न्यूयॉर्क विमानतळावर मोहम्मद युनूस यांच्याविरोधात निदर्शने; ‘तुम्ही दहशतवादी आहात, परत जा!’च्या घोषणा

    13-Oct-2026   


Muhammad Yunus New York Airport Protest

 
मुंबई (Muhammad Yunus New York Airport Protest) : बांगलादेशच्या माजी अंतरिम सरकारचे प्रमुख आणि नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनूस यांना न्यूयॉर्क विमानतळावर जोरदार विरोधाचा सामना करावा लागला. बांगलादेशी वंशाच्या नागरिकांनी त्यांना ‘दहशतवादी’ संबोधत मायदेशी परतण्याची मागणी केली. हजारो लोकांच्या मृत्यूला युनूस जबाबदार असल्याचा आरोपही आंदोलकांनी केला. या घटनेमुळे बांगलादेशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीचे आणि युनूस यांच्या कार्यकाळाबाबत परदेशात राहणाऱ्या बांगलादेशी समुदायातील काही घटकांमध्ये असलेल्या नाराजीचे चित्र समोर आले आहे.
 
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये मोहम्मद युनूस व्हीलचेअरवर बसलेले दिसत आहेत. एक व्यक्ती त्यांची व्हीलचेअर पुढे नेत असताना काही जण त्यांच्याजवळ आले आणि जोरजोरात घोषणा देऊ लागले. या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीचा आवाज स्पष्टपणे ऐकू येतो. तो युनूस यांना ‘दहशतवादी’ संबोधत म्हणतो, “तुम्ही दहशतवादी आहात. येथे कशासाठी आला आहात? परत जा.” आंदोलकांनी युनूस यांच्यावर बांगलादेशात हजारो लोकांच्या हत्या घडवून आणल्याचा, पोलिसांच्या मृत्यूला जबाबदार असल्याचा, सुमारे दोन लाख लोकांना अटक करवून घेतल्याचा आणि लोकशाही नष्ट केल्याचा आरोप केला. काही जणांनी ‘परत जा’ अशा घोषणाही दिल्या.(Muhammad Yunus New York Airport Protest)
 
सुरक्षेच्या कारणास्तव युनूस यांना तातडीने विमानतळाबाहेर नेण्यात आले. मात्र, या घटनेवर युनूस किंवा त्यांच्या प्रतिनिधींकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी घडली. अंतरिम सरकारमधून बाहेर पडल्यानंतर युनूस पहिल्यांदाच परदेश दौऱ्यावर होते. काही वृत्तांमध्ये आरोप करणाऱ्यांपैकी एका व्यक्तीचा संबंध अवामी लीगशी असल्याचे म्हटले आहे. या पक्षाच्या हालचालींवर बांगलादेशात बंदी असल्याचेही वृत्तांत नमूद करण्यात आले आहे. मात्र, संबंधित व्यक्तीची ओळख अद्याप स्वतंत्रपणे पडताळण्यात आलेली नाही.(Muhammad Yunus New York Airport Protest)
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर