आज नवरात्रोत्सवाचा पहिला दिवस! नवरात्रीतील नऊ देवी ‘नवदुर्गा’ म्हणून ओळखल्या जातात. देवीच्या या नऊ स्वरूपांची या दिवसात पूजा करतात. यातील पहिली देवी म्हणजे ‘शैलपुत्री’! पर्वतराज हिमालयाची कन्या म्हणून तिने जन्म घेतला. पूर्वजन्मी ती सती होती. भगवान शिवांशी विवाह करण्यासाठी आणि भक्त कल्याणासाठी तिचे हे रूप आहे. देवीचे दुसरे रूप म्हणजे ‘ब्रह्मचारिणी’.
भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी देवीने तपोसाधना करून ध्येय साध्य केले. तिसरी देवी म्हणजेच ‘चंद्रघंटा’. या देवीच्या मस्तकावरचा अर्धा चंद्र घंटेसारखा दिसतो. देवीचे हे रूप शौर्य आणि शक्तीचे प्रतीक आहे. चौथी देवी ‘कुष्मांडा’. या देवीच्या दिव्य हास्यानेच विश्व निर्माण झाले. म्हणूनच, तिला सृष्टीची आदिशक्तीही मानतात. देवीचे पाचवे रूप म्हणजे ‘स्कंदमाता’. भगवान कार्तिकेय अर्थात, स्कंद यांची ही माता. आपल्या भक्तांचेही देवी मुलाप्रमाणेच रक्षण करते. देवीचे सहावे रूप म्हणजे ‘कात्यायनी’! महिषासुराचे निर्दालन करण्यासाठी देवी कात्यायन ऋषींच्या तपश्चर्येतून प्रगट झाली. सातवी देवी म्हणजे ‘कालरात्री’. 'देवीचे हे रूप अत्यंत उग्र असून, असुर आणि दुष्टांच्या विनाशासाठीच देवीने हे रूप धारण केले. तिचे दर्शन शुभकारी असल्याने तिला ‘शुभंकरी’ही म्हणतात. आठवी देवी म्हणजे ‘महागौरी’. कठोर तपोसाधनेमुळे या देवीचे शरीर काळवंडले होते. भगवान शिवांच्या कृपेने तिला गौरवर्ण प्राप्त झाला. नववी देवी म्हणजे ‘सिद्धिदात्री’. ही देवी भक्तांना विविध सिद्धी आणि आध्यात्मिक ज्ञान देते. भगवान शिवांनीही तिची उपासना केल्यानेच अर्धनारेश्वराचे स्वरूप प्राप्त झाले. नवदुर्गांच्या कथेकडे स्त्रीच्या अंतर्गत शक्तीचा प्रवास म्हणूनही पाहता येते. स्थैर्य, तपस्या, धैर्य, सृजनशक्ती, मातृत्व, संघर्ष, भीतीवर विजय, शुद्धता, आत्मज्ञान हे गुण देवीप्रमाणेच स्त्रीकडेही असतात. स्त्रीमध्ये प्रेम, माया आणि मातृत्वाबरोबरच निर्णयक्षमता, धैर्य, संघर्षाची शक्ती आहे.
नवरात्रोत्सवात आपण देवीची पूजा करतो. पण, देवीचे गुण वागण्यात, बोलण्यात आणि नातेसंबंधात उतरवल्यास तीच खरी उपासना ठरेल. ‘शैलपुत्री’ ही देवी स्थिरतेचे प्रतीक. हे जीवनामध्ये कसे आणावे? तर, संकटातही न घाबरता शांतपणे विचार करणे, स्वत:च्या मूल्यांशी प्रामाणिक राहाणे, विचारपूर्वक घेतलेला निर्णय पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे, मतभेद झाल्यास त्यावर लगेच प्रतिक्रिया न देता, शांतपणे परिस्थिती हाताळणे. तिच्याकडून स्वत:साठी वेळ राखून ठेवण्याबाबतही शिकता येते. राग, हट्ट, उतावळेपणावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करणे, नात्यात संवादासाठी प्रयत्न करणे हे ‘ब्रह्मचारिणी’ आपल्याला शिकवते. ‘चंद्रघंटे’चे विशेष म्हणजे धैर्य आणि सजगता. संकटांचा सामना शौर्याने करण्याचे ती प्रतीक. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे, भीतीमुळे योग्य बोलण्याचे टाळणे, स्वत:च्या आणि इतरांच्या सन्मानाचे रक्षण करणे, हे आपल्याला ही देवी शिकवते. ‘कुष्मांडा’कडून सर्जनशीलता आणि सकारात्मकता आपण शिकू शकतो. स्वत:च्या कृतीत आनंद शोधणे, समस्यांमध्ये न अडकता पर्याय शोधणे, घरात उत्साही वातावरण ठेवणे, स्वत:च्या कलागुणांना वाव देणे, हे आत्मसात करण्यासाठी ‘कुष्मांडा उपासना’ महत्त्वाची.
]
‘स्कंदमाते’वर प्रेम, वात्सल्याची जबाबदारी. प्रेमाबरोबरच योग्य संस्कार आणि संगोपनाचेही ही देवी प्रतीक आहे. कुटुंबातील प्रत्येकाचे बोलणे ऐकून घेणे, योग्य आणि अयोग्याची जाणीव करून देणे, ज्या माता मुलांचे अतिलाड करतात, योग्य आणि अयोग्याची जाणीव करून देत नाहीत, असे न होऊ देणे, तसेच इतरांची काळजी घेताना, स्वत:च्या गरजांकडे बघणेही या देवीकडून शिकता येते. ‘कात्यायनी’कडून आपल्याला स्वाभिमानाबरोबरच, अन्यायाविरुद्ध लढण्याची शक्ती मिळते. स्वत:च्या क्षमतेवर विश्वास ठेवणे, नम्र; पण ठामपणे नकार देणे, नात्यांवर प्रेम करताना स्वत:च्या मर्यादा निश्चित करणे, हे गुण ‘कात्यायनी’ आपल्याला शिकवते.
‘कालरात्री’ देवी भीतीवर मात आणि परिवर्तन यासाठी ओळखली जाते. स्वत:तील अंधार ओळखून त्यावर काम करणे, स्वत:तील दोष शोधून ते कमी करण्यासाठी प्रयत्न करणे; तसेच मत्सर, द्वेष, नकारात्मक विचार ओळखणेच; बदलाची भीती न बाळगता आवश्यक ते निर्णय घेणे, हे या देवीकडून आपल्याला शिकता येते. ‘महागौरी’कडून निर्मलता, क्षमा आणि शांतीचा प्रत्यय आपण शिकतो. मनात जुना राग न साठवणे, संवादकौशल्य, स्वत:ला आणि इतरांना सुधारण्याची संधी देण्याचे ज्ञान आपल्याला ‘महागौरी’ देते. ‘सिद्धिदात्री’ची शक्ती म्हणजे आत्मज्ञान आणि परिपूर्णतेकडे वाटचाल करणे. स्वत:ची ओळख आणि इतरांना सक्षम करणे, हेच या देवीच्या शक्तीचे प्रतीक आयुष्यभर शिकत राहाणे, मर्यादा ओळखणे, आपले ज्ञान आणि अनुभव इतरांना उपयोगी येतील याची काळजी घेणे, हे या देवीकडून आत्मसात करू शकतो. यासाठी नित्य सराव आवश्यक आहे. यासाठी एकावेळी एक गुण निवडून, त्याचाच सराव करावा. यासाठी एखादा गुण आचरणाचा सकाळी संकल्प करावा, दिवसभर त्याच्या कृतीचे नियोजन आणि रात्री आत्मपरीक्षण करून देवींच्या या शक्तीद्वारे आपले आयुष्य अधिकाधिक आनंदी करू शकतो. देवीचा एखादा गुण आपल्यात साठवणे, हीच तिच्या उपासनेची सुंदर पद्धत आहे.
डॉ. गौरी कानिटकर
(लेखिका ‘अनुरूप’ विवाह संस्थेच्या कार्यकारी संचालक असून, ‘मॅरेज इन्रिचमेंट कौंसिलर आहेत.)