सिंहस्थासाठी निधीची ग्वाही

    13-Oct-2026


Nashik Simhastha Kumbh Mela
 
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणार्‍या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंहस्थासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ठाम ग्वाही देत नाशिककरांना आश्वस्त केले. परिणामी, राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचा विश्वासच मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनातून व्यक्त होत आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर ही धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचीच धार्मिकस्थळे आहेत. त्यात दर १२ वर्षांनी भरणार्‍या सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे, या स्थळांना देश-विदेशात अधिक महत्त्व प्राप्त झाले. सिंहस्थासाठी या दोन्ही शहरांत लाखो भाविक, साधू-संत आणि पर्यटक दाखल होणार आहेत. या प्रचंड गर्दीचे नियोजन करताना वाहतूक व्यवस्था, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्यसुविधा, निवास व्यवस्था आणि सुरक्षा यांसारख्या बाबींवर, शासन आणि प्रशासनाला विशेष लक्ष द्यावे लागते. त्यासाठीच सिंहस्थ सुरू होण्याच्या दोन वर्षे आधीपासूनच नियोजन करून, विविध सुविधांच्या उभारणीला प्राथमिकता प्रशासनाकडून दिली जाते.
 
भाविकांना सुरक्षित, स्वच्छ आणि सुलभ वातावरणात धार्मिक विधी करता यावेत, यासाठीही पायाभूत सुविधांचा विकास आवश्यक असाच. म्हणूनच, मुख्यमंत्री फडणवीस यांनी निधीची कमतरता भासू देणार नसल्याचे स्पष्ट केल्याने, सिंहस्थाच्या तयारीला आता अधिक गती मिळेल. सिंहस्थाच्या निमित्ताने नाशिक शहरासह परिसरातील रस्ते, सार्वजनिक वाहतूक, स्वच्छता आणि नागरी सुविधांमध्ये सुधारणा करण्याची मोठीच संधी उपलब्ध होणार आहे. या कामांचा लाभ कुंभमेळ्यापुरताच मर्यादित न राहता, स्थानिक नागरिकांनाही दीर्घकाळ मिळू शकतो. तसेच पर्यटन, स्थानिक व्यापार आणि रोजगारनिर्मितीलाही चालना मिळण्याचीही शक्यता मोठी आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, रस्त्यांच्या समस्येमुळे नाशिककर हैराण झाले असून, आतापर्यंत १४ जणांचा रस्ते अपघातात बळी गेला आहे. त्यामुळे या प्रश्नाला विरोधक प्रमाणापेक्षा जास्त हवा देण्याचे काम करत आहे. आता थेट नाशिकमध्येच निधीबाबतची घोषणा केल्याने, विरोधकांकडे सध्यातरी कोणताच मुद्दा शिल्लक राहिलेला दृष्टिक्षेपात नाही.
 
विरोधक चारीमुंड्या चित
 
आता खुद्द नाशिकमध्येच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंहस्थासाठी निधीची कमतरता पडू देणार नसून, त्यातून करण्यात येणारी विकासकामे पुढील अनेक वर्षेही नाशिककरांसाठी उपयोगी पडतील अशी ग्वाही दिल्याने, सरकारला बदनाम करण्याचा विडा उचललेल्या विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या इच्छा- आकांक्षांना धुमारे फुटण्याआधीच मुख्यमंत्री फडणवीस यांच्या घोषणेने शांत केले आहे. सिंहस्थाच्या निमित्ताने केवळ तात्पुरत्या सोयीसुविधा उभारण्याऐवजी, पुढील अनेक वर्षे टिकतील आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडवतील, अशी विकासकामे उभारण्याचा सरकारचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या दूरदृष्टीमुळे सिंहस्थाच्या आयोजनाला विकासाची व्यापक जोड मिळत असून, विरोधकांच्या टीकेला विकासाच्या मुद्द्यावरूनच चोख प्रत्युत्तर मिळत असल्याचे सकारात्मक चित्र आहे.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासदृष्टीतूनच, नाशिकच्या भविष्यातील गरजांचा विचार केला जात असल्याचा संदेश नाशिककरांपर्यंत पोहोचला आहे. नियोजनबद्ध रस्ते, सुधारित वाहतूक व्यवस्था, सक्षम पाणीपुरवठा, स्वच्छतेच्या आधुनिक सुविधा आणि सार्वजनिक पायाभूत सुविधांचा विकास, याचा शहराच्या वाढत्या लोकसंख्येला भविष्यातही लाभ होऊ शकतो. विकासकामांबाबत केवळ आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा त्यांच्या दर्जावर, नियोजनावर आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीवर चर्चा होणे आवश्यकच. सिंहस्थाच्या निमित्ताने होणारी कामे वेळेत पूर्ण झाली, निधीचा पारदर्शक वापर झाला आणि त्यांचा लाभ नागरिकांना दीर्घकाळ मिळाला; तर सरकारच्या भूमिकेला निश्चितच बळ मिळेल. विरोधकांकडून होणार्‍या टीकेला उत्तर देताना, सरकारची खरी ताकद कामातून दिसून येत आहे. सिंहस्थाला केवळ धार्मिक आयोजन न मानता, नाशिकच्या दीर्घकालीन विकासाची संधी म्हणून पाहण्याची भूमिका ही सकारात्मक बाब. सिंहस्थाच्या माध्यमातून आधुनिक, स्वच्छ आणि सुविधासंपन्न नाशिक घडले, तर तो शहराच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा ठरेल. अशा परिस्थितीत विकासाच्या मुद्द्यावर विरोधकांना चारीमुंड्या चित करण्याची संधी सरकारला प्रत्यक्ष कामगिरीतून मिळणार असून, येणार्‍या प्रत्येक निवडणुकीत नाशिककर विरोधकांना विरोधकच ठेवतील, एवढे मात्र निश्चित.
 
-विराम गांगुर्डे




संबंधित मजकूर