‘अ‍ॅक्शन’विश्वाची निर्भीड दुर्गा!

 Shaila Tike Kulkarni Action Director
 
पुरुषप्रधान ‘अ‍ॅक्शन’ विश्वात जिद्द, धैर्य आणि कौशल्याच्या बळावर स्वतःची ओळख निर्माण करणार्‍या शैला टिके-कुलकर्णी यांचा प्रेरणादायी प्रवास...
 
नऊ दिवस, आदिशक्तीची नऊ रूपे आणि स्त्रीशक्तीच्या कर्तृत्वाचा जागर! नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पूजल्या जाणार्‍या ‘शैलपुत्री’चे रूप जिद्द, धैर्य आणि संकटांवर मात करण्याची प्रेरणा देते. याच प्रेरणेची जणू आधुनिक झलक म्हणजे शैला टिके-कुलकर्णी! घरची परिस्थिती बेताची आणि समोर पुरुषांचे वर्चस्व असलेले ‘अ‍ॅक्शन’ दिग्दर्शनाचे क्षेत्र. अशा परिस्थितीतून मार्ग काढत त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. मात्र, स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून रूढ चौकटी मोडणार्‍या एका दुर्गेची प्रेरणादायी कहाणी आहे.
 
सातारा जिल्ह्यातील वाई येथील एका सामान्य कुटुंबात शैला यांचा जन्म झाला. वडील शिवाजी टिके-आई संगीता टिके यांनी मुलीच्या स्वप्नांना बळ दिले. आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही आई-वडिलांनी शिक्षण आणि प्रशिक्षणात कोणतीही कमतरता राहू दिली नाही. वयाच्या दुसर्‍या वर्षापासून ‘मार्शल आर्ट्स’चे प्रशिक्षण घेणार्‍या शैला यांनी पुढे नृत्य, अभिनय आणि नृत्यदिग्दर्शनाच्या क्षेत्रातही स्वतःची ओळख निर्माण केली.
 
‘हल्ला बोल’ या दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमाच्या विजेतेपदापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास ‘झलक दिखला जा’ आणि ‘आयफा’ पुरस्कार सोहळ्यांसारख्या मोठ्या मंचांपर्यंत पोहोचला. मात्र, केवळ प्रसिद्धीच्या मागे न धावता त्यांनी नृत्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. याच वेळी दुबईतील आंतरराष्ट्रीय साहसी कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय शोची प्रमुख अभिनेत्री म्हणून त्या सहभागी झाल्या. हा शो जगभरातील सर्वांत आव्हानात्मक आणि धोकादायक ‘लाईव्ह स्टंट’साठी परिचित आहे. यासाठी तीन महिन्यांचे कठोर प्रशिक्षण घेतले आणि साडेतीन वर्षांत आठ हजारांहून अधिक यशस्वी प्रयोग केले. दुबईत असताना सहज तयार केलेल्या एका ‘अ‍ॅक्शन’ चित्रफितीने त्यांच्या आयुष्याला अनपेक्षित वळण दिले. याच चित्रफितीच्या माध्यमातून त्यांना दक्षिण भारतीय चित्रपटासाठी ‘अ‍ॅक्शन दिग्दर्शना’ची संधी मिळाली. त्यानंतर त्यांनी अनेक हिंदी, मराठी आणि दक्षिण भारतीय चित्रपटांसाठी काम करत ‘अ‍ॅक्शन दिग्दर्शन’ या क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
 
त्यांनी ‘गोलमाल’ (तामिळ), ‘मेहेल’, ‘इंद्रजाल’, ‘विकी’ आणि ‘दृश्य-अदृश्य’ यांसह आठहून अधिक चित्रपटांसाठी ‘अ‍ॅक्शन दिग्दर्शन’ केले आहे. अभिनय क्षेत्रात त्यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘वजीर’ चित्रपटात काम केले असून, ‘आसमान से आगे’ मालिकेत प्रमुख भूमिकांपैकी एक भूमिका आणि ‘सीआयडी’च्या २३ भागांत अभिनय केला आहे. दुबईतील आंतरराष्ट्रीय थेट साहसी नाट्यप्रयोगात प्रमुख महिला कलाकार म्हणून त्यांनी साडेतीन वर्षांत आठ हजारांहून अधिक प्रयोग सादर केले. ‘हल्ला बोल’ या नृत्यविषयक दूरचित्रवाणी कार्यक्रमाच्या विजेत्या असलेल्या शैला यांनी ‘जस्ट डान्स’, ‘झलक दिखला जा’, ‘नच बलिये’ आणि ‘आयफा’ पुरस्कार सोहळ्यांसाठी नृत्यदिग्दर्शन केले आहे. ‘कबड्डी विश्वचषक २०१६’मध्ये रणवीर सिंहचे ‘अ‍ॅक्ट’ नृत्य दिग्दर्शन केले. विशेष सादरीकरणही त्यांनी तयार केले. महाराष्ट्र पोलिसांसोबत महिला सुरक्षा व स्वसंरक्षणविषयक जनजागृती कार्यक्रमांत सहभागी होत, त्या गेल्या दोन वर्षांहून अधिक काळापासून सामाजिक योगदान देत आहेत. अहिल्यानगर ‘आर. के. स्टुडिओज’च्या माध्यमातून साहसी क्रीडा आणि सादरीकरण या कलांना प्रोत्साहन देण्यासाठी शैला कार्यरत आहेत. मात्र, यशाचा हा प्रवास अडथळ्यांविना नव्हता. पुरुषप्रधान क्षेत्रातील स्वीकाराचा अभाव आणि संधींसाठी करावा लागणारा संघर्ष याला त्यांनी धैर्याने तोंड दिले. यामध्ये शैला यांना त्यांचे जीवनसाथी आणि अभिनय आणि नृत्य क्षेत्रातील नामांकित राहुल कुलकर्णी याची मोलाची साथही लाभते. शैला सांगतात, "प्रत्येक साहसी दृश्यामागे कलाकारांच्या सुरक्षिततेची मोठी जबाबदारी असते, याची जाणीव ठेवत नियोजन, सराव आणि तांत्रिक तयारीला सर्वोच्च प्राधान्य देते.”
 
आई-वडिलांना स्वतःचे घर देण्याचे स्वप्न पूर्ण करणार्‍या शैला यांच्यासाठी यश म्हणजे केवळ स्वतःची प्रगती नाही, तर आपल्या कर्तृत्वातून इतर महिलांसाठीही नव्या वाटा खुल्या करणे आहे. भविष्यात गणवेशधारी महिला अधिकार्‍याची भूमिका साकारण्याचे स्वप्न त्या पाहतात.
 
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्रीच्या धैर्याची आठवण करून देणारा शैला यांचा प्रवास सांगतो; परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द, कौशल्य आणि आत्मविश्वासाच्या बळावर स्वतःचे आकाश निर्माण करता येते!




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर