काम केले आणि नंतर नागपूरला परत जाण्याचा निर्णय घेतला. पुढे नोकरी सोडून नागपूर जिल्ह्यातील काटोलजवळ असंख्य पर्यावरणीय आव्हाने असलेली आठ एकर शेती खरेदी करून ती नैसर्गिकरीत्या कसली.
यासोबतच ‘पुनर्नवा इकोलॉजिकल सर्व्हिसेस अॅण्ड इको-डिझाईन सोल्युशन्स’ या आपल्या सल्लागार संस्थेमार्फत खासगी किंवा सार्वजनिक जमिनींचे पर्यावरणीय विकास आणि पुनरुज्जीवन करण्याचे कार्य त्या करतात. ही संस्था विविध अधिवास आणि निसर्ग-मार्गिकांच्या पुनरुज्जीवनासाठी सल्ला देते. तसेच जमिनीवरील वनस्पती व प्राणी विविधता वाढवण्यास मदत करते. शिवाय, पर्यावरणपूरक बांधकाम पद्धतींसाठीही ही संस्था मार्गदर्शन करते.
नागपूर येथे ‘इकॉलॉजिकल कन्सल्टन्सी’ सुरू करून त्यातून त्या पर्यावरणविषयक सेवा देतात. याअंतर्गत त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील ‘सोमनाथ’ प्रकल्पांतर्गत दोन हजार एकर जमिनीसाठी ‘मास्टर प्लॅन’ आणि पर्यावरणीय पुनरुज्जीवन आराखडा तयार केला. तसेच उमरेड भागात एक हजार हेक्टर जमिनीवर पाणलोट क्षेत्र विकासाचे काम पूर्ण केले.
प्राचीताईंनी नागपूर महापालिकेसाठी वृक्षगणनेचा एक प्रकल्प हाती घेतला. यातून नागपूरची संपूर्ण जैवविविधता त्यांनी मांडली आणि त्याआधारे कुठल्या उपयोगितेसाठी कुठली झाडे लावावी, याबाबत एक पुस्तिका तयार केली. चुकीच्या वृक्षारोपणामुळे होणारी निसर्गाची हानी रोखणे, हा यामागील उद्देश. याव्यतिरिक्त रानभाज्यांविषयीचे एक सचित्र पुस्तकही लिहिले.
त्यांनी दुर्मीळ प्रजातींच्या वनस्पतींच्या संवर्धनासाठी रोपवाटिका विकसित केली. पर्यावरणपूरक स्वच्छतापद्धतींवर अभ्यास आणि संशोधन, वृक्ष ओळखण्यासाठी ‘ट्री वॉक्स’, नदीच्या परिसंस्थेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘रिव्हर वॉक्स’, अनेक संस्था किंवा शाळांच्या माध्यमातून विविध वयोगटांसाठी पक्षी निरीक्षणाचे सत्र आयोजित करण्यासोबतच शाश्वत शेतीचा अवलंब आणि प्रसार त्यांच्यामार्फत सातत्याने सुरू आहे.
नागपूर महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाच्या समितीवर सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले. नागपुरातील मंडळी ‘सिमेंट रस्त्यामुळे झाडे गुदमरत आहेत,’ म्हणत होती, तरीही मनपा त्याकडे दुर्लक्ष करत आहे, हे दिसल्यावर प्राची यांच्यासोबत इतर तिघांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाच्या आदेशान्वये एक समिती स्थापन झाली, ज्यात प्राची यांचाही समावेश होता. पुढे त्यांनी आपल्या कामातून नागपुरातील नऊ हजार झाडे सिमेंटमुक्त केली. पर्यावरणविषयक आंदोलन, मोर्चे, जनजागृती यांसोबतच पर्यावरणाच्या विविध लढ्यांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. मात्र, हे सगळे सुरू असताना प्राची यांनी आपली शिक्षणाची भूक कायम ठेवली. तीन वर्षांपूर्वीच ‘पर्यावरणशास्त्र’ विषयात पदव्युत्तर पदवी पूर्ण केली. शिवाय, पर्यावरणाशी संबंधित विविध अभ्यासक्रमही पूर्ण केले आहेत.
सासरच्या मंडळींनी कधी शेती जवळून पाहिलीही नव्हती. त्यामुळे प्राची यांच्या शेती करण्याच्या निर्णयाबाबत सुरुवातीला त्यांच्या मनात काहीशी साशंकता होती. मात्र, आपल्या मेहनतीने त्यांनी शेती उभी केली आणि त्यांच्या कामातून मिळालेल्या यशाने हीच साशंकता आता अभिमानात बदलली आहे. या संपूर्ण प्रवासात त्यांच्या पतीने त्यांना भक्कम साथ दिली. मात्र, "या प्रवासात अजूनही माझ्याकडून चुका होतात; पण त्यातून शिकत पुढे जाण्याचा माझा प्रयत्न असतो,” असे प्राची सांगतात.
बीज संवर्धनाची चळवळ
दरम्यान, २०१३ला नागपूरमध्ये स्थायिक झाल्यानंतर प्राची यांची ‘बीजोत्सव’ समूहाशी ओळख झाली. देशी बियाण्यांच्या संवर्धनासह विषमुक्त शेती आणि शाश्वत जीवनशैलीचा प्रचार प्रसार करणारा ‘बीजोत्सव’ हा एक समूह. सुरुवातीला कार्यकर्त्या म्हणून ‘बीजोत्सवा’च्या कामात रुजू झालेल्या प्राची यांनी आज या चळवळीची नागपुरातील बरीचशी जबाबदारी घेतलीये. दरवर्षी, तीन दिवसीय कार्यक्रम आयोजित करून त्यातून शेतकर्यांना थेट ग्राहकांशी जोडण्याचे काम ‘बीजोत्सवा’च्या माध्यमातून होते.
वातावरणातील बदलांचे मोठे आव्हान पेलत पर्यावरण संवंर्धनाचे काम आणि त्याबद्दलची जनजागृती निरंतर सुरू ठेवण्याचा प्राची यांचा मानस आहे.