देवाभाऊंच्या पुढाकारातून साकारलेल्या ‘वारी’चा जागतिक गौरव!

‘इन द फूटस्टेप्स ऑफ द सेंट्स’ माहितीपट भारताचा राष्ट्रीय विजेता

 
 
Pandharpur Wari Documentary
 
मुंबई (Pandharpur Wari Documentary): महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा आणि वारकरी संप्रदायाच्या समतेच्या विचारांचा जागतिक पटलावर गौरव झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून साकारलेल्या ‘पंढरपूर वारी - इन द फूटस्टेप्स ऑफ द सेंट्स’ या माहितीपटाने प्रतिष्ठित ‘एशियन अकॅडमी क्रिएटिव्ह अवॉर्ड्स २०२६’मध्ये ‘सर्वोत्कृष्ट ब्रँडेड कार्यक्रम’ या श्रेणीत भारताचा राष्ट्रीय विजेता होण्याचा बहुमान मिळवला आहे. माहिती व जनसंपर्क विभाग आणि वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी यांच्या संयुक्त निर्मितीतून साकारलेल्या या माहितीपटाच्या माध्यमातून महाराष्ट्राची समृद्ध भक्तिपरंपरा आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांपर्यंत पोहोचली आहे. (Pandharpur Wari Documentary)
 
पंढरपूरची वारी ही केवळ धार्मिक यात्रा नसून भक्ती, समता, बंधुभाव आणि सामाजिक एकतेचा संदेश देणारी शेकडो वर्षांची परंपरा आहे. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या या वारीचे वैशिष्ट्य जागतिक स्तरावर अधोरेखित करण्याच्या उद्देशाने २२ मिनिटांचा इंग्रजी भाषेतील माहितीपट तयार करण्यात आला. डिस्कव्हरीच्या जगभरातील विविध वाहिन्यांवरून त्याचे प्रसारण करण्यात आले. त्यामुळे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाला जागतिक व्यासपीठ मिळाले आहे. (Pandharpur Wari Documentary)
 
वारीचा संदेश जगभर पोहोचला!
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या यशाबद्दल माहिती व जनसंपर्क विभाग आणि वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी यांचे अभिनंदन केले. पंढरपूरची वारी ही जात, धर्म आणि आर्थिक स्तराचे भेद बाजूला ठेवून सर्वांना विठ्ठलभक्तीच्या धाग्यात बांधणारी प्राचीन परंपरा असल्याचे त्यांनी नमूद केले. वारीचे उद्दिष्ट, तिच्यामागील विचार आणि संतांनी दिलेला मानवतेचा संदेश जगभर पोहोचवण्यासाठी या माहितीपटाची निर्मिती करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. वारीची गौरवशाली परंपरा जगासमोर मांडणारा हा माहितीपट सर्वांनी पाहावा, असे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. (Pandharpur Wari Documentary)
 
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाची जागतिक दखल
 
माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव आणि महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी सांगितले की, आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील विविध देशांमधून सादर झालेल्या दर्जेदार निर्मितींमध्ये या माहितीपटाची भारताचा राष्ट्रीय विजेता म्हणून निवड झाली. या बहुमानामुळे महाराष्ट्राची भक्तिपरंपरा, संतसाहित्य, सामाजिक समतेचा विचार आणि वारीची वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाली आहे. (Pandharpur Wari Documentary)





गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर