सोलापूरच्या माळरानात आढळला पक्ष्यांमधला ‘सुपरमॅन’

    13-Oct-2026

Solapur Grassland

 

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने सोलापूरच्या गवताळ माळरानाला आंतरराष्ट्रीय स्थलांतरित पक्ष्याची अनोखी भेट मिळाली आहे (Solapur Grassland). हजारो किलोमीटरचा सागरी प्रवास करून सायबेरिया आणि अलास्कातून भारतात येणाऱ्या दुर्मिळ पॅसिफिक गोल्डन प्लोव्हर (Pacific Golden Plover) अर्थात सोनेरी चिखल्या या हिवाळी पाहुण्याचे सोलापूरच्या माळरानावर आगमन झाले आहे (Solapur Grassland). विशेष म्हणजे, एका ठिकाणी सुमारे तीन सोनेरी चिखल्या दिसून आल्याने पक्षीप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. (Solapur Grassland)

 

पॅसिफिक गोल्डन प्लोव्हर हा भारताचा स्थानिक पक्षी नसून लांब पल्ल्याचा स्थलांतरित पक्षी आहे. उत्तर ध्रुवीय प्रदेशातील अलास्का आणि सायबेरियातील अतिशय थंड भागात प्रजनन केल्यानंतर हा पक्षी हिवाळ्यात आशियातील विविध भागांकडे स्थलांतर करतो. भारतात साधारण ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत त्याची नोंद होते. या स्थलांतरादरम्यान त्याला हजारो किलोमीटरचा खडतर प्रवास करावा लागतो. पक्षीनिरीक्षक शिवानंद हिरेमठ, नागेशराव, प्रशांत पाटील आणि अमित दारुणकर नुकतेच सोलापूरच्या माळरान परिसरात पक्षीनिरीक्षणासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना नेहमीच्या पक्ष्यांपेक्षा वेगळ्या आकाराचा आणि रंगाचा पक्षी दिसला. अधिक बारकाईने निरीक्षण केल्यानंतर हा पक्षी पॅसिफिक गोल्डन प्लोव्हर असल्याचे स्पष्ट झाले. 

या पक्ष्याच्या शरीरावरील सोनेरी-पिवळसर आणि काळसर नक्षीदार पिसांमुळे त्याला ‘गोल्डन प्लोव्हर’ हे नाव मिळाले आहे. सध्या सोलापूरमध्ये दिसणारा पक्षी हिवाळी किंवा नॉन-ब्रीडिंग पिसांमध्ये आहे. प्रजनन काळात मात्र त्याच्या शरीरातील रंगरूप पूर्णपणे बदलते. नराच्या छातीपासून पोटापर्यंतचा भाग काळाभोर होतो आणि सोनेरी-काळ्या रंगांची उठावदार रचना अधिक स्पष्ट दिसते. पॅसिफिक गोल्डन प्लोव्हरच्या स्थलांतरातील सर्वांत थक्क करणारी बाब म्हणजे त्याची अफाट उडण्याची क्षमता. विशेषतः अलास्का आणि हवाईदरम्यानच्या समुद्रावरील प्रदीर्घ प्रवासात हा पक्षी मोठ्या अंतरासाठी जवळजवळ अखंड उड्डाण करू शकतो. या अद्भुत स्थलांतर क्षमतेमुळे पक्षीनिरीक्षक आणि अभ्यासकांच्या दृष्टीने तो अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण पक्षी मानला जातो. लहान चोच, तुलनेने मोठे आणि तल्लख डोळे आणि मजबूत शरीरयष्टी ही त्याची वैशिष्ट्ये आहेत. जमिनीवर खाद्य शोधताना तो माळरानावर वेगाने चालत लहान कीटक, अळ्या तसेच इतर लहान अपृष्ठवंशी प्राणी टिपतो. मोकळी गवताळ माळराने, चिखलयुक्त भाग, पाणथळ परिसर आणि ओसाड जमिनी त्याच्या अधिवासासाठी महत्त्वाच्या ठरतात.

 

माळरानाच्या संवर्धनाची गरज

सोलापूरच्या माळरानात या स्थलांतरित पक्ष्याची झालेली नोंद केवळ पक्षीप्रेमींसाठी आनंदाची बाब नाही, तर या परिसराच्या जैवविविधतेचे महत्त्व अधोरेखित करणारी घटना आहे. माळरानांकडे अनेकदा पडीक किंवा उपयोगात नसलेली जमीन म्हणून पाहिले जाते. मात्र, अशाच मोकळ्या अधिवासांवर स्थानिक तसेच हजारो किलोमीटरचा प्रवास करून येणारे स्थलांतरित पक्षी अवलंबून असतात. वन्यजीव सप्ताहात झालेली सोनेरी टिटवीची ही नोंद सोलापूरच्या माळरानांचे आंतरराष्ट्रीय स्थलांतरित पक्ष्यांसाठी असलेले महत्त्व अधोरेखित करणारी ठरली आहे. त्यामुळे अशा अधिवासांचे अतिक्रमण, अनियंत्रित विकास आणि अधिवासातील बदल रोखून माळरानांचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे.





संबंधित मजकूर