दमोहचा समग्र आयडी घोटाळा! १०५ मुलांची नावे एकाच आयडीवर; धर्मांतर आणि बालतस्करीचा संशय

    12-Oct-2026   
 
 
Damoh Samagra ID Scam
 
 
मुंबई (Damoh Samagra ID Scam) : मध्य प्रदेशात चर्चशी संबंधित धर्मांतराची अनेक प्रकरणे समोर येत असताना, दमोह जिल्ह्यात आणखी एक गंभीर प्रकरण उघडकीस आले आहे. समाजसेवेच्या नावाखाली गैरव्यवहार सुरू असल्याचा आरोप या प्रकरणातून समोर आला आहे. मिशनरी संस्थांशी संबंधित या प्रकरणाने सर्वांचे लक्ष वेधले असून, यावेळी समग्र आयडी प्रणालीतील घोटाळ्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. एका समग्र आयडीमध्ये तब्बल १०५ मुलांची नावे समाविष्ट करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाला आतापर्यंतचे सर्वांत मोठे प्रकरण म्हटले असून, बालकांची खरेदी-विक्री, बालकांवरील अत्याचार, मानवी तस्करी आणि धर्मांतर या विविध अंगांनी तपास सुरू केला आहे.
 
या प्रकरणात दमोह मिशन रुग्णालयाचे व्यवस्थापक संजीव लॅम्बर्ट यांना पोलिसांनी पुन्हा अटक केली आहे. बनावट डॉक्टरकडून उपचार झाल्यामुळे काही रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणातही संजीव यांना आठ महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. त्या वेळी त्यांच्यावर ३० हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते. नंतर त्यांची जामिनावर सुटका झाली होती. आता समग्र आयडी घोटाळ्याप्रकरणी दमोह देहात पोलिसांनी त्यांना पुन्हा अटक केली. त्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली.(Damoh Samagra ID Scam)
 
बालकल्याण समितीचे अध्यक्ष दीपक तिवारी यांनी केलेल्या तक्रारीनंतर हे प्रकरण उघडकीस आले. त्यांनी दमोह देहात पोलीस ठाण्यात दिलेल्या अर्जात, संस्थेच्या नावाने तयार करण्यात आलेल्या समग्र आयडीशी अनेक मुलांची नावे जोडण्यात आल्याचे नमूद केले होते. तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार चार सदस्यीय तपास पथकाची स्थापना करण्यात आली. या पथकाच्या अहवालात घोटाळा आणि कागदपत्रांमध्ये फेरफार झाल्याचे आरोप प्रथमदर्शनी योग्य आढळल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी धर्मेंद्र उपाध्याय यांनी अर्जाच्या आधारे तपास केला असता, तक्रारीत तथ्य असल्याचे आढळले. त्यानंतर २५ सप्टेंबर रोजी संजीव लॅम्बर्ट यांच्यासह सहा जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला. लॅम्बर्ट यांना अटक करण्यात आली असून, उर्वरित पाच आरोपी फरार आहेत.(Damoh Samagra ID Scam)
 
पोलिसांनी लॅम्बर्ट यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ४६७, ४६८ आणि ४७१ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ही कलमे गंभीर स्वरूपाची बनावट कागदपत्रे तयार करणे, फसवणुकीच्या उद्देशाने बनावट दस्तऐवज तयार करणे आणि बनावट दस्तऐवज खरे असल्याप्रमाणे वापरणे यांच्याशी संबंधित आहेत.
 
पोलीस निरीक्षक धर्मेंद्र उपाध्याय यांनी सांगितले की, तक्रारीत मुलांच्या समग्र आयडीमध्ये फसवणूक आणि फेरफार केल्याचे गंभीर आरोप आहेत. या मुलांचे जैविक पालक वेगळे असतानाही कागदपत्रांमध्ये फेरफार करून त्यांची नावे एकाच आयडीमध्ये समाविष्ट करण्यात आली. आतापर्यंत मुलांच्या संख्येबाबत वेगवेगळी माहिती समोर आली आहे. मात्र, १०५ मुलांच्या आयडीमध्ये अनियमितता आढळली आहे. सर्व नोंदींची पडताळणी अद्याप सुरू असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले.(Damoh Samagra ID Scam)
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा तपास सुरू असून, आगामी काळात आणखी काही बाबी उघड होण्याची शक्यता आहे. फरार असलेल्या पाच आरोपींना अटक झाल्यानंतर प्रकरणातील आणखी तपशील समोर येऊ शकतात. याशिवाय, आणखी काही आरोपींची नावेही पुढे येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, नाव जाहीर न करण्याच्या अटीवर समाजसेवेशी संबंधित काही व्यक्तींनी सांगितले की, ‘आधारशिला’ या संस्थेवर यापूर्वीही धर्मांतराचे गंभीर आरोप झाले होते. ख्रिश्चन मिशनरी डॉ. अजय लाल यांच्या संचालनाखालील या संस्थेच्या बालगृहाची मान्यता याच कारणामुळे रद्द करण्यात आली होती, असा त्यांचा दावा आहे. या बालभवनावर यापूर्वीही लैंगिक शोषण आणि धर्मांतराचे अनेक आरोप करण्यात आले होते. मध्य प्रदेश बालहक्क संरक्षण आयोग आणि राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाने या प्रकरणाची दखल घेऊन चौकशी केली होती. त्यानंतर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती.(Damoh Samagra ID Scam)
 
अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे पोलिसांसमोर आव्हान
 
या प्रकरणामुळे पोलिसांसमोर अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित झाले आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने मुलांची नावे एकाच समग्र आयडीमध्ये कोणत्या प्रक्रियेद्वारे समाविष्ट करण्यात आली? नोंदींमध्ये फेरफार करण्याचे निर्देश कोणी दिले? या प्रक्रियेत कोणत्या स्तरावरील अधिकारी किंवा कर्मचारी सहभागी होते? तसेच मिशन रुग्णालयाशी संबंधित प्रकरण आणि समग्र आयडी घोटाळा यांचा परस्परांशी काही संबंध आहे का? या सर्व बाबींचा पोलीस तपास करत आहेत. मुलांच्या नोंदी, त्यांचे जैविक पालक आणि संबंधित संस्थांची कागदपत्रे तपासली जात आहेत. दोन्ही प्रकरणांमध्ये संभाव्य संबंध आहेत का, याचाही शोध घेतला जात आहे.(Damoh Samagra ID Scam)
 
ख्रिश्चन धर्मातील प्रथा शिकवणे; त्यांच्याकडून बायबलचे वाचन करून घेणे
 
डॉ. अजय लाल यांच्या आधारशिला संस्थेच्या बालभवनात कार्यरत असलेल्या देवेंद्र डोनियल यांच्याविरोधात एका अल्पवयीन मुलीशी अश्लील स्वरूपात चॅटिंग करणे आणि तिचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करणारी तक्रारही प्राप्त झाली होती. तक्रार प्राप्त झाल्यानंतर बालहक्क आयोगाने या संस्थेच्या चौकशीसाठी सरकारला पत्र लिहिले होते. दुसरीकडे, मध्य प्रदेश बालहक्क आयोगाच्या दोन सदस्यीय पथकाने केलेल्या तपासात या संस्थेत मुलगे आणि मुलींना एकत्र ठेवण्यात येत असल्याचे आढळले. संस्थेचा वॉर्डन डॅनियल याच्यावर एका मुलीच्या लैंगिक शोषणाचा आरोपही होता. याशिवाय, हिंदू मुलांना ख्रिश्चन धर्मातील प्रथा शिकवल्या जात होत्या आणि त्यांच्याकडून बायबलचे वाचन करून घेतले जात होते, असेही तपासात आढळल्याचा दावा करण्यात आला आहे.(Damoh Samagra ID Scam)
 
 
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर