मुंबई (Bangla Sahib Gurdwara Protest) : दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीने रविवारी आम आदमी पक्ष आणि पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली. बंगला साहिब गुरुद्वाराच्या परिसरात आंदोलन करण्याचा प्रयत्न करून गुरुद्वाराच्या पावित्र्याला धक्का देण्याचा आणि या घटनेचे राजकारण करण्याचा आरोप समितीने केला. दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हरमीत सिंह कालका यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, शनिवार, दि. १० ऑक्टोबर रोजी आम आदमी पक्षाशी संबंधित आंदोलकांच्या एका गटाने गुरुद्वाराच्या आत आंदोलन करण्याचा प्रयत्न केला.
या घटनेचा निषेध करत कालका यांनी आम आदमी पक्षावर शीख समुदायाच्या भावना दुखावल्याचा आरोप केला. ते म्हणाले, “बंगला साहिब गुरुद्वाराला राजकीय आखाडा बनवण्याचे प्रयत्न होत असल्याचे पाहून अतिशय दुःख होते. हे एक पवित्र धार्मिक स्थळ आहे. येथे लोक प्रार्थना करण्यासाठी आणि आपल्या दुःखातून मुक्ती मिळावी, यासाठी येतात. मात्र, आंदोलकांनी येथे प्रवेश करून निदर्शने करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शीख समुदायाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.”(Bangla Sahib Gurdwara Protest)
कालका यांनी सांगितले की, आंदोलक गुरुद्वारात आले, तेव्हा त्यांच्या हातात कोणतीही वस्तू नव्हती. त्यांच्याकडे केवळ पाठीवरच्या बॅगा होत्या. मात्र, हळूहळू मोठ्या संख्येने आंदोलक गुरुद्वारात जमल्यानंतर त्यांनी पोस्टर आणि बॅनर बाहेर काढले, आंदोलन सुरू केले आणि घोषणाबाजी केली. गुरुद्वारात आंदोलकांसह सर्वांचे स्वागत आहे; मात्र, धार्मिक स्थळाच्या आत आंदोलन करण्यास परवानगी नाही, असे कालका यांनी स्पष्ट केले. आंदोलकांनी गुरुद्वाराच्या पावित्र्याची पर्वा न करता त्याचे आंदोलनस्थळात रूपांतर करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला.(Bangla Sahib Gurdwara Protest)
या घटनेनंतर आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी दिशाभूल करणारे व्हिडिओ प्रसारित केल्याचा आरोपही कालका यांनी केला. या व्हिडिओंमध्ये पोलीस कर्मचारी गणवेश आणि बूट घालून गुरुद्वारात प्रवेश करत असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पोलीस कर्मचारी मुख्य प्रार्थनास्थळ असलेल्या दरबार साहिबमध्ये गेले नव्हते. ते गुरुद्वाराच्या आवारातील सर्वसामान्यांसाठी खुल्या असलेल्या मार्गावरून गेले होते. या मार्गाचा वापर लोक ये-जा करण्यासाठी नियमितपणे करतात, असे कालका यांनी सांगितले.
दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांनी आरोप केला की, अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी आधी आंदोलकांना गुरुद्वारात पाठवून धार्मिक स्थळाच्या पावित्र्याचा भंग केला आणि त्यानंतर गुरुद्वाराला बेकायदेशीर आंदोलनाशी जोडणारे दिशाभूल करणारे व्हिडिओ प्रसारित करून त्याची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला. पंजाबमध्ये या घटनेच्या माध्यमातून राजकारण करण्याचा हा प्रयत्न असल्याचेही त्यांनी म्हटले. कालका म्हणाले, “या परिस्थितीचा जाणीवपूर्वक विपर्यास केला जात आहे. विशेषतः दिल्लीतील आम आदमी पक्षाचे आमदार या प्रकरणात गलिच्छ राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मला त्यांना स्पष्टपणे सांगायचे आहे की, हे गुरुद्वारा आहे, तुमच्या राजकारणाचा आखाडा नाही. येथे असे प्रकार केले, तर गुरुसाहेब तुम्हाला कधीही माफ करणार नाहीत.”(Bangla Sahib Gurdwara Protest)
दरम्यान, बंगला साहिब गुरुद्वाराच्या आत आंदोलन करणाऱ्या व्यक्तींची ओळख पटवून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करणारी तक्रार कालका यांनी दिल्लीचे पोलीस आयुक्त यांच्याकडे दाखल केली आहे.
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक