मुंबई (Nahid Islam CJP Protest) : भारतात अस्थिरता निर्माण करण्याचे प्रयत्न केल्याचा आरोप असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला बांगलादेशातून पाठिंबा मिळाल्याचे समोर आले आहे. बांगलादेशातील ‘विद्यार्थी नेता’ नाहिद इस्लाम याने सीजेपीच्या आंदोलकांना पाठिंबा दर्शवणारा संदेश प्रसिद्ध केला. नाहिद इस्लाम याने दिल्ली पोलिसांच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांबद्दल चिंता व्यक्त केली. सीजेपीच्या आंदोलनात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या लोकांच्या मूलभूत स्वातंत्र्याला या उपाययोजनांमुळे धोका निर्माण होत असल्याचा दावा त्याने केला.
नाहिद इस्लाम याने शहीन बाग येथे झालेल्या आंदोलनाचेही समर्थन केले. १०० दिवसांहून अधिक काळ चाललेल्या या आंदोलनामुळे सरकारसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. नागरिकत्व (दुरुस्ती) कायदा, २०१९ (सीएए) आणि प्रस्तावित राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) यांबाबत चुकीची माहिती पसरवल्याचा आरोपही या आंदोलनावर करण्यात आला होता. असे असतानाही नाहिद इस्लाम याने या आंदोलनाला ‘भारताच्या समृद्ध लोकशाहीवादी प्रतिकार परंपरेचे’ उदाहरण म्हटले.(Nahid Islam CJP Protest)
पुढे तो म्हणाला, भारताच्या समृद्ध लोकशाहीवादी प्रतिकार परंपरेची आम्ही दखल घेतो. दिल्लीतील हिवाळ्याच्या प्रतिकूल परिस्थितीत शहीन बागमधील महिलांनी समान नागरिकत्वाच्या हक्काचे रक्षण केले, तर जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) आणि जादवपूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या अनेक पिढ्यांनी संघटित विरोधाची परंपरा कायम ठेवली आहे.” यानंतर नाहिद इस्लाम याने ‘हिंदुत्ववादी बहुसंख्याकवाद आणि फॅसिझम’ दक्षिण आशियाचे भविष्य ठरवणार नसल्याचे विधान केले. तो म्हणाला, “हिंदुत्ववादी बहुसंख्याकवाद, फॅसिझम आणि धार्मिक वर्चस्वाचे कोणतेही स्वरूप दक्षिण आशियाचे भविष्य ठरवणारे असता कामा नये. भारतातील हुकूमशाही प्रवृत्ती, जातीय द्वेष आणि राजकीय असहिष्णुता यांना आम्ही जसा विरोध करतो, तसाच बांगलादेशातील या प्रवृत्तींनाही आमचा विरोध आहे. धर्म, जात, लिंग किंवा वर्ग कोणताही असो, सामाजिक सलोखा आणि सामाजिक न्याय यांवर आपले सामायिक भविष्य आधारलेले असले पाहिजे. अल्पसंख्याक भयभीत असतील, विरोधी मतांना गुन्हा ठरवले जात असेल आणि नागरिकत्वाची पात्रता व्यक्तीच्या ओळखीवर ठरत असेल, तर कोणताही समाज खऱ्या अर्थाने लोकशाहीवादी असू शकत नाही.”(Nahid Islam CJP Protest)
मात्र, भारतात अस्थिरता निर्माण करण्याच्या कथित प्रयत्नांना पाठिंबा देताना लोकशाही मूल्ये आणि मूलभूत स्वातंत्र्याचा दाखला देणारा नाहिद इस्लाम स्वतःच्या देशात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या आडून अस्थिरता निर्माण करण्याच्या कथित मोहिमेत सहभागी होते, असा आरोप लेखात करण्यात आला आहे. ‘भेदभावविरोधी विद्यार्थी आंदोलना’च्या १५७ समन्वयकांपैकी एक असलेल्या नाहिद इस्लाम याने ४ ऑगस्ट २०२४ पासून ‘संपूर्ण असहकार आंदोलना’ची घोषणा केली होती. बांगलादेशच्या लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा द्यावा, अशी त्यांची प्रमुख मागणी होती. यानंतर नाहिद इस्लाम याने मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेशच्या अंतरिम सरकारमध्ये माहितीविषयक सल्लागार म्हणून काम पाहिले. या अंतरिम सरकारने शेख हसीना यांच्या सरकारची जागा घेतली होती. बांगलादेशातील शेख हसीना यांची सत्ता उलथवून टाकल्यानंतर देशात इस्लामी कट्टरतावादाचा प्रभाव वाढल्याचा आरोप करण्यात आला. त्यातून हिंदू अल्पसंख्याकांवर हिंसक हल्ले झाल्याचेही वृत्त आहे.
फेब्रुवारी २०२५ मध्ये नाहिद इस्लाम याने युनूस यांच्या मंत्रिमंडळाचा राजीनामा देऊन नव्या राजकीय पक्षात प्रवेश केला. सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा देताना इस्लाम याने ‘एक्स’वर लिहिले, “हा संघर्ष केवळ तुमचा एकट्याचा नाही. ढाका येथून आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. सत्तेला उत्तरदायी बनवणे, लोकशाही संस्थांचे रक्षण करणे आणि मानवी प्रतिष्ठा जपणे या समान मागण्यांनी आपण जोडलेले मित्र आहोत.” भारतात लोकशाहीच्या रक्षणाच्या नावाखाली आंदोलनाच्या माध्यमातून अस्थिरता निर्माण करण्याचे सीजेपीचे प्रयत्न आणि बांगलादेशातील जुलै २०२४ मधील हिंसक ‘विद्यार्थी क्रांती’ यांच्यातही इस्लाम याने साम्य असल्याचे सूचित केले. या आंदोलनामुळे शेख हसीना यांचे लोकशाही पद्धतीने निवडून आलेले सरकार सत्तेवरून पायउतार झाले होते. “हा संघर्ष आमच्यासाठी नवीन नाही, कारण आम्ही तो प्रत्यक्ष अनुभवला आहे. जुलै २०२४ मध्ये भरतीतील आरक्षणाविरोधात विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाचे रूपांतर १५ वर्षांच्या हुकूमशाही राजवटीविरोधातील देशव्यापी उठावात झाले”, असे नाहिद इस्लाम याने सांगितले. (Nahid Islam CJP Protest)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक