निळ्या रंगातील मायेची कहाणी!

    12-Oct-2026
 
Black-naped Monarch Bird
 
हिरव्यागार जंगलात निळसर रंगाची एखादी झलक दिसते आणि क्षणार्धात लक्ष वेधले जाते. काळ्या मानेचा आकाशी माशीमार हा छोटासा पक्षी आपल्या देखण्या रंगांइतकाच घरट्यातील पिल्लांसाठी घेत असलेल्या कष्टांमुळेही लक्षात राहतो. याच कष्टाची जाणीव करून देणारी ही माहिती...
 
हिरव्यागार जंगलात एखाद्या फांदीवर निळ्या रंगाची झलक दिसते आणि क्षणार्धात लक्ष वेधले जाते. झाडांच्या पानांमध्ये चपळाईने वावरणारा हा पक्षी म्हणजे काळ्या मानेची आकाशी माशीमार (Black-naped Monarch - Hypothymis azurea). निळसर रंग, डोक्याच्या मागील बाजूस असलेली काळी खूण आणि कीटक पकडण्यासाठी घेतल्या जाणार्‍या चपळ झेपा यांमुळे हा पक्षी उठून दिसतो. मात्र, त्याचे खरे सौंदर्य केवळ रंगांपुरते मर्यादित नाही. घरट्यातील पिल्लांसाठी अन्नाची जुळवाजुळव करताना दिसणारी त्याची धडपड निसर्गातील पालकत्वाची आणि जगण्याच्या संघर्षाची कहाणी सांगते.
 
Monarchidae कुळातील हा छोट्या आकाराचा कीटकभक्षी पक्षी भारतातील अनेक वृक्षाच्छादित प्रदेशांत आढळतो. नराच्या शरीरावरील निळसर रंग आणि मानेच्या मागील बाजूस असलेली काळी खूण ही त्याची प्रमुख ओळख आहे. मादीचा रंग तुलनेने फिकट असतो. दाट झाडीत वावरण्याची सवय आणि क्षणार्धात दिशा बदलण्याची क्षमता यांमुळे त्याचे निरीक्षण करणे, हे पक्षीप्रेमींसाठीही आव्हान ठरते.
 
घरट्यातील चोची आणि पालकांची धडपड
 
प्रजननकाळात पक्ष्यांचे जग बदलते. घरटे बांधण्यापासून अंडी उबवण्यापर्यंत आणि पिल्लांना अन्न पुरवण्यापासून त्यांच्या सुरक्षेपर्यंत प्रत्येक टप्प्यावर पालक पक्ष्यांची कसोटी लागते. पिल्ले जन्माला आल्यानंतर अन्नाची गरज वाढते आणि पालकांची धावपळही अधिक तीव्र होते. माझ्या छायाचित्रात काळ्या मानेची आकाशी माशीमार घरट्यात उभी असून, खाली अन्नाच्या प्रतीक्षेत चोची उघडून बसलेली पिल्ले दिसतात. हा क्षण वरकरणी साधा वाटत असला, तरी त्यामागे जगण्यासाठी सुरू असलेली धडपड दडलेली आहे. प्रत्येक उघडी चोच अन्नाची गरज व्यक्त करते आणि ती गरज पूर्ण करण्यासाठी पालक पक्ष्याला पुन्हा पुन्हा खाद्याच्या शोधात बाहेर पडावे लागते. कीटक पकडणे, घरट्याकडे परतणे आणि पिल्लांना भरवणे, या चक्रात त्याची अखंड हालचाल सुरू असते.

छोटा पक्षी, पण परिसंस्थेतील महत्त्वाची भूमिका
 
काळ्या मानेची आकाशी माशीमार प्रामुख्याने कीटकांवर जगते. फांदीवर बसून परिसरावर नजर ठेवायची आणि योग्य संधी मिळताच हवेत झेप घेऊन कीटक पकडायचे, ही तिची शिकार करण्याची पद्धत. कीटकांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने अशा पक्ष्यांचे परिसंस्थेत महत्त्व आहे. आकाराने लहान असला, तरी अन्नसाखळीतील त्याचे स्थान दुर्लक्षित करता येत नाही. त्याच्या हालचाली टिपण्यासाठी छायाचित्रकाराला संयम राखावा लागतो. बराच वेळ शांत बसलेला पक्षी अचानक झेप घेतो आणि काही क्षणांत पुन्हा दुसर्‍या फांदीवर जाऊन बसतो. त्यामुळे योग्य क्षण टिपण्यासाठी केवळ वेगवान कॅमेरा पुरेसा नसतो; पक्ष्याच्या वर्तनाचा अभ्यास आणि निरीक्षणाची दृष्टीही आवश्यक असते.
 
छायाचित्रापलीकडचा निसर्गसंवर्धनाचा संदेश
 
वन्यजीव छायाचित्रणाचा खरा अर्थ केवळ एखाद्या जीवाचे सौंदर्य टिपणे, इतकाच नाही. त्या प्रतिमेतून त्याचे वर्तन, जगण्याची धडपड आणि त्याच्या अधिवासाचे महत्त्व समोर आणणे, हीदेखील छायाचित्रकाराची जबाबदारी आहे. जंगलातील झाडे, दाट झुडपे आणि वेलींची गुंतागुंत ही केवळ हिरवीगार दृश्ये नाहीत; ती असंख्य जीवांची घरे आहेत. अशा अधिवासांचा र्‍हास झाला, तर पक्ष्यांच्या घरट्यांपासून त्यांच्या अन्नसाखळीपर्यंत सर्वच गोष्टींवर परिणाम होऊ शकतो. म्हणूनच जैवविविधतेचे संरक्षण करताना प्रत्येक जीवाच्या अधिवासाला प्राधान्य देणे आवश्यक आहे. निळ्या रंगाचा हा छोटासा पक्षी आपल्याला एक मोठी गोष्ट शिकवतो, पुढची पिढी सुरक्षित ठेवण्यासाठी तिचे घर सुरक्षित असणे गरजेचे आहे. निसर्ग जपणे, म्हणजे केवळ जंगल वाचवणे नव्हे, तर त्या जंगलात आकाराला येणार्‍या असंख्य नव्या जीवांचे भविष्य जपणे होय.
 
टीप : घरट्याजवळ छायाचित्रण करताना सुरक्षित अंतर राखावे. पक्ष्यांच्या नैसर्गिक वर्तनात व्यत्यय येणार नाही आणि पिल्लांना धोका निर्माण होणार नाही, याची काळजी घेणे, ही जबाबदार वन्यजीव छायाचित्रणाची मूलभूत अट आहे.
 
विवेक आंबेरकर
(लेखक वन्यजीव छायाचित्रकार आहेत.)
९९२०२६६९९२




संबंधित मजकूर