उच्च शिक्षणात भारतीय दृष्टिकोनाचा समावेश आवश्यक; सहसरकार्यवाह अतुल लिमये यांचे प्रतिपादन

    12-Oct-2026   
 
 
Indian Perspective in Higher Education 
 
मुंबई (Indian Perspective in Higher Education) : देशाला ‘विकसित भारत’ बनविण्याचा संकल्प सिद्ध करण्यासाठी शिक्षणाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, चारित्र्यनिर्माण आणि संवेदनशीलता यांची बीजे रुजवणारे शिक्षण असले पाहिजे. यासाठी अभ्यासक्रमात भारतीय ज्ञानपरंपरा आणि भारतीय दृष्टिकोनाचा समावेश करणे अत्यावश्यक आहे. शिक्षणक्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्यासाठी दुसऱ्या कोणाच्या पुढाकाराची वाट न पाहता प्रत्येकाने स्वतःहून पुढे येऊन प्रयत्न केले पाहिजेत, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह अतुल लिमये यांनी केले.
 
भारतीय शिक्षण मंडळ (पश्चिम महाराष्ट्र प्रांत आणि पुणे महानगर) यांच्या वतीने आयोजित ‘नवोन्मेष – अध्ययन मंडळ सदस्य संवाद’ या कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी त्यांनी उच्च शिक्षणात भारतीय दृष्टिकोनाचा समावेश करण्यावर भर दिला. एस. पी. महाविद्यालयाच्या परिसरातील भाऊसाहेब चितळे सभागृहात आयोजित या कार्यक्रमात पुणे आणि परिसरातील विविध विद्यापीठे तसेच स्वायत्त महाविद्यालयांच्या अभ्यास मंडळांचे ५०० हून अधिक संयोजक आणि सदस्य सहभागी झाले होते. भारतमाता आणि माँ सरस्वती यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून, पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.(Indian Perspective in Higher Education)
 
उपस्थितांना संबोधित करताना अतुल लिमये पुढे म्हणाले, यापूर्वी शैक्षणिक परिसरांमध्ये विद्यार्थ्यांना स्वामी विवेकानंद आणि छत्रपती शिवाजी महाराज यांसारख्या महान राष्ट्रपुरुषांविषयी आणि आदर्श व्यक्तिमत्त्वांविषयी शिकवण्याऐवजी डाव्या विचारसरणीला अनुचित प्राधान्य दिले गेले. शिक्षण निष्पक्ष आणि तटस्थ भावनेतून दिले गेले पाहिजे, अभ्यासक्रमात बदल करताना सर्वप्रथम आत्मपरीक्षण करून ‘काय नको आहे’ याचा विचार केला पाहिजे. त्यानंतर ‘काय समाविष्ट करायचे आहे’, हे निश्चित करावे. इतिहासाबरोबरच पर्यावरण, विज्ञान, राज्यशास्त्र आणि न्यायशास्त्र यांसारख्या विषयांमध्येही भारतीय दृष्टिकोन आणि ज्ञानाचा समावेश केला पाहिजे.
 
त्यांनी आवाहन केले की, प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र अध्ययन गट स्थापन करावेत. या गटांमध्ये अभ्यास मंडळांच्या सदस्यांसह संबंधित क्षेत्रातील विषयतज्ज्ञांचाही समावेश करावा. भारतीय भाषांच्या माध्यमातून तांत्रिक शिक्षण देण्यावर विशेष भर द्यावा. विद्यार्थ्यांना समाजातील वास्तविक समस्यांवर आधारित व्यावहारिक प्रकल्प द्यावेत. यामुळे त्यांच्यामध्ये सामाजिक संवेदनशीलता विकसित होण्यास मदत होईल. शिक्षणक्षेत्रात राबवण्यात येणारे उत्कृष्ट प्रयोग आणि नावीन्यपूर्ण उपक्रम यांचे संकलन करून एक ‘माहिती भांडार’ तयार करावे.(Indian Perspective in Higher Education)
 
कार्यक्रमाची पार्श्वभूमी विशद करताना भारतीय शिक्षण मंडळाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांताध्यक्ष रविकुमार चिटणीस म्हणाले की, पुणे हे प्रारंभापासूनच शिक्षणाचे प्रमुख केंद्र राहिले आहे. या संवादाच्या माध्यमातून तरुणांना सर्वांगीण मार्गदर्शन करून ‘समर्थ भारत’ घडविण्यासाठी प्रेरित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भारतीय शिक्षण मंडळाचे अखिल भारतीय संघटनमंत्री बी. आर. शंकरानंद म्हणाले की, विद्यार्थ्यांमध्ये अध्ययनाची आवड निर्माण करणे, त्यांचे व्यक्तिमत्त्व अधिक समृद्ध करणे आणि चारित्र्यनिर्माण करणे, हा शिक्षणाचा मूलभूत उद्देश आहे. भारतीय दृष्टिकोन हा एकांगी विचार नसून, तो सर्वसमावेशक आणि समग्र दृष्टिकोन आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.(Indian Perspective in Higher Education)
 
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर