देशाच्या क्रीडाविश्वासाठी गेले काही दिवस ‘आसू’ आणि ‘हसू’ देणारे ठरले. उत्तम अभिनेते आणि खेळाडू असलेले नाना पाटेकर यांचे निधन झाले, तर त्याच आधी जपानमधील आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय संघाने आजवरच्या दुसर्या क्रमांकाच्या उत्कृष्ट कामगिरीचे दर्शन घडवले. नाना पाटेकर यांच्यातील खेळाडूचा अणि भारतीय खेळाडूंच्या यशाचा आढावा घेणारा हा लेख...
या वेळचे ‘क्रीडाविश्व’ सदर लिहिताना मला दुःख वाटत आहे; कारण मला नाना पाटेकरांना श्रद्धांजली वाहण्याने ‘क्रीडाविश्व’चा प्रारंभ करावा लागत आहे. ‘पुरुष’ या नाटकात नाना पाटेकर आणि अभिनेत्री रिमा लागू यांनी, १९८० ते १९९० या काळात मुख्य भूमिका साकारल्या होत्या. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात या नाटकाचे अनेक प्रयोग ‘हाऊसफुल्ल’ झाले होते. त्यातील एक नाट्यप्रयोग बघण्याचे भाग्य मला लाभले. नानांचे ते मला घडलेले पहिले दर्शन होते. तेव्हापासूनच एक कलाकार, देशभक्त आणि खेळाडू म्हणून त्यांनी माझ्या मनात घर केले. आज ते आपल्यात नसले, तरी त्यांची आठवण मला सतत राहील. नाना हे एक राष्ट्रीय स्तरावरील कुशल रायफल नेमबाजही होते. त्यांनी जी. व्ही. मावळणकर शूटिंग स्पर्धेत पदकेही जिंकली होती. ‘मुंबई रायफल असोसिएशन’शीही ते दीर्घ काळ जोडले होते. खेळात प्रावीण्य मिळवलेला हा कलाकार जेव्हा नाटकाच्या रंगमंचावर उतरत असे, तेव्हा खेळाडूवृत्ती आणि कला यांचा एक अद्वितीय संगम तेव्हा आपल्याला पाहायला मिळे.
नेमबाजी हा जरी वैयक्तिक खेळ असला, तरी नानांनी नाटकात काम करताना दाखवलेली वृत्ती ही एक उत्कृष्ट सांघिक खेळाडूचीच होती. ‘पुरुष’ नाटकात त्यांनी साकारलेला ‘गुलाबराव’ हा अत्यंत खलनायकी आणि आक्रमक चेहर्याचा. परंतु, ही भूमिका वठवताना त्यांनी सांघिक अभिनय कसा साधला, हे एक क्रीडाप्रेमी म्हणून मला जाणवलं. हॉकीमध्ये जसा एखादा खेळाडू स्वतः गोल न करता, दुसर्या खेळाडूला गोल करण्यासाठी अचूक ‘पास’ देतो, तसेच नानांनी रंगमंचावर केलेलं मला तेव्हा जाणवलं. रिमा लागू, तसेच अन्य ज्येष्ठ कलाकारांविरुद्ध संवादांची जुगलबंदी रंगवताना, समोरच्या पात्राचा राग, संताप आणि निष्पापपणा प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी नानांनी, आक्रमक अभिनयाने समोरच्या कलाकाराला पूर्ण ‘स्पेस’ दिलेली मी पाहिली आहे.
सांघिक खेळात सहकार्याची पुढची चाल ओळखणे महत्त्वाचे. नाटकात रीमा लागू यांच्या पात्राचा तीव्र प्रतिकार तेव्हाच प्रभावी ठरत असे, जेव्हा नाना क्रूरतेचा अचूक ‘टायमिंग’सह वापर करत. समोरच्या कलाकाराच्या अभिनयाला ‘लिफ्ट’ देणे, यातून त्यांचं खरं टीम स्पिरिट दिसून येई. नानायांचा स्क्रीन/स्टेज प्रेझेन्स अत्यंत अफाट होता. तसं म्हटलं तर, नाना ते संपूर्ण नाटक एकट्याने ‘हायजॅक’ करू शकत होते. मात्र, ‘गुलाबराव’ केंद्रस्थानी ठेवूनही नाटकाचा मुख्य संदेश आणि इतर पात्रांचे महत्त्व अबाधित राहील, याची काळजी ते घेत. खेळाच्या भाषेत सांगायचे तर, वैयक्तिक शतकापेक्षा त्यांनी नेहमी ‘नाटकाच्या विजयाला’च प्राधान्य दिले. एक खेळाडू म्हणून नाना पाटेकर यांच्यातील गुण, त्यांच्या अभिनयात आणि आयुष्यात थेट परावर्तित होताना मला आढळत. नेमबाजीत ट्रिगर दाबण्याचा क्षण आणि अभिनयात संवादातील ‘पॉझ’ घेण्याच्या क्षणातील साम्य नाना जाणून होते. ‘पुरुष’ नाटकातील नानांचे शांत राहणे आणि अचानक उफाळून येणे, यामागे एका शूटरचीच अचूकता आणि नियंत्रण दिसे. खेळाच्या मैदानावर किंवा १०० प्रयोगांच्या वेळी रंगमंचावर कोणतीही अनपेक्षित परिस्थिती उद्भवल्यास खचून न जाता, शांतपणे परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य त्यांच्यात खेळाडू असल्यानेच आले होते. खेळाडू केवळ मैदानापुरता मर्यादित नसतो, तर तो देशाचा जबाबदार नागरिकही असतो. नाना पाटेकर यांनी हे त्यांच्या कृतीतून अनेकदा सिद्ध केले आहे. कारगिल युद्धाच्या काळात स्वतः सीमेवर जाऊन सैनिकांसोबत राहणे, ‘टेरिटोरियल आर्मी’मध्ये कॅप्टनपदी प्रत्यक्ष सेवा देणे, हे त्यांच्यातील सच्चा देशभक्त असल्याचे द्योतकच. नाना पाटेकर यांनी १९९१ मध्ये, आलेल्या त्यांच्या ‘प्रहार : द फायनल अॅटॅक’ या चित्रपटाच्या पूर्वतयारीसाठी आणि भूमिकेला न्याय देण्यासाठी, ‘मराठा लाईट इन्फंट्री’सोबत जवळजवळ तीन वर्षे लष्करी प्रशिक्षण व कमांडो कोर्स पूर्ण केला होता. या प्रशिक्षणादरम्यान त्यांनी तत्कालीन लेफ्टनंट कर्नल (आणि नंतरचे लष्करप्रमुख) व्ही. के. सिंग यांच्यासोबतही काम केले होते.
भारत-पाकिस्तान संबंधांच्या बाबतीत सीमेवर सैनिक हुतात्मा होत असतानाच, खेळ आणि संस्कृतीच्या नावाखाली व्यवहार सामान्य ठेवता येणार नाहीत, हे त्यांचे ठाम मत होते. देशहितापुढे वैयक्तिक आवड किंवा क्रीडाप्रेम दुय्यम ठरते, हा विचार एका देशभक्त खेळाडूची परिपक्वताच दर्शवतो. नाना हे केवळ अभिनयातीलच नायक नव्हते, तर एका खेळाडूचा शिस्तबद्धपणा, सैनिकाची देशभक्ती आणि एका सांघिक खेळाडूची सहकार्याची भावना त्यांच्या ठायी होती. अशा या नाना पाटेकर अर्थात विश्वनाथ दिनकरराव पाटेकर यांनी, दि. ८ ऑक्टोबरला ‘एक्झिट’ घेतली व ‘नटसम्राट हरपला!’, ‘एका कलंदराचे जाणे...’, ‘कला विश्वनाथ’ असे न संपणारे ‘नाना किस्से’ आपण शुक्रवार, दि. ९ ऑक्टोबरच्या दि. ‘मुंबई तरुण भारत’मध्ये वाचले. असे असूनही, नानांविषयी लिहिता वाचताना आपल्याला थांबवत नाहीच. आता मैदानातून ‘एक्झिट’ घेत पॅव्हेलियनमध्ये विश्रांती घ्यायला गेलेला नाना, आपल्याला या जन्मात तरी दिसणार नसल्याचे दुःख आपल्याला सलतच राहणार आहे.
आयची-नागोया या जपानच्या दि. २०व्या आशियाई क्रीडा स्पर्धा दि. १९ सप्टेंबर ते दि. ४ ऑक्टोबर या कालावधीत पार पडल्या. त्यात भारताने २१ सुवर्ण, २७ रौप्य आणि ३७ कांस्य अशी एकूण ८५ पदके जिंकून, पदकतालिकेत चौथे स्थान मिळवले. आपण सगळ्यांनीच त्या भारतीय चमूचे अभिनंदनही केले. नाना पाटेकरांच्या लाडया क्रीडाप्रकारातही भारताने, जपानमधील आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले. नेमबाजीत सुरुची सिंग आणि कमालजीत यांनी १० मीटर एअर पिस्तुल मिश्र सांघिक प्रकारात, आशियाई रेकॉर्डसह सुवर्ण जिंकले. तसेच, नीरू धांडा हिने महिलांच्या ‘ट्रॅप’ या ‘शॉटगन’ प्रकारात आणि नंतर कायनन चेनाईसोबत ‘ट्रॅप’ मिश्र सांघिक प्रकारात, सुवर्णपदक मिळवून ऐतिहासिक कामगिरी केली. नेमबाजीप्रमाणेच भारताने खालील प्रमुख क्रीडाप्रकारांमध्येही दमदार कामगिरी करत, सुवर्णपदके पटकावली आहेत :
- भारताने या स्पर्धेत सर्वाधिक पाच सुवर्णपदके तिरंदाजीत मिळवली. कंपाऊंड प्रकारात पुरुष, महिला आणि मिश्र सांघिक अशा तिन्ही प्रकारांत सुवर्ण जिंकले, तर रिकर्व्ह प्रकारात कुमकुम मोहॉडने महिला एकेरीत ऐतिहासिक ‘सुवर्ण’ पटकावले.
- पुरुष आणि महिला अशा दोन्ही भारतीय कबड्डी संघानी, आपली सत्ता कायम राखत सुवर्णपदकांवर नाव कोरले.
- ‘टी-२०’ क्रिकेट स्पर्धेत भारतीय महिला आणि पुरुष संघांनी सुवर्णपदक पटकावले.
- भारतीय महिला हॉकी संघाने १९८२ नंतर प्रथमच ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले, तर पुरुष हॉकी संघानेही ‘सुवर्ण’ पटकावले. दोन्ही संघांनी ‘लॉस एंजेलिस २०२८’ ऑलिम्पिकचे तिकीट निश्चित केले.
- गोल्फ क्रीडाप्रकारात प्रणवी उर्सने महिला एकेरीत ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकून, २४ वर्षांची प्रतीक्षा संपवली.
- अॅथलेटिस क्रीडाप्रकारात स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी, महिलांच्या ४x४०० मीटर रिले संघाने उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक जिंकले.
२०२६च्या आयची-नागोया आशियाई क्रीडा स्पर्धेतील आपल्या विजेत्यांचे कौतुक आपण आवर्जून केलेच पाहिजे. ते का, हे यावेळेस बघणार आहोत. क्रिकेटला नक्कीच अधिक लोकप्रियता आणि प्रेक्षकवर्ग मिळतो; परंतु इतर खेळांमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धांत यश मिळवणार्यांकडे दुर्लक्ष होते. सुनील गावसकरच्या भाषेत सांगायचे तर हा काही ‘योग्य खेळ’ नाही. जपानमधील आशियाई क्रीडा स्पर्धेचा शेवटचा आठवडा भारतीय खेळांसाठी ‘सुवर्णमय’ ठरला. त्या स्पर्धा सुरू झाल्यापासून बरेच दिवस, भारत दहाव्या स्थानाच्या आसपासच घुटमळत होता. बर्याच क्रीडा प्रकारांत भारतीयांची कामगिरी समाधानकारकही दिसत नव्हती. तथापि जसजशी स्पर्धा पुढे सरकत होती, तेव्हा पराभवाच्या छायेतून बाहेर पडून, सुवर्णपदक विजयाच्या अनेक प्रेरणादायी कथा समोर येऊ लागल्या. यामुळे प्रत्येक भारतीयाचे हृदय अभिमानाने भरले. मागील आशियाई क्रीडा स्पर्धेच्या तुलनेत कदाचित यावर्षीच्या पदकांची संख्या कमी असेल; परंतु खेळाडूंची जिद्द आणि यश मिळेपर्यंत लढण्याचा निर्धार विशेष उल्लेखनीयच. भारताने हांगझू २०२२ मध्ये १०७ पदके आणि आयची-नागोया २०२६ मध्ये ८५ पदके जिंकली. २०२६च्या पदकांच्या एकूण संख्येत २१ सुवर्ण, २७ रौप्य आणि ३७ कांस्यपदकांचा समावेश होता. एकूणच पदकतालिकेत भारत चौथ्या स्थानावर राहिला.
२०१८ची जकार्ता-पालेमबांग आशियाई क्रीडा स्पर्धेच्या तुलनेत पुढील स्पर्धांकडे जरा बघितल्यास आपल्याला कळेल की, ‘अबकी बार कितने पार’ असे आपण म्हणायला हवे. २०२३च्या हांगझूमध्ये भारताने एकूण ७० पदके जिंकली होती. त्याआधी २०१०ला ६५, २०१४त ५७ आणि २०१८ मधील ७० ही भारताची पदकसंख्या होती. ‘अबकी बार सौ पार’ ही घोषणा, भारताने हांगझू येथील २०२३च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत दिली होती. आयची-नागोया (जपान) येथे नुकत्याच संपलेल्या २०२६च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत, अशी अधिकृत घोषणा न करण्यामागे काही प्रमुख क्रीडाविषयक आणि तांत्रिक कारणे होती. ती आपण लक्षात घेतली, तर आपण ‘कितने पानी में’ आहोत, ते कळेल. २०२६च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतून, अनेक क्रीडा प्रकार वगळण्यात आले होते. तसेच मागच्या वेळेच्या तुलनेत, भारतासाठी अनेक पदके मिळवणारे ‘स्केटिंग’ किंवा ‘वुशू’सारखे विशिष्ट क्रीडा प्रकारही यावेळी नव्हते. २०२३च्या हांगझू आशियाई स्पर्धेत भारताने ६५० हून अधिक खेळाडूंचे मोठे पथक पाठवले होते, तर २०२६च्या स्पर्धेसाठी भारताचे पथकच जवळपास २५ टक्क्यांनी लहान म्हणजेच सुमारे ४९५ खेळाडूंचे होते. खेळाडूंची संख्या आणि क्रीडाप्रकार या स्पर्धेत कमी असल्याने, ’१०० पार’ जाण्याची शयता आधीच मर्यादित झाली होती.
भारताचा हुकमी सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राही, या स्पर्धेत सहभागी होऊ शकला नव्हता. त्याच्या अनुपस्थितीचाही अॅथलेटिसमधील पदकांच्या अपेक्षांवर परिणाम झाला. क्रीडा मंत्रालयाने खेळाडूंवर कोणत्याही प्रकारचा राजकीय किंवा मानसिक दबाव न आणता, २०२८च्या ऑलिम्पिकच्या दृष्टीने त्यांच्या वैयक्तिक कामगिरीत आणि वेळेत सुधारणा करण्यावर अधिक भर दिला. या सर्व परिस्थितीमुळे २०२६च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील हा ८५चा आकडा मागच्या वेळच्या १०६ पदकांपेक्षा कमी भासत असला, तरी भारताच्या आशियाई खेळांच्या इतिहासातील ही दुसरी सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे, हे आपण विसरता कामा नये.
श्रीपाद पेंडसे
(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहेत.)
९४२२०३१७०४