आवरा या विकृतांना!

    11-Oct-2026   
Rahul Gandhi Protest Controversy
 
आंदोलन करून रस्ता अडवू नये म्हणून, महिला पोलीस तिला बाजूला नेत होते. तिने काय केले, तर महिला पोलिसाच्या छातीवरच हाताचे कोपर मारले. दुसरीकडे तिच्या भावाने एका महिला पोलिसालाच, अत्यंत आक्षेपार्ह पद्धतीने ढकलले. हे दोघे भाऊ-बहीण गल्लीबोळातले टपोरी होते का? नाही, तर ते होते काँग्रेसच्या सर्वेसर्वा गांधी घराण्याचे राजकुमार-राजकुमारी! अर्थात राहुल आणि प्रियांका गांधी. काय म्हणावे? यांना म्हणे, देशाचे पंतप्रधान व्हायचे आहे. नव्हे, त्यांच्या चेल्या-चपाट्यांच्या मते, तर या दोघांशिवाय ब्रह्मांडात कुणी नेताच नाही. या परिप्रेक्ष्यात झुरळांचे काय? ते तर विचारूच नका. याचअनुषंगाने आंदोलनाच्या नावाने चाललेल्या काहीच्या काहीच प्रकरणांचा या मागोवा घेणारा हा लेख....
 
काहीही म्हणा, झुरळांची तर बातच न्यारी आणि या न्यार्‍या दुनियेत काँग्रेसचा हातही सामील. "आधीच मर्कट, त्यात मद्य प्याला आणि त्याला विंचूदंश झाला” असचे सध्या झुरळांचे आणि त्यांच्या समर्थकांचे झाले आहे. काहीवेळा घटनाच अशा घडतात की, आतले गुण उधळून बाहेर येतात. त्यानुसार, राहुल गांधी आणि प्रियांका गांधींचेही अंगभूत गुण अगदी उतू चालले आहेत. मूर्खपणा तरी किती असावा? समाज माध्यमांवर एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्यात बेकायदेशीर आंदोलन करणार्‍यांना पोलीस उचलून नेत होते. बाजूला राहुल गांधी उभे आहेत, म्हणून त्यालाही ‘नेतागिरी’ करण्याचा चेव आला. गाढव जसे हातपाय झाडते, तसे हातपाय झाडत तो पोलिसांना प्रतिकार करू लागला. पण पोलीसच ते, त्यांनी पकड अजून मजबूत केली. आता या असल्या प्रसंगात अगदी नायावरचा नेता जरी असता आणि त्याच्या चेल्याला कुणी उचलून नेत असते, तर त्याने काय केले असते?
 
त्याने पोलिसांना थांबवले असते, त्यांना विनंती केली असती, कसेही करून पोलिसांना थांबवले असते. इथे काँग्रेसचे सर्वेसर्वा राहुल गांधी उपस्थित होते. त्यांनी काय केले, तर पोलिसांना थांबवण्याच्या भानगडीत ते अजिबातच पडले नाहीत. ते हातपाय झाडणार्‍या अनुयायालाच खेचू लागले. खेचाखेची झाल्यावर राहुल यांच्या लक्षात आले की, त्याला पोलिसांच्या तावडीतून सोडवू शकत नाहीत. तेव्हा या पंतप्रधान होण्याचे स्वप्न बघणार्‍या राहुल यांनी काय केले? पोलिसांनी पकडलेल्या अनुयायाच्या पोटावरच ते सरळ बसले! शक्यतेच्या पलीकडचे हे अत्यंत अशक्य वागणे. तो अनुयायी आधीच अवघडलेला, त्यात यांनी त्याच्या पोटावर बसकन मारली. हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. हे सगळे काय सुरू आहे?
 
यांचे असे, तर या आंदोलनात आलेल्या अन्य लोकांचे चाळे काय वर्णावे? एक तरुणी अत्यंत किळसवाण्या पद्धतीने, पोलिसावर विनयभंगाचा आरोप करताना दिसते. मात्र, तिच्या आजूबाजूला सगळ्याच महिला पोलीस आहेत. समाज माध्यमांवर प्रसिद्ध व्हावे म्हणून ती हे म्हणताना स्पष्ट दिसते. दुसर्‍या दिवशी हीच तरुणी खाली जमिनीवर पडलेली आहे. ही तरुणी खाली पडून स्वतःची पॅन्ट वर खेचत आहे आणि ओरडते, "बघा बघा, माझी पॅन्ट काढायला घेतली आहे.” हे का, तर ही ‘रील्स’ बनवून फेमस व्हावे यासाठी! समाज माध्यमांवर आपली ‘रील्स’ जास्तीत जास्त लोकांनी पाहून आपल्याला ‘लाईक’ करावे, ‘शेअर’ करावे यासाठीच! समाज माध्यमाने जगभरात सत्तांतरे घडवली, हे माहिती होते. मात्र, समाज माध्यमामुळे अनेकांची चरित्रे आणि विकृतताही बाहेर पडली, हे झुरळ मोर्चात पाहिले.
 
याच अनुषंगाने एका युवकाचा व्हिडिओही व्हायरल होत आहे. हा तरुण हसत-हसत म्हणतो, "मेरे साथ ज्यादती हुई, महिला पुलीसने मेरे प्रायव्हेट पार्ट को पकडा|” पण, सत्य काय आहे? बरे, हा तरुण कसा आहे; तर दात पडलेला, काठीसारख्या अंगकाठीचा आणि पाहताक्षणीच ज्याला पाहून त्याच्या दुबळेपणाची कीव येईल असा. त्याला स्पष्ट बोलताही येत नाही. तो ज्याला-त्याला हेच सांगत होता. पण, शेवटी जेव्हा पुरावा द्यायची वेळ आली, तेव्हा हाच तरुण सरळ माफी मागून म्हणाला की, "नाही नाही माझा गैरसमज झाला, असे काही झाले नाही.” हे सगळे सांगण्याचे कारण काय? तर या झुरळांच्या आंदोलनात कायद्याच्या रक्षकांना, जाणूनबुजून खलनायक सिद्ध करण्याचे कटकारस्थान रचले गेल्याचे दिसते. पुरुष पोलिसांवर आरोप करणारी ती मुलगी आणि महिला पोलिसांवर आरोप करणारा हा मुलगा, दोघेही पाहताक्षणीच जाणवते की, त्यांना या आंदोलनाशी काहीच देणेघेणे नाही. चला मजा करूया आणि ‘रील्स’ बनवून प्रसिद्ध होऊया, यासाठीच ते आंदोलनात आलेले आहेत.
 
खरेतर उठसूट झुरळांवर लिहायचाही आता कंटाळा आला. पण, आंदोलनाच्या नावावर काय चालले आहे, हे लिहायलाच हवे. देशभरात धूमकेतूसारखी आंदोलने उभी राहिली आहेत. मात्र, त्यांचे नेतृत्व डाव्या विचारांचे आणि विरोधी पक्षांचे लोकच करतात, हे उघड गुपित. जनतेची साथ काहे त्यांना मिळत नाही, त्यामुळे जनतेचा सहभाग कसा होईल, याची तरतूद करण्याचा प्रयत्नही केला. विविध जातीतल्या सामान्य दिसणार्‍या आणि आपल्या हातचे बाहुले होणार्‍या तरुणांना पुढे केले. या तरुणांना कधीच प्रसिद्धी किंवा व्यासपीठ मिळालेले नाही. त्यामुळे आंदोलनाच्या नावाने मिळालेल्या व्यासपीठाचा ते पुरेपूर वापर करून घेत आहेत. मोदी, शाह, फडणवीस, हिंदू, भारत सरकार, प्रशासन, व्यवस्था यांना शिवीगाळ केली की, आपली ‘इकोसिस्टम’ खूश होते. ते अजून आपली जोमात प्रसिद्धी करतात, आपल्याला हवे-नको ते पुरवतात, हे या सामान्य दिसणार्‍या आणि सुमार कुवतीच्या बाहुल्यांना चांगलेच कळते.
 
दुसरीकडे शून्य कर्तृत्ववान असलेले लोक जर इतके फेमस होतात, मोठमोठे राजकारणी त्यांची इच्छा पूर्ण करायला पुढे येतात, तर हा चांगला धंदा आहे म्हणत रिकामटेकडे तरुण-तरुणीही या आंदोलनात सामील होत आहेत. लोकांचे आपल्याकडे लक्ष जावे म्हणून, बीभत्स आणि विकृत वर्तन करत आहेत. याला अपवादही आहेत; पण त्यांची संख्या नगण्यच.ओवाळून टाकलेले आणि अगदी ज्यांच्या आई-बाबांनीही त्यांच्यापुढे हात टेकले, असेच लोक या आंदोलनात आलेले दिसतात. कपड्यावरून चरित्र मोजता येत नाही. मात्र, मुद्दाम उद्दाम कपडे घालून कामूकतेचे वर्तन करणारे हे लोक आहेत. यांना वाटते की, असे केले म्हणजे त्यांचे अतिपुरोगामीपण सिद्ध होईल. यांना आवरण्याचा प्रश्नच नाही. कारण, ज्यांनी कुणी यांना इथे आणले, त्यांनी या लोकांना आमिषे दिली आहेत. हवा तो नंगानाच करा, फुकटचे खा-प्या, ‘फ्री-सेस’चीही संधी मिळेल, असेच वातावरण.
 
या आंदोलनात काँग्रेससह विरोधी पक्ष सहभागी झाला. राजकारणी पक्षांना हे असे युवा हवे आहेत? आपल्या महाराष्ट्रातही असेच, पुण्यात ‘एमपीएससी’च्या नावावर आंदोलन सुरू आहे. मुद्दा भ्रष्टाचारविरोधातला आहे, तर पोलीस प्रशासन, न्यायालय आहे. या आंदोलनाचा आतला गाभाही झुरळ पार्टीलाच समांतर. आंदोलन, मोर्चे, उपोषण करून जनतेला आणि सरकारला जेरीस आणायचे, मग लोक सत्ताधार्‍यांच्या विरोधात जातील आणि आपण अलगद सत्तेत जाऊ; या प्रयत्नात असलेले हे लोक. यांच्या आंदोलनाचे हिडीस आणि बीभत्स स्वरूप, त्यामध्ये सहभागी होणारे एकापेक्षा एक सरस नमुने, हे सगळे पाहून भलेही या आंदोलकांच्या काही मागण्या रास्त असल्या, तरीसुद्धा समाजाची सज्जनशक्ती या आंदोलनापासून दूरच आहे. असो!
 
राहुल गांधी आणि महाराष्ट्रातीलही काही नेतेमंडळी, देशाचे मनोरंजन करण्यात आघाडीवर होती. पण, आता झुरळ आंदोलन आणि त्याला पूरक असलेली इतर आंदोलनांमुळे कधी नव्हे ते भयंकर, अतिभयंकर मनोरंजन होत आहे. सज्जनशक्ती गप्प आहे म्हणून यांचे नाटक सुरू आहे. आता या फुकटच्या विकृत मनोरंजनाला आवरायलाच हवे. कारण, ‘म्हातारी मेल्याचे दुःख नाही, काळ सोकावत आहे!’
 
हे सगळे का चालले आहे?
 
जे दिसते, तेच सत्य मानायची आजकालची परिस्थिती आहे. त्यामुळे ‘जेन-झी’, ‘जेन-झी’ म्हणत काही विकृत लोक रस्त्यावर उतरतात, तेव्हा अख्ख्या भारतातील युवा असाच असल्याचा गैरसमज, जगभरात पोहोचवण्याचे षड्यंत्र रचले जात आहे का? कारण, २१व्या शतकात जगभरात वृद्धांची संख्या जास्त असताना, भारतातच सर्वांत जास्त युवाशक्ती आहे. भारतातील बहुसंख्य युवक-युवती भारतीय संस्कृतीने संस्कारित आहेत. त्यामुळे या देशाचे भवितव्य उज्ज्वल आहे, हे नक्की. अशा वेळी भारतात युवक जास्त असले तर काय झाले? ते बेकार, कुचकामी आणि विकृत आहेत; ते अतिशय घृणास्पद असून कर्तृत्वशून्य आहेत; असे तरुण भारताकडे असल्याने भारतात काहीच चांगले होऊ शकणार नाही, भारताचे भविष्य अंधारमय आहे, असे जगाच्या पटलावर दाखवून भारताची प्रतिमा मलिन करण्यासाठीच, हे झुरळ आणि त्यासारखीच असलेली ही आंदोलने नाहीत ना?
 
९५९४९६९६३८




योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
संबंधित मजकूर