एताः दशमहाविद्याः प्रकीर्तिताः| (भाग-१)

    11-Oct-2026






Navratri 
 
आज घटस्थापना. नवरात्रीचा हा काळ म्हणजे आदिशक्तीच्या उपासनेने भारलेला काळ. या काळात भारतातील विविध प्रांतांत देवीच्या अनेकविध रूपात ती आदिशक्ती भक्तिभावाने पूजली जाते. देवीची लक्ष्मी, पार्वती, सरस्वती, दुर्गा, महिषासुरमर्दिनी इत्यादी रूपे ही सर्वपरिचित असली, तरी शक्तितत्त्वाचा वैशिष्ट्यपूर्ण अविष्कार असलेल्या ‘दशमहाविद्या’ सर्वसामान्यपणे अनभिज्ञ राहतात. या नवरात्रीच्या निमित्ताने त्यांचे स्वरूप थोडक्यात उलगडणारीही ३ भागांची विशेष लेखमाला...
 

देवी महाभागवता’च्या सुरुवातीलाच असलेल्या गायत्रीमंत्रात त्या सर्वचैतन्यरूप तत्त्वाचा ‘आद्याविद्या’ म्हणून उल्लेख येतो-
 

ॐ सर्वचैतन्यरूपां तां| आद्यां विद्यां च धीमहि| बुद्धिं या नः प्रचोदयात्॥
 

‘मार्कंडेय’ पुराणात सगळ्या प्रकारच्या विद्या म्हणजे देवीची भिन्न रूपेच होत, असे म्हटले आहे- ‘विद्या समस्ता तव देवि भेदाः|’ पौराणिक आणि तांत्रिक अशा दोन्ही ग्रंथांमध्ये महाविद्या, त्यांचा अविष्कार, त्यांचा पराक्रम वर्णिला असून, तंत्रग्रंथांमध्ये मात्र त्यांच्या स्वरूपाचे रहस्य, त्यामागील तत्त्वज्ञान, उपासना याचेदेखील सखोल चिंतन आढळते.
 

परब्रह्म हे चैतन्यरूप असून, सर्व उत्पत्तीचे अंतिम कारण असले, तरी ते ‘अकर्ता’देखील असल्याने प्रत्यक्षात निर्मिती त्याच्या ठायी अभिन्नत्वाने असलेली सुप्त क्रियाशक्ती कार्यान्वित झाली की मग घडते. परब्रह्माशी अद्वैत असल्याने तीही स्वतः चैतन्यरूप असून, जड प्रकृतीचेदेखील तीच रूप घेते. ‘ललितासहस्रनाम स्तोत्रा’मध्ये ‘चित्शक्तिः चेतनारूपा जडशक्तिः जडात्मिका’ असे स्पष्टपणे म्हटलेच आहे. ‘महाविद्या’ म्हणजेच माया, त्रिगुणात्मिका शक्ती, सांख्ययोगातील प्रकृती, वेदांत्यांची विद्या आणि अविद्या होय, महामाया होय, असे ‘गांधर्व तंत्र’ (३७.३६-३७) म्हणते. प्रकृतीशी एकरूप असलेल ‘पुरुष’ हे चैतन्य आपल्या शक्तीच्या योगे निर्मिती प्रक्रियेतील स्तरांनुसार, दहा रूपांत प्रकट होते. या दहा प्रकारच्या शक्तीच ‘दशमहाविद्या’ होत, असे हे तत्त्वज्ञान सांगते आणि म्हणूनच, या शक्तिरूप दशमहाविद्यांच्या बरोबरीने शिवाच्या त्या-त्या विशिष्ट भैरवरूपाचीदेखील उपासना केली जाते-
 
शक्तयः सदा सेव्या भैरवेण समन्विता|
(-रुद्रयामल तन्त्र)
 

निर्मितीसाठी त्रिगुणात्मिका प्रकृतीचे रूप घेणार्‍या या ‘दशमहाविद्या’ मूलतः गुणातीत असून, हीच त्या पराप्रकृतीची ‘साम्यावस्था’ किंवा ‘लय अवस्था’ होय. आणि ‘लय अवस्था’ ही तमोरूप मानलेली असल्याने ती ‘रात्र’ या स्वरूपात त्या-त्या महाविद्येशी तत्त्वतः संलग्न आहे. उदा. ‘काली’ ही महाविद्या महारात्रीशी संबंधित असून, ‘तारा’ ही क्रोध-रात्रीशी संलग्न आहे. त्यामुळेच स्तोत्रांमधून या महाविद्यांना अनेकवेळा त्या-त्या रात्रीच्या स्वरूपातदेखील उल्लेखिले जाते.
 

विद्याविषयक इतर अनेक सिद्धान्तांपैकी अजून एक म्हणजे, देवनागरी लिपीतील सर्व ५१ वर्ण किंवा मातृका या विद्यास्वरूप आहेत (शक्तिसंगम तंत्र, १.५६-८२). देवीची त्रिगुणात्मिका कुंडलिनी शक्ती स्वेच्छेने ५१ वेळा त्या-त्या पटीत गुणित होऊन या ५१ ‘विद्या’ निर्माण झालेल्या आहेत. ज्यावेळी त्या अजून काही पटीने गुणित होतात, तेव्हा त्या ‘दशमहाविद्या’ म्हणून ओळखल्या जातात.
 

महाविद्यांच्या नावांच्या, संख्येच्या बाबतीत मतांतरे असली; तरी सर्वसामान्यपणे ‘काली’, ‘तारा’, ‘षोडशी’ (श्रीविद्या अथवा त्रिपुरसुंदरी), ‘भैरवी’, ‘भुवनेश्वरी’, ‘धूमावती’, ‘बगला’ अथवा ‘बगलामुखी’, ‘छिन्नमस्ता’, ‘मातंगी’ आणि ‘कमला’ या नावांबद्दल ग्रंथांमध्ये एकमत असलेले आढळते.
 
या ‘दशमहाविद्यां’चे स्वरूप आणि त्यांच्या साधनेचा मार्ग यानुसार त्यांचे वर्गीकरण तीन प्रकारे करण्यात येते. १) सौम्य- षोडशी, भुवनेश्वरी, मातंगी आणि कमला. २) उग्र- काली, धूमावती, बगला आणि छिन्नमस्ता. ३) सौम्योग्रा- सौम्य आणि उग्र अशा दोन्ही गुणांनी युक्त अशा तारा आणि भैरवी. याखेरीज ‘विद्या’, ‘महाविद्या’ आणि ‘सिद्धविद्या’ अशाप्रकारेदेखील वर्गीकरण केले जाते.
 

‘मुण्डमाला’ तंत्रानुसार साधकांच्या हितार्थ, शक्ती-उपासकांवर अनुग्रह करण्यासाठी ते गुणातीत परब्रह्मच महाविद्यांच्या रूपाने सगुण रूप धारण करते-
 

गुणातीतं परं ब्रह्म निरीहं वर्णवर्जितम्|
तदेव परमा विद्या काल्यादि-सगुणात्मिका॥
साधकस्य हितार्थाय शाक्तस्यानुग्रहाय च|
उत्थिता परमा विद्या सगुणा नात्र संशयः॥
 

‘देवी महाभागवता’तील (८.५७-९०) दशमहाविद्यांचा अविष्कार प्रसंग अतिशय नाट्यमय असून, त्यातून शिवपत्नी सतीचे अलौकिक सामर्थ्य लक्षात येते. माहेरी यज्ञासाठी जाण्यास विरोध करणार्‍या, तिला अज्ञ, दुर्बल समजणार्‍या पतीला स्वतःचे संपूर्ण सामर्थ्य दाखवताना या दहा रूपांतून ती प्रकटली. त्याद्वारे तिच्या ‘स्वरूपा’चे ज्ञान शिवाला झाले. इतकेच नाही, तर दक्षाने केलेल्या शिवाच्या अपमानाबद्दल दक्षाला धडा शिकविण्याचा आणि त्याने आरंभलेल्या यज्ञाचा नाश करण्याचा आपला हेतूदेखील तिने स्पष्ट केला. अशा रीतीने इथेच या रूपांमध्ये दडलेला ‘विद्या’ हा पैलू स्पष्ट होतो. शिवाय, ‘दुर्मतीचा विनाश’ हे त्यांच्या आविर्भावाचे प्रयोजनदेखील स्पष्ट होते. ‘शिवपुराणा’तील (५.५०) वर्णनानुसार, ‘रुरुपुत्र दुर्गम’ या राक्षसाला मारण्यासाठी देवांच्या विनंतीवरून पार्वतीने त्याच्याशी झालेल्या युद्धात विविध आयुधे धारण केलेल्या महाविद्यांची ही सुंदर रूपे घेतली, पराक्रम केला आणि त्याला ठार मारले-
 

एतस्मिन्नंतरे तस्याः शरीराद्रम्यमूर्त्तयः॥
काली तारा च्छिन्नमस्ता
श्रीविद्या भुवनेश्वरी ॥२८॥
भैरवी बगला धूम्रा श्रीमत्त्रिपुरससुंदरी|
मातंगी च महाविद्या निर्गता दश सायुधाः॥२९॥
 

‘देवी भागवता’त (८.७२-७३) देवीने स्वतःच सांगितल्याप्रमाणे या महाविद्या धर्म, अर्थ, काम, मोक्ष देणार्‍या; तसेच मारण, उच्चाटन इत्यादी सिद्धी प्रदान करणार्‍या आहेत.
 

काली : या सर्वांमध्ये ‘काली’ ही सर्वसामान्यपणे ‘आद्या’ महाविद्या मानलेली असून, शक्तितत्त्वाचा हा एक अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आणि विस्मयकारक असा अविष्कार आहे.
 

‘शक्तिसंगम’ तंत्रात (२.५८.६१-६२) शिव म्हणतो की, ‘दक्षिणकाली’ म्हणजे त्याचेच ‘प्रकृति’रूप असून, केवळ तीच आद्यविद्या होय. इतर विद्या ‘विकृती’ (तिच्यापासून उद्भवलेल्या) आहेत. काही ग्रंथांमध्ये कालीचा अविष्कार गौरी अथवा पार्वतीच्या देहातून झाल्याचे दिसते, तर काही ठिकाणी मात्र ती विष्णूच्या योगनिद्रेची अथवा योगमायेची शक्ती म्हणून वर्णिली आहे. ‘मार्कंडेय’ पुराणातील देवीमाहात्म्यात आलेल्या वर्णनानुसार, चंड-मुंड राक्षसांशी झालेल्या युद्धात अत्यंत क्रोधाने जिच्या भुवया वक्र झालेल्या आहेत, अशा त्या अंबिकास्वरूप योगमायेच्या कपाळातून ‘काली’ उद्भवली आणि तिने त्या युद्धात देवीला साहाय्य केले-
 

भृकुटीकुटिलात् तस्या ललाटफलकात् द्रुतम्|
काली करालवदना विनिष्क्रान्तासि पाशिनि॥
 

‘लिंग’ पुराणानुसार (१.१०६.१३-१४) दारुक राक्षसाचा नाश स्त्रीद्वारेच होणार, हे विधिलिखित असल्यामुळे पार्वती स्वतःच शिवाच्या देहात प्रविष्ट झाली आणि तिने त्याच्या गळ्यातील विषापासून आपला देह धारण केला. मग शिवाने आपल्या तृतीय नेत्रातून ही ‘कालकंठी काली’ बाहेर काढली आणि तिच्याकरवी दारुकाचा विनाश केला.
 

‘काली’ हे नाव आणि तिचा काळा वर्ण यांचे स्पष्टीकरण ‘महानिर्वाण’ तंत्रानुसार असे आहे : महाकाल, जो या महाविद्येशी संबंधित भैरव आहे, त्याच्यात प्रलयकाळी सर्व काही विलय पावते. पण, ‘काली’ त्याचेही ‘कलन’ करते. (कलन - गिळण्याची, ताब्यात घेण्याची, नियंत्रित करण्याची क्रिया). प्रत्यक्षात महाकालाला गिळणारी, नियंत्रित करणारी म्हणून ती ‘काली’ आणि असा हा लय अथवा प्रकृतीची साम्यावस्था ‘तमो’रूप मानल्यामुळे तिचे स्वरूप ‘कृष्णवर्णी’ आहे, तर अशा या कालीचे ध्यान ‘काली’ तंत्रात असे आढळते-

शवारुढां महाभीमां घोरदन्ष्ट्रां हसन्मुखीम्|
चतुर्भुजां खड्गमुण्डवराभयकरां शिवाम्॥
मुण्डमालाधरां देवीं ललजिव्हां दिगम्बराम्|
एवं संचिन्तयेत्कालीं स्मशानालयवासिनीम्॥
 

‘शाक्त सिद्धान्ता’नुसार शक्तीने युक्त ते ते ‘शिव’, शक्तिरहित ते ते निव्वळ ‘शव’ होय. ‘काली’ लयकारिणी आहेच आणि लय अवस्थेत सर्व प्राणिमात्र आता शक्तिविहीन ‘शव’ अवस्थेत, तिच्या नियंत्रणात असतात. म्हणून ती ‘शवारूढ’ आहे, ‘श्मशाननिवासिनी’ आहे. तिचे भयंकर असे रूप, कराल दात, लवलवणारी जीभ या सर्व गोष्टी तिच्या या लय घडवून आणण्याच्या हेतूच्या, संहारक पैलूच्या निदर्शक आहेत. एका हातातील तलवार त्या संहाराचे साधन असून, दुसर्‍या हातात धरलेले मुंडके तिने केलेल्या या कार्याचा प्रत्यक्ष परिणाम आहे. पण, याचबरोबर ती ‘शिवा’ म्हणजे, ‘सर्वांचे कल्याण करणारी’देखील असल्याने बाकी दोन हातांनी ती वर आणि अभय देत असलेली, हसतमुख दर्शविली आहे. गळ्यातील ‘मुण्डमाला’ तिने संहाराच्या वेळी सर्व प्राणिमात्रांना स्वतःच्या ठायी दिलेला आश्रय, दिलेला मोक्ष दर्शविणारी आहे. उत्पत्तीसमयी कालरूपाने संपूर्ण विश्व व्यापून उरणारी असल्याने ‘दिशा’ हेच तिचे वस्त्र ठरते.
 

‘उमासहस्रनाम संहिते’त (१४.४-५) दिशा आणि काळाचे विभाजन केवळ कालीच्या सामर्थ्यामुळे, कार्यामुळेच घडून येते आणि त्यातूनच सर्व काही परिणाम पावते असे म्हटलेले आहे.
 

तंत्रग्रंथांमध्ये महाविद्यांचा विष्णूच्या दशावतारांशी संबंध जोडलेला आहे. ‘मेरु’ तंत्रात उद्धृत केल्याप्रमाणे काली आणि कृष्ण यांच्यात अद्वैत आहे-
 

या काली सैव कृष्णः स्याद्यः कृष्णः सैव कालिका॥
 
भारतात ठिकठिकाणी ही ‘काली’ ‘दक्षिणकाली’ किंवा ‘दक्षिणाकाली’, ‘भद्रकाली’, ‘सिद्धकाली’, ‘गुह्यकाली’, ‘रक्षकाली’, ‘महाकाली’, ‘चंडकालिका’, इत्यादी नावांनी ओळखली जाते.
 

तंत्रात कालीची उपासना ‘दक्षिण’ (वेदसंमत) आणि ‘वाम’ (‘पंचमकार’युक्त - मत्स्य, मद्य, मांस, मुद्रा आणि मैथुन) अशा दोन्ही पद्धतीने सांगितलेली आहे.


रंजना नायगावकर
(क्रमशः)(भाग-२ पुढील रविवारच्या अंकात)
९९६९७८९४३२




संबंधित मजकूर