शिक्षणक्रांतीची ज्ञानदुर्गा!

    12-Oct-2026
 
Kunda Bachhav Shinde National Teacher Award 2026
ज्ञानभिंतींपासून ‘स्टेम क्लास अ‍ॅण्ड स्किल लॅब’पर्यंत भरारी घेणार्‍या आणि १५० हून अधिक मुलींच्या शिक्षणाला आधार देणार्‍या कुंदा बच्छाव-शिंदे यांची प्रेरणादायी गाथा...
 
नवरात्रीतील स्त्रीशक्तीचा जागर म्हणजे संघर्षावर मात करून यशाची नवी शिखरे गाठणार्‍या कर्तृत्ववान महिलांचा गौरव! याच स्त्रीशक्तीचे प्रेरणादायी रूप म्हणजे नाशिकच्या शिक्षणक्षेत्रात परिवर्तनाची मशाल पेटवणार्‍या ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’विजेत्या कुंदा बच्छाव-शिंदे! शिक्षण केवळ वर्गखोल्यांत बंदिस्त न ठेवता, ते समाजाच्या प्रत्येक कोपर्‍यात पोहोचवण्याचा ध्यास त्यांनी घेतला. त्यांच्या शैक्षणिक योगदानाची दखल घेत २०२६चा ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. दि. ५ सप्टेंबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्लीत त्यांचा गौरव झाला.
 
नाशिक महानगरपालिकेच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले विद्यामंदिर, आनंदवली येथे कार्यरत असलेल्या कुंदा बच्छाव-शिंदे यांना २१ वर्षांच्या शैक्षणिक सेवेचा अनुभव आहे. परिसरातील ३० हून अधिक घरांच्या भिंतींवर गणिती सूत्रे, विज्ञानाच्या संकल्पना आणि इंग्रजी व्याकरण साकारून त्यांनी ‘ज्ञानभिंत’ उपक्रम राबवला. विद्यामंदिरात लोकसहभागातून दोन हजारांहून अधिक पुस्तकांचे वाचनालय सुरू केले. ‘स्टेम क्लास अ‍ॅण्ड स्किल लॅब’, ‘बुक्स ऑन व्हील’, ‘ट्री टॉक’ आणि ‘स्मार्ट अटेंडन्स’ यांसारख्या प्रयोगांतून विद्यार्थ्यांना आधुनिक, अनुभवाधारित शिक्षणाची संधी दिली. मोबाईलच्या अतिवापराला आळा घालण्यासाठी ‘मिशन मोबाईल-फ्री’ अभियानही राबवले.
 
"बाई, मला लग्न नाही करायचंय, मला शिकायचंय,” विद्यार्थिनीच्या या आर्त विनंतीने त्यांच्या सामाजिक कार्याला नवी दिशा दिली. २०२१ मध्ये पाच मुलींपासून ‘शैक्षणिक पालकत्व’ उपक्रम सुरू झाला. ‘कर्मदान परिवार’च्या माध्यमातून आजवर १५० हून अधिक गरजू मुलींच्या शिक्षणाला आर्थिक व शैक्षणिक आधार मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. आर्थिक अडचणी आणि बालविवाहाच्या दबावामुळे मुलींचे शिक्षण थांबू नये, हा त्यांच्या धडपडीचा केंद्रबिंदू आहे.
 
लोकसहभागातून शाळेचा कायापालट
 
शाळेच्या विकासासाठी लोकसहभाग आणि कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) ५५ लाख रुपयांहून अधिक निधी उभारण्यात आला. दोन हजारांहून अधिक वृक्षलागवड करून पर्यावरण संवर्धनाचाही संदेश दिला. २०१९ मध्ये शिक्षक नवोपक्रम पुरस्कारानेही त्यांचा गौरव झाला होता.
 
ज्ञानभिंतींनी विचार जागवले, प्रयोगांनी जिज्ञासा फुलवली आणि शैक्षणिक पालकत्वाने मुलींच्या स्वप्नांना पंख दिले. कुंदा बच्छाव-शिंदे यांचे कार्य म्हणजे एका शिक्षिकेचा सन्मान नव्हे, तर समाजाच्या सहभागातून घडणार्‍या शैक्षणिक क्रांतीचा प्रेरणादायी अध्याय आहे.
 
- रेणुका गायकवाड 




संबंधित मजकूर