‘कॉसमॉस’ चे मायावी जंगल

    12-Oct-2026
Cosmos Sulphureus Invasive Plant
 
माणूस जन्मजात सौंदर्याचा उपासक. अशातच, निसर्गाने निर्माण केलेल्या वनस्पती सौंदर्याची भुरळ माणसाला पडली नाही, तर नवलच! अशीच आपल्या फुलांमधून सौंदर्याची उधळण करणार्‍या एका मायावी वनस्पतीबद्दलची ही माहिती...
 
ऑक्टोबर महिना नुकताच सुरू झाला आहे. पावसाने अगदी निरोप घेतल्यामुळे रानफुलांनी फुलायला सुरुवात केली. अशातच परदेशातून आपल्याकडे स्थिर झालेली ‘कॉसमॉस’ ही वनस्पती बहरून आली. वनस्पतीशास्त्रीयदृष्ट्या Cosmos sulphureus असे म्हटले जाते. मराठीतल्या ‘कानामागून आली आणि तिखट झाली,’ या म्हणीप्रमाणे परदेशातून आपल्या देशात शिरकाव करत, आज भारतातल्या बर्‍याच राज्यांत ती फुललेली दिसून येते. आकर्षक फुलामुळे मेसिकोमधून ही वनस्पती भारतात आणली गेली. फुलांच्या आकर्षणाने माणसातले निसर्गप्रेम उफाळून येऊन, रानावनात या वनस्पतीच्या बिया फेकल्या गेल्या. त्याचेच फळ म्हणून आज कॉसमॉसचे जंगल जिकडे-तिकडे दिसू लागले आहे. घाणेरी, जलपर्णी, रानमोडीपाठोपाठ या वनस्पतीनेदेखील इथल्या स्थानिक वनस्पतींवर घाव मारण्यास सुरुवात केली आहे.
 
सूर्यफुलाच्या कुळातली ही वनस्पती जेव्हा बहरते, तेव्हा आपल्या केशरी, पिवळ्या रंगांच्या फुलांनी सगळ्यांना मोहून टाकते. घाटमाथ्यावर, रस्त्यावर, डोंगररांगांवर अगदी सहजपणे वाढत असल्यामुळे वनस्पतीचे अस्तित्व आजही टिकून राहिले आहे. मध्य आणि दक्षिण अमेरिकेतील प्राचीन संस्कृतींमध्ये या वनस्पतीच्या पुष्पगुच्छांचा वापर पिवळ्या ते नारंगी रंगाच्या नैसर्गिक रंगद्रव्यांच्या निर्मितीसाठी केला जात असल्याचा संदर्भ आढळतो. मेक्सिकोमध्ये ही वनस्पती ‘गिरासोल’ (Girasol) किंवा ‘मिरासोल अमारिलो’ (Mirasol Amarillo) या नावांनी ओळखली जाते. तेथे पारंपरिक औषधोपचारांमध्येही तिचा वापर केला जातो. मेसिकोदेशात फुले खाण्यायोग्य समजली जातात, फुलांचा आकर्षक पिवळा किंवा नारंगी रंग खाद्यपदार्थांमध्ये, विशेषतः ‘सॅलड’मध्ये, तसेच केक आणि विविध खाद्यपदार्थांच्या सजावटीसाठी केला जातो. भारतात मात्र गुरेसुद्धा त्या वनस्पतीला तोंड लावत नाहीत. या वनस्पतीच्या वाढीमुळे आपल्याकडील स्थानिक गवताच्या प्रजाती कमी होत आल्या. स्थानिक वनस्पतींची जागा कॉसमॉसने घेतल्यामुळे, परिणामी गायी-गुरांच्या चार्‍यासाठी लागणार्‍या वनस्पती कमी झाल्या. ही परदेशी आक्रमक वनस्पती पशुखाद्यावर थेट परिणाम करत झपाट्याने वाढत आहे. वनस्पतीचा आकर्षक फुलोरा मधमाश्या, फुलपाखरांना स्वतःकडे आकर्षित करत असल्यामुळे त्यांचे परागीभवन सहज शक्य होते. परिणामी, परागीभवनाच्या या प्रक्रियेतून वनस्पतीचा बीजप्रसार झपाट्याने होऊ लागला. पूर्वी मर्यादित भागांमध्ये दिसणारी ही फुले दाटीवाटीने वाढून आज संपूर्ण सह्याद्रीच नव्हे, तर घाटमाथा ओलांडून कोकणातदेखील तग धरून उभी राहिली आहेत. एक स्थानिक वनस्पती नाहीशी झाली की फक्त एक वनस्पती नाहीशी होत नाही, तर तिच्यावर अवलंबून असलेले संपूर्ण छोटे जग बदलू शकते. म्हणूनच या आक्रमक वनस्पतीच्या फुलांकडे केवळ सौंदर्य म्हणून न पाहता, त्यामागची पर्यावरणीय बाजू समजून घेणे गरजेचे आहे. आपल्या नैसर्गिक अधिवासातून आपल्या स्थानिक वनस्पती जर कमी झाल्या, तर परिणामी त्यावर आधारित असणारे कीटक आणि इतर घटक संपुष्टात येऊ शकतात.
 
लहानपणी प्रत्येकानेच या कॉसमॉसच्या फुलाला वहीत, कधी शर्टवर उमटवण्याचा प्रयत्न केला असेल. या फुलाची सुंदर छाप भविष्यात इतका ताप देईल, याची कुणालाच कल्पना नव्हती. अधिवासाच्या संतुलनासाठी वनस्पतीला फुले येण्याआधीच वनस्पती काढून टाकणे गरजेचे आहे. फुलोरा आला असेल, तर त्याचा बीजप्रसार होण्याआधीच फुले काढून त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली पाहिजे. मोठ्या प्रमाणात प्रसार झालेल्या ठिकाणी सामुदायिक सहभागातून या वनस्पती वेगळ्या करता येऊ शकतात. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, चुकूनही वनस्पतीच्या बिया जाणून बुजून नैसर्गिक अधिवासात न आणणे. याखेरीज, वनस्पतीच्या फुलांपासून सुंदर बुकमार्क तयार करून उपजीविका आणि वनस्पती नियंत्रणासाठीचा पर्यावरणपूरक मार्ग आपल्याला सापडेल. आज आपण ज्या फुलांबरोबर फोटो काढतोय, उद्या कदाचित त्याच फुलांमुळे आपल्या स्थानिक वनस्पती शोधाव्या लागतील. निसर्ग आपल्याला सुंदर दिसतो, म्हणून तो सुंदर नाही. तो सुंदर आहे, कारण त्यामध्ये असंख्य स्थानिक वनस्पती, कीटक, पक्षी, प्राणी आणि सूक्ष्मजीव यांचे एक अदृश्य, पण अत्यंत महत्त्वाचे नाते आहे. ते नातं टिकवण आपल्याच हातात आहे. पूर्वी गोष्टींमध्ये सांगितली जाणारी चेटकीण कितीही सुंदर दिसली, तरी तिचे खरे रूप एक ना एक दिवस समोर येतेच, असंच या वनस्पतीच्या बाबतीतदेखील म्हणावं लागेल. निसर्गात काहीतरी टाकणं, म्हणजे निसर्गाची सेवा करणे नव्हे. निसर्गात काय टाकायचे, कुठे टाकायचे आणि त्याचा परिणाम काय होईल, हे समजून घेणंही तितकंच महत्त्वाचे आहे.
 
परेश गुरव
(लेखक रत्नागिरीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयात वनस्पतिशास्त्र विभागात साहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.)
७४४७३७६९९७




संबंधित मजकूर