धारावी पुनर्वसनाला गती; माटुंग्यात १० इमारतींसाठी भूमिपूजन; रेल्वेच्या २२ एकर जागेवर उभारणार १०,४३२ पुनर्वसन सदनिका

१,३७९ व्यावसायिक व औद्योगिक गाळ्यांचाही समावेश; मार्च २०२९ पर्यंत पहिल्या पाच इमारती तयार होणार !

 
 
Dharavi Redevelopment Project
 
मुंबई (Dharavi Redevelopment Project): धारावीकरांच्या पुनर्वसनाच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल पडले आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत माटुंगा येथील रेल्वेच्या २२ एकर जागेवर उभारण्यात येणाऱ्या १० पुनर्वसन इमारतींचे भूमिपूजन सोमवार, दि.१२ ऑक्टोबर रोजी अदाणी एंटरप्रायझेस लिमिटेडचे संचालक प्रणव अदाणी यांच्या हस्ते पार पडले. या इमारतींमध्ये १०,४३२ पुनर्वसन सदनिका आणि १,३७९ व्यावसायिक व औद्योगिक गाळे उभारले जाणार असून, या प्रकल्पामुळे धारावीतील पात्र रहिवाशांच्या पुनर्वसन प्रक्रियेला महत्त्वाची गती मिळणार आहे. (Dharavi Redevelopment Project)
 
धारावी पुनर्विकास प्रकल्पाची विशेष हेतू कंपनी असलेल्या अदाणी नवभारत डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडमार्फत पात्र रहिवाशांना ३५० चौरस फुटांची घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
सेक्टर ६ आणि १ मधील पात्र रहिवाशांना माटुंगा येथील सदनिकांचे वाटप प्रथम केले जाणार आहे. त्यानंतर धारावीतील अन्य पात्र रहिवाशांना प्राधान्यक्रमानुसार सुमारे ४,५०० सदनिका उपलब्ध करून दिल्या जातील. (Dharavi Redevelopment Project)
 
या प्रकल्पासाठी अमेरिकास्थित डिझाइन कंपनी सासाकी, यूकेस्थित अभियांत्रिकी सल्लागार संस्था ब्युरो हॅपोल्ड, मुंबईस्थित स्टुडिओ पॉड, सुप्रसिद्ध वास्तुविशारद श्री. हफीझ कॉन्ट्रॅक्टर, पी अँड टी आणि आर्क स्टुडिओ यांच्यासह सिंगापूरमधील नगररचना तज्ज्ञांचे डिझाइन, अभियांत्रिकी आणि शहरी नियोजनातील कौशल्य वापरण्यात आले आहे. (Dharavi Redevelopment Project)
 
या भूमिपूजन सोहळ्याला राज्याच्या नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. धारावी पुनर्वसन प्रकल्प व झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांचीही उपस्थिती होती. सुरक्षित आणि आधुनिक घरांसह आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे हा प्रकल्पाचा महत्त्वाचा उद्देश असल्याचे डॉ. कल्याणकर यांनी सांगितले. (Dharavi Redevelopment Project)
 
प्रकल्पातील प्रत्येक इमारत ३७ ते ३९ मजल्यांची असेल. त्यामध्ये प्रवासी व अग्निशमन लिफ्ट्स, बालवाडी, सामुदायिक सभागृह, उद्याने, सोसायटी कार्यालये आणि प्रार्थनास्थळांसारख्या सुविधा असतील. पहिल्या पाच इमारती मार्च २०२९ पर्यंत, पुढील दोन इमारती ऑगस्ट २०२९ पर्यंत, तर उर्वरित तीन इमारती ऑगस्ट २०३० पर्यंत प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्याचे नियोजन आहे.
इमारतींच्या हस्तांतरणानंतर पहिली दहा वर्षे त्यांची आणि सामायिक पायाभूत सुविधांची देखभाल संबंधित विकासकाकडून केली जाणार आहे. (Dharavi Redevelopment Project)
 
दरम्यान, दि. २ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धारावी एक्सपिरियन्स सेंटरचे उद्घाटन झाले होते. सुमारे २२,५०० चौरस फुटांच्या या केंद्रात नमुना सदनिका, त्रिमितीय सादरीकरण आणि संवादी प्रदर्शनांच्या माध्यमातून प्रस्तावित पुनर्विकासाची माहिती देण्यात आली आहे. धारावीमध्ये घरे उभारण्याबरोबरच दुकाने, शाळा, आरोग्य सुविधा, उद्याने आणि सार्वजनिक वाहतुकीसह संमिश्र वापराची आधुनिक वसाहत विकसित करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे पुनर्वसनासोबतच धारावीकरांचे जीवनमान उंचावण्याचे आव्हान या प्रकल्पाच्या अंमलबजावणीत महत्त्वाचे ठरणार आहे. (Dharavi Redevelopment Project)
 
“प्रत्येक कुटुंबाला सुरक्षित घर मिळावे आणि त्यांना आपल्या भविष्याचे नियोजन करता यावे, हा आमचा प्रयत्न आहे. धारावीतील कुटुंबांसाठी या घरांचे महत्त्व आम्ही जाणतो. त्यांना अधिक चांगले जीवनमान आणि मुलांसाठी उज्ज्वल भविष्य घडवण्याची संधी देणाऱ्या वसाहती आम्ही उभारत आहोत.” - प्रणव अदाणी, संचालक, अदाणी एंटरप्रायझेस लिमिटेड
 
“धारावीतील कुटुंबांसाठी हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. चांगल्या जीवनमानासाठी आवश्यक पायाभूत सुविधा आणि सोयीसुविधांसह सुरक्षित, आधुनिक घरे देण्यावर आमचा भर आहे.” - डॉ. महेंद्र कल्याणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, डीआरपी/एसआरए
 
“धारावी एक्सपिरियन्स सेंटरमुळे रहिवाशांना नियोजित घरे आणि परिसराची पहिली झलक पाहता आली. आता बांधकामाला सुरुवात होत असताना आमचा भर प्रत्यक्ष हस्तांतरण आणि दीर्घकालीन देखभाल यावर आहे. हस्तांतरणानंतर १० वर्षे प्रत्येक इमारतीची आणि तिच्या सामायिक पायाभूत सुविधांची देखभाल आम्ही करू.” - अनिल सरदाना, मुख्य कार्यकारी अधिकारी, अदाणी नवभारत डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड (Dharavi Redevelopment Project)
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर