मासिक पाळी हा अलीकडे सातत्याने चर्चेला आलेला विषय. नवरात्रात कुमारिकापूजनाचे महत्त्व फार मोठे. या स्त्रीशक्तीचा जागार करताना, तिच्या शरीरधर्माकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. याच अनुषंगाने ‘आरोग्य भारती’चा ‘किशोरी स्वास्थ्य’ या आयामाच्या कार्याचा आढावा घेणारा हा लेख...
भारतीय संस्कृतीत कुमारिका म्हणजे देवीचे रूप. नवरात्रीत कुमारिकापूजनातूनच आपण स्त्रीशक्तीला वंदन करतो. तिच्यात आपण देवीचे दर्शन घेतो. पण, एक प्रश्न आपण स्वतःला विचारणे आवश्यक आहे की, जिच्यात देवी पाहतो, तिच्या आरोग्याकडे आपण किती लक्ष देतो? कुमारिकेच्या पायावर अक्षता ठेवताना तिच्या पोषणाची, मासिक पाळीची, मानसिक आरोग्याची, सुरक्षिततेची आणि भविष्यातील आरोग्याचीही काळजी घेणे, हेच आधुनिक काळातील कुमारिका पूजन. याच विचारातून ‘आरोग्य भारती’चा ‘किशोरी स्वास्थ्य’ हा आयाम महत्त्वाचा ठरतो.
किशोरावस्था : शरीर, मन आणि भविष्य घडविण्याचा काळ : दहा ते १९ वर्षे हा मुलींच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा. शरीराची वाढ, हार्मोनल बदल, मासिक पाळीची सुरुवात, भावनिक परिपक्वता, आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्त्वाची जडणघडण याच काळात घडते. आज या वयात नवी आव्हाने आहेत. जंक फूड आणि अनियमित आहार, अॅनिमिया आणि पोषणातील कमतरता, वाढते वजन आणि ‘पीसीओएस’, व्यायामाचा अभाव, अपुरी झोप, स्क्रीनटाईम, समाजमाध्यमांमुळे शरीरयष्टीची तुलना, करिअरचे दडपण, मानसिक ताण, मासिक पाळीविषयी गैरसमज, ऑनलाईन जगातील असुरक्षितेची आव्हाने आज आहेत. म्हणूनच किशोरी स्वास्थ्य म्हणजे पोषण + शारीरिक आरोग्य + मासिक पाळी + मानसिक स्वास्थ्य + योग व व्यायाम + डिजिटल शिस्त + सुरक्षितता + आरोग्यसाक्षरता होय.
कृतीसूचना : आजपासून प्रत्येक पालकाने महिन्यातून एकदा मुलीसोबत ‘माझ्या आरोग्याबद्दल’ असा मोकळा संवाद करावा. शाळा, महाविद्यालये आणि ‘आरोग्य भारती’च्या शाखांनी सातत्याने किशोरी स्वास्थ्य सत्रे घ्यावीत.
‘आरोग्य भारती’ची दिशा : आजारावर उपचारापेक्षा आरोग्याची पूर्वतयारी : ‘आरोग्य भारती’चा मूलभूत विचार प्रतिबंधात्मक आरोग्य, निरोगी जीवनशैली, आरोग्यशिक्षण आणि समाजसहभागातून आरोग्यनिर्मितीचा आहे. म्हणूनच किशोरीकडे पाहताना प्रश्न ‘तिला काय आजार आहे?’ हा नसावा. तर ‘ती निरोगी राहण्यासाठी आपण काय करू शकतो.’ हा असावा. ‘आरोग्य भारती’च्या माध्यमातून डॉटर, योगतज्ज्ञ, शिक्षक, पालक, आरोग्यसेवक आणि समाजातील स्वयंसेवकाांना एकत्र आणून, याला एक लोकचळवळ करता येऊ शकते.
कृतीसूचना : प्रत्येक ‘आरोग्य भारती’ केंद्राने आपल्या परिसरातील शाळा किंवा किशोरी गटाशी जोडून, ‘किशोरी स्वास्थ्य-एक वर्षाचा कृती कार्यक्रम’ सुरू करावा.
‘माझी पाळी-माझे आरोग्य’ : मासिक पाळी ही लपवण्याची गोष्ट नाही. किशोरवयीन मुलीला स्वतःच्या मासिक चक्राची माहिती असायलाच हवी. पाळी कधी आली; किती दिवसांनी आली; किती दिवस राहिली; रक्तस्राव किती झाला; वेदना किती होत्या, यांची नोंद ठेवण्याची सवय तिला लावावी. खूप वेदना, अतिरक्तस्राव, वारंवार पाळी चुकणे किंवा अनेक महिने पाळी न येणे, यांकडे दुर्लक्ष करू नये, त्याचे कारण शोधणे महत्त्वाचे
कृतीसूचना : किशोरवयीन मुलीने ’झशीळेव ऊळरीू’ ठेवावी, अतिवेदना, अतिरक्तस्राव किंवा दीर्घकाळ पाळी न येणे यांसाठी योग्य डॉटरांचा सल्ला घ्यावा, ‘आरोग्य भारती’ने ‘माझी पाळी-माझे आरोग्य’ संवाद सत्रे घ्यावीत.
किशोरीचे ताट : आजचे पोषण, उद्याचे आरोग्य: किशोरवयात शरीराची वाढ झपाट्याने होते. त्यामुळे विविध पोषक घटकांची गरज वाढते. त्यामुळे तिच्या ताटात डाळी-उसळी + पालेभाज्या + भाज्या + फळे + दूध/दुग्धजन्य पदार्थ + श्रीधान्ये + कडधान्ये + शेंगदाणे + तीळ + सुकामेवा असू द्यावा. फक्त वजन वाढू नये म्हणून जेवण कमी करणे योग्य नाही.
कृतीसूचना : ‘किशोरीचे पौष्टिक ताट’ हा उपक्रम प्रत्येक शाळा किंवा ‘आरोग्य भारती’ केंद्रात घेता येईल. पालकांनी आठवड्यातून एक दिवस मुलीबरोबर बसून, तिच्या आहाराचा आढावा घ्यावा.
अॅनिमिया : दिसत नाही, पण परिणाम मोठा : सतत थकवा, चक्कर, अशक्तपणा, एकाग्रता कमी होणे यांमागे अॅनिमिया असू शकतो. मासिक पाळी सुरू झाल्यानंतर मुलींमध्ये लोहाची गरज वाढते. म्हणूनच किशोरवयीन मुलीच्या आरोग्य तपासणीत, हिमोग्लोबिनकडे दुर्लक्ष करता कामा नये.
कृतीसूचना : ‘आरोग्य भारती’च्या माध्यमातून हिमोग्लोबिन तपासणी, पोषण मार्गदर्शन, वैद्यकीय उपचार- फॉलोअप ही संपूर्ण साखळीच तयार करता येईल. फक्त ‘तपासले’ एवढ्यावरच थांबायचे नाही, तर ’सुधारले का,’ हेही महत्वाचे.
‘पीसीओएस’ आणि वाढते वजन : ‘पीसीओएस’ ही केवळ पाळीची समस्या नाही. वजन, आहार, शारीरिक हालचाल, झोप आणि चयापचयाशी संबंधित अनेक घटक याच्या मुळाशी आहेत. म्हणूनच किशोरवयीन मुलीच्या दैनंदिन जीवनात योग, सूर्यनमस्कार, खेळ, चालणे, संतुलित आहार, पुरेशा झोपेचा समावेश आवश्यक आहे. किशोरवयीन मुलीला निरोगी जीवनशैली जगायला शिकवणे अधिक महत्त्वाचे.
कृतीसूचना : दररोज किमान ३०-६० मिनिटे व्यायामाचा प्रयत्न करावा. टीव्ही किंवा मोबाईलचा वेळ कमी करून चालणे, खेळ, योग, सूर्यनमस्काराला वेळ देणे महत्त्वाचे. पाळीतील सततचे बदल किंवा लक्षणे चिंताजनक असल्यास, तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
मनाचे आरोग्य : आज मुलींच्या हातात मोबाईल आहे; पण तिच्या मनाचा अवाज ऐकणार कोण? अभ्यास, शरीरयष्टी, मैत्री, समाज माध्यम, करिअर, कौटुंबिक अपेक्षा यांचा ताण तिच्यावर असू शकतो. म्हणूनच घरात ‘आधी ऐकायचे, नंतर सल्ला द्यायचा.’ हा नियम असावा. तसेच, तिच्या प्रत्येक अडचणीला ‘काही नाही’ म्हणून नाकारूही नये. सतत उदास राहणे, झोप किंवा भूक बदलणे, सामाजिक संपर्क कमी होणे किंवा मानसिक ताणाचा परिणाम होत असल्यास तज्ज्ञांची मदत घ्यावी.
कृतीसूचना : दर आठवड्याला ‘छे र्गीवसशाशपीं - फक्त संवाद’ असा १५-२० मिनिटांचा संवाद कुटुंबात ठेवूया. गरज असल्यास मानसिक आरोग्यतज्ज्ञांचीही मदत घेणेही स्वतःची जबाबदारी आहे.
डिजिटल युगातील किशोरी : आजच्या किशोरवयीन मुलीला डिजिटल जगापासून दूर ठेवणे, शयही नाही आणि आवश्यकही. पण तिला डिजिटल जगाचा विवेकपूर्ण वापर शिकवणे आवश्यक आहे.
कृतीसूचना : घरात काही साधे नियम ठरवूया. झोपण्यापूर्वी स्क्रीनचा वापर कमी करणे, जेवताना मोबाईल दूर ठेवणे, अभ्यास आणि मनोरंजनासाठी स्क्रीनचा वेगळा वापर, समाज माध्यमांवरील अवास्तव शरीरयष्टीच्या कल्पनांपासून सावध राहणे, ऑनलाईन अनोळखी व्यक्तींशी संवाद साधताना सुरक्षितता बाळगणे, सायबरबुलिंग झाल्यास लगेच विश्वासू व्यक्तीशी बोलणे याचा यात समावेश असावा.
योग, सूर्यनमस्कार आणि खेळ : किशोरवयीन मुलीच्या आरोग्यात शारीरिक हालचालीला विशेष महत्त्व आहे. योग, सूर्यनमस्कार, प्राणायाम, खेळ आणि नियमित चालणे या सवयी, मनालाही आधार देऊ शकतात. इमारतीची गच्ची, शाळेचे मैदान किंवा समाजमंदिराची जागा उपक्रम सुरू करण्यासाठी एवढे पुरेशी आहे.
कृतीसूचना : ‘आरोग्य भारती’च्या माध्यमातून ‘दररोज सूर्यनमस्कार’, ‘किशोरी योग सत्र’ किंवा ‘खेळूया-निरोगी राहूया’ असे स्थानिक उपक्रम सुरू करता येतील.
एक किशोरी-एक आरोग्यदूत : किशोरवयीन मुलीने स्वतःच्या आरोग्याची माहिती घ्यावी, आणि आपल्या मैत्रिणींनाही योग्य माहिती द्यावी. अॅनिमिया म्हणजे काय; पौष्टिक आहार का आवश्यक; पाळीविषयीचे गैरसमज; व्यायामाचे महत्त्व; मानसिक ताण आल्यास कोणाशी बोलावे; डॉटरांचा सल्ला कधी घ्यावा, याबाबत ती सांगू शकेल.
कृतीसूचना : ‘आरोग्य भारती’च्या प्रत्येक केंद्राने, काही किशोरीवयीन मुलींना ‘किशोरी आरोग्यदूत’ म्हणून प्रशिक्षित करावे. त्यांना तज्ज्ञांकडून आरोग्यज्ञान देऊन, ‘शिकूया आणि शिकवूया’ हा दृष्टिकोन रुजवावा.
पालकांचा दृष्टिकोन बदलला, तर किशोरीचे जग बदलते : मुलीला बदलण्यापेक्षा, अनेकदा पालकांचा दृष्टिकोन बदलणेच अधिक आवश्यक असते. आईने मुलीशी पाळीबद्दल बोलावे, वडिलांनीही या कडे सहजतेने पाहावे, घरात आरोग्य, शरीरातील बदल, सुरक्षितता, मानसिक ताण, करिअर आणि नातेसंबंधांबद्दल वयानुरूप, संस्कारक्षम संवाद महत्त्वाचा
कृतीसूचना : ‘आरोग्य भारती’च्या माध्यमातून, ‘किशोरीसाठी पालक संवाद सत्र’ आयोजित करता येईल. आई-वडिलांना मुलीचे ऐकून घेण्याचा एक साधा संदेशही देता येईल.
किशोरी स्वास्थ्य चळवळीचा शाळेत श्रीगणेशा: किशोरवयीन मुलीचा दिवसाचा मोठा भाग शाळेत जातो. म्हणूनच शाळा किशोरी स्वास्थ्याची प्रभावी केंद्रे होऊ शकतात. या प्रश्नांशी संबंधित विविध विषय दर महिन्याला घेता येतील.
कृतीसूचना : ‘आरोग्य भारती’च्या माध्यमातून शाळांमध्ये ‘किशोरी आरोग्य वर्षचक्र’ राबवता येईल. शिक्षक, पालक, आरोग्यतज्ज्ञ आणि किशोरी यांना, या प्रक्रियेत सहभागी करून घ्यावे.
आरोग्यभारती : कार्यक्रम नव्हे, आरोग्यचळवळ
किशोरी स्वास्थ्य एखाद्या दिवसाच्या शिबिरापुरते मर्यादित राहू नये. कुटुंब, शाळा, आरोग्यतज्ज्ञ, समाज, ‘आरोग्य भारती’ अशी साखळी तयार झाली, तरच परिणाम दीर्घकालीन दिसेल. वैद्यकीय ज्ञान समाजापर्यंत नेऊन, समाजाला आरोग्याचा भागीदार करणे, हीच ‘आरोग्य भारती’ची ताकद आहे.
कृतीसूचना : प्रत्येक ‘आरोग्य भारती’ केंद्राने आपल्या परिसरासाठी किमान पाच कृती निश्चित कराव्यात. यात किशोरी आरोग्य संवाद, हिमोग्लोबिन व पोषण जागृती, योग-सूर्यनमस्कार, पालक संवाद, किशोरी आरोग्यदूत, यांचा समावेश असावा. यातून ‘एक किशोरी, एक कुटुंब, एक निरोगी पिढी’ हा प्रवास सुरू होईल. कुमारिकेच्या चरणी फुले वाहणे ही श्रद्धा आहे; तिच्या आरोग्याची काळजी घेणे, ही जबाबदारी आहे. आजची कुमारिका केवळ उद्याची माताच नाही, ती आजची व्यक्तीही आहे आणि उद्याच्या समाजाची शिल्पकारही. तिचे शरीर निरोगी, मन स्थिर, भावविश्व सुरक्षित आणि विचार सक्षम असतील, तरच पुढची पिढी अधिक निरोगी घडेल. ‘आरोग्य भारती’च्या किशोरी स्वास्थ्याच्या माध्यमातून, कुमारिकापूजनाला आरोग्यसंवर्धनाची कृती जोडूया. हेच संस्कृतीला विज्ञानाची जोड देणारे आणि हेच खरे आधुनिक कुमारिकापूजन!
(लेख ‘आरोग्य भारती’द्वारे प्रकाशित)
-डॉ. मधुरा कुलकर्णी