कलासक्त मनाचा सेवाधर्म...

    12-Oct-2026   
Anuja Govande Artist and Entrepreneur
 
कुंचल्याच्या जादूने साड्या आणि ज्यूट बॅगवर सौंदर्य फुलवणार्‍या प्रख्यात चित्रकार आणि उद्योजिका अनुजा गोवंडे यांच्याविषयी...
 
अनुजा यांचा जन्म डोंबिवलीत झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण टिळकनगर बालविद्यामंदिर येथे झाले. अनुजा यांना लहानपणापासूनच चित्रकलेची आवड होती. चित्रकलेचे बाळकडू त्यांना आपल्या आजोबांकडूनच मिळाले. अनुजा यांचे आजोबा गणेश पिंपुटकर हे रेल्वेत, आर्किटेट म्हणून कार्यरत होते. त्याचबरोबर त्यांना चित्रकलेचीही आवड होती. तसेच, त्यांचा मोठा भाऊ मिलिंददेखील, उत्तम चित्रे रेखाटत असे. अनुजा यांच्या शाळेतील कुलकर्णी सर, त्यांच्याकडून चित्रकलेचा सराव करून घेत असत. त्यामुळेच चित्रे काढण्यात अनुजा यांचा चांगला हात बसला.
 
अनुजा यांनी दहावीची परीक्षा दिल्यानंतर, सुटीत दादर येथे ‘प्रकाश क्रिएशन’ येथे काम करण्यासाठी जात होत्या. अर्थात त्यामागे चित्रकलेच्या विविध प्रातांत मुशाफिरी करता यावी, एवढाच हेतू त्यांचा होता. त्या पॅच भरणे, फुले काढणे अशी विविध कामे करत. त्यासाठी त्यांना थोडाफार पैसेही मिळत. त्यानंतर त्यांनी ‘मॉडेल आर्ट स्कूल’ येथे, एक वर्षाचा ‘फाऊंडेशन कोर्स’ केला. हा अभ्यासक्रम झाल्यावर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील ‘करिअर कॉलेज’मध्येही त्यांनी प्रवेश घेतला. हे महाविद्यालय सकाळी ७ ते ९ असायचे, त्यामुळे त्या नऊ वाजल्यानंतर मोकळ्याच असत. या महाविद्यालयात त्यांनी त्यांनी तीन वर्षे प्रशिक्षण घेतले.
 
महाविद्यालय संपल्यानंतर त्यांनी अर्थार्जन सुरु केले. त्यांनी गिरगावच्या ‘चेतना बुक डेपो’ येथेही काही वर्ष काम केले, तसेच ‘सन आर्ट क्रिएशन’ येथेही काम केले. अनुजा यांचे वडील मधुकर पिंपुटकर हे ‘महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँके’च्या फोर्ट शाखेत नोकरी करत होते. अनुजा यांच्या आई मिनाक्षी या गृहिणी. त्यांच्या वडिलांनी ‘डोंबिवली नागरी सहकारी बँके’चे संचालक म्हणूनही काम पाहिले आहे. ‘देवरूखे ब्राह्मण संघ’, ‘ज्येष्ठ नागरिक संघ’ अशा विविध सामाजिक संघटनांशीही ते जोडलेले होते. वडील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराशी जोडलेले असल्याने, घरात एकप्रकारची शिस्त उपजतच होती. त्यामुळे अनुजा व त्यांचा भाऊ आणि बहीण अशा तिघांनाही चांगली शिस्त लागली. त्यांची बहीण शुभांगी भोळे संगीत विशारद आहे.
 
अनुजा यांची विवाहगाठ १९९४ला अभय गोवंडे यांच्याशी बांधली गेली. त्यांचे माहेर आणि सासर दोन्ही डोंबिवलीचेच. लग्नानंतरही काही काळ अनुजा नोकरी करत होत्या. त्यांच्या सासू लतादेखील कलाशिक्षिका होत्या. डोंबिवलीच्या पाटकर स्कूलमध्ये त्यांनी, विद्यार्थ्यांना कलेचे शिक्षण दिले. त्यांना रिदिमा नावाची एक मुलगी असून, ती आर्किटेट आहे. २००३-०४च्या दरम्यान, अनुजा यांनी चित्रकलेचे शिकवणीवर्ग सुरू केले. त्यांच्या या प्रशिक्षण वर्गात केजीपासून, ज्येष्ठ नागरिक महिलाही सहभागी होत असत. त्यांची मुलगी शिक्षणासाठी काही काळ पुण्यात वास्तव्यास होती. त्यामुळे अनुजा यांचेदेखील कधी डोंबिवली, तर कधी पुण्यात राहणे होत असे. डोंबिवलीसारखेच त्यांनी पुण्यात ही कलावर्ग सुरू केले. ७५ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिक महिला जेव्हा चित्रात रंग भरत असत, ते पाहून अधिक आनंद होत असल्याचे अनुजा सांगतात.
 
‘कोविड’ काळात अनुजा यांनी चित्रकलेचे वर्ग बंद केले आणि ज्यूट बॅग बनविण्याचा व्यवसाय याच काळात सुरू केला. ज्यूट बॅगवर त्या ज्या पद्धतीने नक्षीकाम करत असत, तसेच नक्षीकाम त्या साडीवरही करतात. त्यांची साडीवर रेखाटलेली चाफ्याची फुले असो किंवा गोकर्णाची, सर्वच फुले हुबेहुब रेखाटण्याचे त्यांचे कसब त्यांच्याठायी दिसून येते. या ज्यूट बॅग आणि प्रिंट केलेल्या साड्यांच्या विक्रीसाठी, त्या विविध प्रदर्शनातही सहभागी होतात. ‘माऊथ पब्लिसिटी’वरदेखील त्यांचा भर होता. अनुजा इयत्ता चौथीत असताना, त्यांना माजी नगराध्यक्ष आबासाहेब पटवारी यांच्या हस्ते चित्रकलेतील बक्षीस मिळाले होते. तसेच ‘जहांगीर आर्ट गॅलरी’ येथे लावलेल्या त्यांच्या एक चित्रालाही, पहिले क्रमांकाचे बक्षीस मिळाले होते. ते बक्षीस त्यांना बाबुराव सडेवलकर यांच्या हस्ते देण्यात आले.
 
अनुजा यांनी जवळपास २० वर्षे महिलांना फॅब्रिक पेंटिंग, कनव्हॉस पेंटिंग, वारली पेंटिंग असे विविध प्रकारचे धडे दिले आहेत. विशेष म्हणजे, यंदाच्या नवरात्रीत त्या रणरागिणींचा कौतुकसोहळा करणार आहेत. त्यासाठी त्या नऊ महिलांना त्यांच्या घरी आमंत्रित करणार असून, त्यांच्याशी गुजगोष्टी करणार आहेत. महिला या दिवसभर घरासाठी कष्ट करतात. या सगळ्यांतून विश्रांती घेऊन महिलांनी एकमेकांशी हितगुज साधावे, या विचाराने त्या रणरागिणींचा कौतुकसोहळा यावर्षी करणार आहेत. त्यामध्ये अनुजा यांच्या शाळा आणि महाविद्यालयाच्या मैत्रिणींचाही समावेश आहे.
 
आपल्या या प्रवासात मुलगी रिदिमा हिने आपल्याला मोलाची साथ दिली. अनुजा यांना संधिवाताचा त्रास असून, त्यामुळे त्यांच्या आरोग्याची संपूर्णपणे काळजी घेण्याचे काम रिदिमाच करते. तिच्या परीने सामाजिक संस्थांना दान करण्याचेही काम रिदिमा करत असते. विशेष म्हणजे, केलेले दान कोणालाही सांगू नये, यासाठी त्यांचा कुठेही उल्लेख रिदिमा करत नाही, असेही अनुजा यांनी सांगितले आहे. कलेसाठी जगताना, ती कला अनेकांपर्यंत पोहोचवणार्‍या चित्रकार उद्योजिका अनुजा गोवंडे यांना पुढील भविष्यासाठी दै. ’मुंबई तरुण भारत’च्या हार्दिक शुभेच्छा!
 
 




संबंधित मजकूर