‘राम-लखन’ या हिंदी चित्रपटात अनिल कपूरच्या तोंडी एक गाणे आहे- ‘वन टू का फोर, फोर टू का वन, माय नेम इज लखन’ या आकड्यांना महत्त्व नाही; पण हा नायक बिलंदर आहे. तो अगदी सहजपणे याची टोपी त्याला आणि त्याची टोपी त्याला लावून बिनबोभाट काम साधतो, असे गीतकाराला सुचवायचे आहे. नुकताच मरण पावलेला लोकप्रिय इंग्लिश लेखक लॉर्ड जेफरी आर्चर हे अशा बिलंदर टोपीबहाद्दराचे जिवंत उदाहरण होते.
तुम्हाला १९८७ सालचा ‘खुदगर्ज’ हा हिंदी चित्रपट आठवतो का? तोपर्यंत फक्त अभिनेता असलेला राकेश रोशन या ‘खुदगर्ज’द्वारे दिग्दर्शक बनला होता. चित्रपटात जितेंद्र, शत्रुघ्न सिन्हा, गोविंदा इत्यादी नट होते. हा चित्रपट लोकप्रिय झाला. त्यामुळे त्याच्या कथानकावरून दोन तेलुगू, एक कन्नड आणि एक तामिळ चित्रपट बनले. मुळात ‘खुदगर्ज’ हा जेफरी आर्चरच्या ‘केन अॅण्ड एबल’ या गाजलेल्या कादंबरीवरून उचललेला होता.
यश चोपडा हा हिंदी चित्रपटसृष्टीतला बराच गाजलेला निर्माता-दिग्दर्शक होता. आता त्याचा मुलगा आदित्य चोपडा चित्रपट काढतो. २०११ साली त्याने ‘लेडीज व्हर्सेस रीकी बहल’ अशा इंग्रजी नावाचा हिंदी चित्रपट काढला. तो चांगला चालला. तोदेखील जेफरी आर्चरच्या ‘नॉट अ पेनी मोअर, नॉट अ पेनी लेस’ या अत्यंत गाजलेल्या कादंबरीवरून उचललेला होता.
२०१५ साली लॉर्ड जेफरी आर्चर हे मुंबईला आले होते. मुंबईच्या उच्चभ्रू वर्तुळात त्यांच्या गप्पागोष्टींचे कार्यक्रम झाले. मेजवान्या झडल्या. त्यावेळी लॉर्ड महाशयांनी वरील दोन चित्रपटांचा मुद्दाम उल्लेख केला. "तुमचं हे बॉलीवूड म्हणजे चोरांची टोळी आहे,” अशा ठणठणीत शब्दांत त्यांनी हिंदी चित्रपटवाल्यांना झोडून काढले. यावर राकेश रोशन किंवा आदित्य चोपडा यांनी काही प्रतिक्रिया व्यक्त केल्याचे ऐकीवात नाही. कदाचित, ते मनातल्या मनात म्हणाले असतील की, ‘अख्खी हिंदी चित्रपटसृष्टी उचलेगिरीवरच तर उभी आहे.’ यावरून आणखी एक किस्सा आठवतो. १९७५ साली ‘शोले’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्याने लोकप्रियतेचे आणि उत्पन्नाचे सगळे विक्रम मोडले. ‘शोले’च्या सुवर्णमहोत्सवी आठवड्यानंतर म्हणजे, १९७६ किंवा १९७७ साली मुंबईच्या फिल्म पत्रकारांनी ‘शोले’चे लेखक सलीम-जावेद यांची एक खास मुलाखत घेतली. त्यात काही जुन्या-जाणत्या पत्रकारांनी सलीम-जावेदना विचारले की, "या तुमच्या पटकथेत अनेक इंग्रजी चित्रपटांची कथानके, सीन्स, शॉट्स, फे्रमस् सरळसरळ उचललेल्या आहेत. यावर तुमचे काय म्हणणे आहे?” तेव्हा सलीम-जावेद सडेतोडपणे (की निर्लज्जपणे?) उत्तरले की, "या जगात फक्त ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ या दोनच कथा ‘ओरिजिनल’ आहेत. बाकी सगळ्याच कथा उचललेल्या आहेत.”
असो. तर आजचा आपला लेखविषय असणारा लॉर्ड जेफरी आर्चर हा, त्याचा बाप विल्यम आर्चर याला, त्याच्या दुसर्या बायकोपासून, वयाच्या ६४व्या वर्षी झालेला मुलगा होता. यावेळी त्याची पहिली बायको जिवंत होती. ब्रिटिश कायद्यानुसार बहुपत्नीत्व हा मोठा अपराध आहे. हा विल्यम आर्चर लंडनमध्ये जमीन खरेदी-विक्रीच्या दलालीचे काम करीत असे. योगायोगाने त्याला कळले की, विल्यम आर्चर या नावाचा एक सैनिक पहिल्या महायुद्धात लढला होता. त्याला ‘शौर्यचक्र’ मिळाले होते. मात्र, आता तो स्वत: किंवा त्याचा कुणीही वारस हयात नाही. लगेच या विल्यम आर्चरने कुठून तरी एक खोटे ‘शौर्यपदक’ मिळवले आणि मीच तो शूर सैनिक विल्यम आर्चर म्हणून तो समाजात मिरवू लागला. पण, लवकरच त्याची ही चोरी पकडली गेली. तेव्हा तो अमेरिकेत पळाला. तिथे त्याने पोटासाठी अक्षरश: वाटेल ती कामे केली. पुढे तो इंग्लंडला परतला आणि त्याने जेफरीची आई लोला हिच्याशी लग्न केले. १९४० साली लंडनमध्येच जेफरी जन्मला.
अशाप्रकारे बिलंदर टोपीबहाद्दर बापाच्या पोटीच जन्मल्यामुळे जेफरी लहानपणापासूनच पक्का बिलंदर बनत चालला. गोड बोलून माणसे जोडणे, संवादकौशल्याने त्यांना मित्र बनवणे आणि संधी मिळेल तशी त्यांना छोटी-मोठी टोपी लावणे म्हणजे, छोट्या-मोठ्या रकमा त्यांच्या खिशातून काढणे, यामध्ये जेफरी हळूहळू भलताच कुशल बनत गेला. तो शाळेत आणि कॉलेजात बेताचाच होता; पण खेळाच्या मैदानावर मात्र तो उत्कृष्ट खेळाडू होता.
मात्र, तिथेही तो लोकांना कसा टोप्या लावायचा, याचे एक उदाहरण शेरिडन मोर्ले या सुप्रसिद्ध लेखकाने दिले आहे. ‘ऑक्सफर्ड’मधल्या ‘मर्टन’ कॉलेजमध्ये शिकत असताना विद्यापीठासाठी ‘कल्याणनिधी’ गोळा करण्याची एक योजना जेफरी आर्चरने आखली. त्यासाठी त्याने ‘बीटल्स’ या प्रख्यात वाद्यवृंदाला आमंत्रण केले. विशेष म्हणजे, आर्चरसारख्या कुणीही नसलेल्या एका विद्यार्थ्याचे आमंत्रण स्वीकारून ‘बीटल्स’वाले चक्क आले. तमाम विद्यार्थी आणि प्राध्यापक चाट पडले.
शेरिडन मोर्ले लिहितो, "स्वच्छतागृहात मला रिंगो स्टार भेटला. रिंगो स्टार म्हणजे सध्याचा प्रख्यात इंग्रज गायक, वादक, लेखक असणारा सर रिचर्ड स्टार्की होय. तर रिंगो स्टार मला म्हणाला, "स्साला...कमाल झाली. हा जेफरी आर्चर लेकाचा आहे तरी कोण?” त्यावर मी त्याला म्हणालो, "अख्खं ऑक्सफर्ड हेच शोधतंय की, या लेकाच्या जेफरी आर्चरची कशी काय एवढी वट?” तेव्हा रिंगो म्हणाला, "बोलतो तर मोठा मिठ्ठास. पण, एक गोष्ट नक्की. तो आपले हे मूत्रसुद्धा बाटल्यांमध्ये भरेल आणि विकून दाखवेल.”
‘ऑक्सफर्ड’मधून बाहेर पडल्यावर अशाप्रकारचे अनेक ‘कल्याणनिधी’ जेफरी आर्चरने उभे केले. लोकांचे पैसे जमवले. त्यावर व्यवस्थित हात मारला आणि किरकोळ रकमा मूळ उद्दिष्टाकडे दिल्या. इंग्लंडच्याच एका माजी पंतप्रधानाने उपरोधाने असे उद्गार काढले आहेत की, "व्हॉट इज पॉलिटिक्स? पॉलिटिक्स इज द लास्ट रिसॉर्ट ऑफ ए स्काउंड्रल.” हे उद्गार जेफरी आर्चरने वाचले होते का, ते माहित नाही. पण, तो ब्रिटनच्या ‘हुजूर’ पक्षाचा कार्यकर्ता बनला आणि १९६९ साली लिंकनशायर मतदारसंघातून चक्क खासदार म्हणून निवडून गेला.
खासदार बनल्यावरही त्याचे बनवाबनवीचे उद्योग चालूच राहिले आणि अशाच एका लफड्यात १९७४ साली त्याला अधिकृतपणे दिवाळे जाहीर करावे लागले. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी त्याचवर्षी त्याने आपली पहिली कादंबरी लिहिली- ‘नॉट अ पेनी मोअर, नॉट अ पेनी लेस.’ ती १९७६ साली प्रथम अमेरिकेत आणि मग ब्रिटनमध्ये प्रसिद्ध झाली आणि...
...आणि इंग्रजी साहित्यविश्वाला एक नवा दमदार लेखक गवसला. आपण उत्कृष्ट कथानके रचू शकतोय, ती लोकांना आवडताहेत, याची जाणीव झाल्यावर जेफरी आर्चरचा आत्मविश्वास दुणावला. एकापाठोपाठ एक त्याची पुस्तके नामवंत प्रकाशक काढू लागले. वाचकांच्या त्यावर उड्या पडू लागल्या. इंग्रजीखेरीज अन्य युरोपीय भाषांमध्ये त्यांचे अनुवाद होऊ लागले. मानधनाच्या भरघोस रकमांचे धनादेश जेफरी आर्चरचा पत्ता विचारत येऊ लागले. आतापर्यंत त्याची ४२ पुस्तके मूळ इंग्रजीत प्रसिद्ध झाली आहेत. त्यांची जगभरच्या ३३ भाषांमध्ये भाषांतरे झालेली आहेत. सर्वांच्या मिळून २७ कोटी ५० लक्ष प्रती आतापर्यंत खपलेल्या आहेत.
एवढा प्रचंड लौकिक लेखणीद्वारे प्राप्त झाल्यावर ब्रिटिश राष्ट्राने त्याच्यावर असंख्य राजकीय आणि सामाजिक मानसन्मानांची खैरात करणे ओघानेच आले. ब्रिटनमध्ये पदवीदृष्ट्या ‘राजा’ हा सर्वोच्च. त्याच्यानंतर उतरत्या क्रमाने ‘ड्यूक’, ‘मार्क्विस’, ‘अर्ल’, ‘व्हायकाऊंट’ आणि ‘बॅरन’ अशा सरदारकीच्या पदव्या असतात. या सर्वांचाच उल्लेख ‘लॉर्ड’ म्हणून केला जातो. जेफरी आर्चरला ‘लॉर्ड किंवा बॅरन ऑफ वेस्टन-सुपर-मेअर’ अशी पदवी देण्यात आली.
आता भरपूर संपत्ती आली. ठिकठिकाणी स्थावर मालमत्ता तयार झाली. केंब्रिजशायर गावाजवळ ‘द ओल्ड व्हिकारेज’ नावाची १६८५ साली बांधलेली वास्तू जेफरीची बायको मेरी हिने विकत घेतली. मेरी स्वत: ‘केंब्रिज’ विद्यापीठात विज्ञानाची प्राध्यापिका होती. या वास्तूमध्ये झडणार्या मेजवान्यांना ब्रिटन आणि अमेरिकेतले मोठमोठे राजकारणी, नट, दिग्दर्शक, साहित्यिक, खेळाडू आवर्जून यायचे.
पण, एवढे वैभव आले तरी जेफरीची टोप्या घालण्याची घाणेरडी सवय सुटली नाही. एका वारांगनेला भारी रक्कम देऊन तिला परदेशी पाठवण्याच्या प्रयत्नात तो अडकला. लांड्यालबाड्या करून, खोटे दस्तऐवज बनवून सुटला. पण, काही वर्षांनी हे प्रकरण परत बाहेर आले. जेफरी आर्चर दोषी ठरला आणि सरळ तुरुंगात गेला. याहीपेक्षा वाईट प्रकरण झाले, ते कुर्दिश फंडाचे. १९८८ साली सद्दाम हुसैनने कुर्दवंशीय लोकांच्या गावांवर विषारी वायू सोडून किमान पाच हजार कुर्द लोक ठार मारले. जेफरी आर्चरने इकडे इंग्लंडमध्ये त्यांच्या मदतीसाठी ‘कल्याणनिधी’ उभारला. तब्बल ५ कोटी ७० लक्ष पौंडस् एवढा निधी जमला. पण, त्यापैकी फक्त ३० लाख पौंडस् एवढीच रक्कम कुर्द आपद्ग्रस्तांपर्यंत पोहोचली. बाकी रक्कम? गडप!
असो. तर असा हा बिलंदर टोपीबहाद्दर; पण उत्कृष्ट लेखक जेफरी हॉवर्ड आर्चर परवा दि. ५ ऑक्टोबर रोजी वयाच्या ८६व्या वर्षी लंडन मुक्कामी नैसर्गिक मृत्यूने मरण पावला. त्याचे आणखी एक भाग्य म्हणजे, त्याची वैज्ञानिक पत्नी मेरी ही सदैव त्याच्या बाजूने उभी राहात असे. त्यांचा विवाह १९६६ साली झाला होता. म्हणजे यंदाच त्यांच्या विवाहाला ६० वर्षे पूर्ण झाली. एवढी वर्षे विवाहसंबंध टिकून राहणे, हे पाश्चिमात्य देशात तर दुर्मीळ आहेच; पण आता भारतातही दुर्मीळ होण्याच्या बेतात आहे.
मल्हार कृष्ण गोखले