कोल्हापुरात प्रथमच अतिदुर्मीळ ‘ब्लॅक कोरल स्नेक’ची नोंद

    13-Oct-2026

Rare Black Coral Snake in Kolhapur
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - कोल्हापूरच्या गगनबावडा परिसरातील एका गावाजवळ अतिदुर्मीळ समजल्या जाणाऱ्या ‘ब्लॅक कोरल स्नेक’ अर्थात ‘स्ट्राईप्ड कोरल स्नेक’च्या (Calliophis nigrescens khandallensis) रंगभिन्न प्रकाराची नोंद हौशी सर्पअभ्यासक आणि बालरोगतज्ज्ञ डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील यांनी केली आहे (Rare Black Coral Snake in Kolhapur). याचप्रकारातील आणखी दोन साप त्यांना या परिसरात मृतावस्थेत आढळले असून, कोल्हापूर जिल्ह्यातून या रंगभिन्नतेची ही पहिली प्रकाशित नोंद ठरण्याची शक्यता आहे. (Rare Black Coral Snake in Kolhapur)
 
गेल्या सप्टेंबरमध्ये गगनबावडा परिसरातील एका गावाजवळ हा साप आढळला. त्याची ओळख निश्चित करण्यासाठी डॉ. पाटील यांनी सापाची विविध कोनांतून छायाचित्रे घेतली आणि उपलब्ध शास्त्रीय संदर्भांचा अभ्यास केला. प्रसिद्ध सर्पतज्ज्ञ डॉ. वरद गिरी यांचेही त्यांनी मार्गदर्शन घेतले. या अभ्यासातून हा साप ‘स्ट्राईप्ड कोरल स्नेक’च्या या प्रजातीतील खंडाळेएन्सिस रंगभिन्न प्रकाराशी संबंधित असल्याचे स्पष्ट झाले. याच परिसरात आढळलेले अन्य दोन नमुने रस्ते अपघातात मृत झाले होते. यापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातून ‘कॅस्टोचा कोरल स्नेक’ची नोंद झालेली आहे. मात्र, डॉ. पाटील यांनी नोंदविलेला साप त्यापेक्षा वेगळा आहे. विशेष म्हणजे, उपलब्ध संदर्भांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातून ‘स्ट्राईप्ड कोरल स्नेक’च्या खंडाळेएन्सिस या प्रकाराची अधिकृत प्रकाशित नोंद आढळत नसल्याचे डॉ. पाटील यांनी नमूद केले आहे.
हा साप अत्यंत लाजाळू आणि गुप्त स्वभावाचा असल्याने त्याचे दर्शन दुर्मीळ होते. पावसाळ्यात दमट ठिकाणी, कुजलेल्या पानांच्या थराखाली किंवा ओढ्यांच्या काठावर तो आढळू शकतो. त्याचा आहार प्रामुख्याने इतर लहान सापांवर आधारित असून खापरखवल्या प्रजातीचे साप त्याच्या भक्ष्यांमध्ये असल्याचे नमूद केले जाते. त्यामुळे जंगलातील अन्नसाखळीतही या सापाचे महत्त्व आहे. या सापाचे दंश अत्यंत दुर्मीळ असल्याचे मानले जाते. मात्र साप विषारी असल्याने त्याला हाताळणे टाळावे. दंश झाल्यास साप पकडण्याचा किंवा ओळख पटविण्यासाठी त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न न करता तातडीने वैद्यकीय उपचार घेणे आवश्यक आहे.
 
खंडाळ्यात सापडला आणि नाव पडले ‘खंडालेन्सिस’
स्ट्राईप्ड कोरल स्नेक हा एलॅपिडी (Elapidae) कुळातील विषारी साप असून पश्चिम घाटातील दमट, जंगलयुक्त अधिवासाशी त्याचा संबंध आहे. या सापाची लांबी सुमारे ११४ सेंटीमीटरपर्यंत जाऊ शकते. शरीर बारीक आणि दंडगोलाकार असून शेपटीचे टोक बोथट असते. पाठीचा रंग गडद निळसर-काळा, राखाडी-काळा किंवा जांभळट तपकिरी असतो. काही सापांच्या पाठीवर रेषा किंवा ठिपके दिसतात, तर काही जवळजवळ एकसंध काळे दिसतात. या सापाची सर्वांत ठळक ओळख म्हणजे त्याची पोटाची बाजू. ती चमकदार लाल किंवा केशरी रंगाची असते. काळसर डोके, ओठांवर व मानेजवळील पांढरट खुणा आणि शरीराच्या मध्यभागी खवल्यांच्या १३ ओळी ही त्याची अन्य वैशिष्ट्ये आहेत. शेपटीच्या खालच्या बाजूला पांढऱ्या रंगावर लाल त्रिकोणी खुणा दिसतात. ‘खंडाळेएन्सिस’ हा Calliophis nigrescensमधील रंगभिन्न प्रकार मानला जातो. १९१३ मध्ये प्रसिद्ध सर्पतज्ज्ञ वॉल यांनी खंडाळा परिसरातून या वेगळ्या रंगरूपाचे वर्णन केले. त्यामुळे त्याला ‘खंडाळेएन्सिस’ हे नाव मिळाले. या प्रकारात पाठीवरील पट्टे अत्यंत अस्पष्ट किंवा जवळजवळ अदृश्य असतातआणि संपूर्ण साप निळसर किंवा हिरवट-काळा, एकसंध दिसतो.





संबंधित मजकूर