“खऱ्या अर्थाने देवीची आराधना तेव्हाच होईल, जेव्हा समाजाला स्त्रीशक्ती समजेल!” – अभिज्ञा भावे

    12-Oct-2026
 
 
 
bhave
 
 
 
 
 मुंबई - नवरात्र म्हणजे आदिशक्तीचा जागर, स्त्रीत्वाचा सन्मान आणि स्त्रीशक्तीचा उत्सव! देवीच्या नऊ रूपांची आराधना करताना स्त्रीच्या सामर्थ्याची, तिच्या कर्तृत्वाची आणि तिच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारा हा सण आहे. मात्र, स्त्रीशक्तीचा खरा अर्थ केवळ देवीच्या पूजेपुरता मर्यादित नसून, स्त्रीला समानतेने वागवणं, तिचे विचार समजून घेणं आणि तिला तिच्या इच्छेनुसार आयुष्य जगण्याचं स्वातंत्र्य देणं, यातही आहे. स्त्रीशक्तीकडे पाहण्याचा असाच एक महत्त्वाचा दृष्टिकोन ‘तारिणी’ मालिकेत कौशिकी ची भूमिका साकारणाऱ्या अभिज्ञा भावे यांनी मांडला आहे. ‘तारिणी’ मालिकेतील कौशिकी ही एक निर्भीड आणि धडाडीची मीडिया हाऊसची मालकीण आहे. स्वतःचं न्यूज चॅनल चालवणारी कौशिकी आपल्या कामातून आणि निर्णयांतून तिचं वेगळेपण दाखवते. तिच्या या व्यक्तिरेखेच्या निमित्ताने अभिज्ञा भावे यांनी स्त्रीशक्तीचा अर्थ, समाजात स्त्रीला मिळणारी वागणूक आणि स्त्रियांनी एकमेकींना समजून घेण्याची गरज याविषयी आपले विचार मांडले.Zee Marathi Abhidnya Bhave
अभिज्ञा भावे सांगतात, “माझ्यासाठी स्त्रीशक्ती म्हणजे जेव्हा पुरुष खऱ्या अर्थाने स्त्रीचा मान ठेवतात आणि तिची शक्ती समजून घेण्याचा प्रयत्न करतात. स्त्रीशक्ती म्हणजे फक्त स्त्रियांनीच समजून घ्यायची गोष्ट नाही. पुरुषांनीही ती जपली पाहिजे. स्त्रीशक्ती म्हणजे आम्हा महिलांना आमची शक्ती दाखवायची आहे, असं नाही; तर आम्हालाही समान समजा, आम्हाला आमचं आयुष्य जसं जगायचं आहे, तसं जगू द्या, एवढंच आमचं म्हणणं आहे. स्त्रीशक्तीचा हा अर्थ जेव्हा समाजाला समजेल, तेव्हाच खऱ्या अर्थाने देवीची आराधना होईल, असं मला वाटतं. स्त्रीशक्तीकडे बंडखोरीच्या नजरेतून पाहता कामा नये. किमान स्त्रीशक्ती समजून घेण्याचा प्रयत्न तरी समाजाने केला पाहिजे.”Zee Marathi Abhidnya Bhave
स्त्रीशक्तीचा विचार करताना अभिज्ञा एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला समजून घेण्याच्या गरजेवरही भर देतात. त्या म्हणतात, “मला असं वाटतं की आजच्या काळात सगळ्यात मोठी गरज आहे ती एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला समजून घेण्याची. आपल्या विरोधात पूर्ण समाज आहे, त्यात आपणही विभागलो गेलो, तर आपलंच जगणं कठीण होऊन जाईल. त्यामुळे एकमेकींना किमान समजून घेण्याचा प्रयत्न तरी केला पाहिजे. अशी अनेक उदाहरणं आहेत, जिथे स्त्रिया एकमेकींना समजून घेतात; पण अजूनही असे बरेच गट आहेत, जे एकाच साच्यात अडकलेले आहेत. त्या साच्याबाहेर पडणारी प्रत्येक बाई वाईट आहे, असं समजलं जातं. म्हणूनच एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला समजून घेणं आणि तिला सांभाळून घेणं अत्यंत गरजेचं आहे. मग ते घर असो, व्यवसाय असो, शिक्षण असो किंवा समाजातील कोणतंही क्षेत्र असो. एका स्त्रीला दुसऱ्या स्त्रीचं सहकार्य मिळणं अत्यंत महत्त्वाचं आहे.”Zee Marathi Abhidnya Bhave
स्त्रीशक्तीचा अनुभव हा केवळ एखाद्या विशेष दिवसापुरता मर्यादित नसतो, तर तो रोजच्या जगण्यातून जाणवत असतो, असं अभिज्ञा यांना वाटतं. त्या सांगतात, “‘देवीशक्ती’ किंवा ‘स्त्रीशक्ती’चा अनुभव प्रत्येक क्षणी येत असतो. आजच्या जगात कोणताही निर्णय घेताना पुरुषाला ज्या गोष्टींना सामोरं जावं लागतं, त्यापेक्षा जास्त आव्हानांना स्त्रीला सामोरं जावं लागतं, असं मला वाटतं. स्त्रीला खूप सगळं सांभाळून, दबकून, खूप खोलवर विचार करून आणि प्रत्येक गोष्टीचं मोजमाप करून आयुष्य जगावं लागतं. तरीही ती जगते, आम्ही जगतो, हीच माझ्यासाठी स्त्रीशक्ती आहे. स्त्रीला अगदी दिलखुलासपणे जगता येत नाही. मनात थोडी भीती असते, अनेक विचार असतात; तरीही त्या सगळ्यात आनंद शोधणं आणि आयुष्य जगणं, याहून सुंदर उदाहरण स्त्रीशक्तीचं दुसरं असूच शकत नाही.”Zee Marathi Abhidnya Bhave
नवरात्रीच्या सणाविषयी बोलताना अभिज्ञा आपल्या घरातील साध्या परंपरेविषयीही सांगतात. त्या म्हणतात, “तसं पाहायला गेलं तर आमच्या घरात नवरात्रीचं काही विशेष सेलिब्रेशन नसतं. देवीच्या दर्शनाला जाणं, देवीचे देखावे पाहणं असं असतं. गरबा खेळण्यात मला फारसा रस नाही. त्यामुळे नवरात्र माझ्यासाठी घरातल्या देवीची शांत, साधी आणि सोपी पूजा करण्यापुरतंच असतं. पण या सणातून मला प्रसन्नता मिळते.”Zee Marathi Abhidnya Bhave
स्त्रीशक्ती म्हणजे केवळ सामर्थ्याचं प्रदर्शन नव्हे, तर एकमेकींना समजून घेणं, समानतेचा आदर करणं आणि स्वतःच्या इच्छेनुसार आयुष्य जगण्याचं स्वातंत्र्य मिळणं, हा अभिज्ञा भावे यांचा विचार नवरात्रीच्या निमित्ताने एक महत्त्वाचा संदेश देतो. देवीची आराधना करताना आपल्या आजूबाजूच्या स्त्रियांचाही सन्मान करणं, त्यांना समजून घेणं आणि त्यांच्या पाठीशी उभं राहणं, यातूनच स्त्रीशक्तीचा खरा उत्सव साजरा होऊ शकतो.Zee Marathi Abhidnya Bhave
 




संबंधित मजकूर