संकल्प, सेवा आणि सिद्धी; रौप्यमहोत्सवी कारकिर्दीचे नरेंद्र मोदी!

    11-Oct-2026
 
 
Narendra Modi political journey
 
संपुआच्या दशकभराच्या सत्तेनंतर अडखळणार्‍या भारताला, स्वसामर्थ्याची प्रचिती घडवून देणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रशासकीय कारकीर्दीचे रौप्यमोहत्सवी वर्ष साजरे होत आहे. काँग्रेसने केलेल्या भ्रष्टाचाराच्या चिखलात गेली २५वर्षे विकासाच्या माध्यमातून, जनसामान्यांच्या आयुष्यात आनंदाचे ’कमळ’ फुलवणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकीर्दीचा आढावा घेणारा हा लेख...
 
आधी संकल्प केला, मग त्या अनुषंगाने सेवा केली की, आपणास सिद्धी प्राप्त होते. याच पद्धतीने नरेंद्र दामोदरदास मोदी यांनी दि. ७ ऑटोबर २००१ पासून कार्यरत राहत, आपल्या राजकीय (केंद्र आणि राज्यात संविधानिक अशा पहिल्या क्रमांकाच्या पदावर) कारकिर्दीचे रौप्यमहोत्सवी वर्ष पूर्ण केले. त्या निमित्ताने देशभरात भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्षांनी ‘सेवा संकल्प’ अभियान सुरू केले आहे.
 
दि. १७ सप्टेंबर १९५० रोजी गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील वडनगर येथे सर्वसाधारण कुटुंबात जन्मलेले नरेंद्र दामोदरदास मोदी, ‘अध्यात्ममार्गी’ म्हणूनच ओळखण्यात येतात. सर्वसंगपरित्याग करून संन्यस्त जीवन जगण्यासाठी निघालेल्या नरेंद्रभाईंना, "जाओ बच्चा, तुम्हारी देश को जरुरत हैं|” असा आदेश मिळाला. ते १९७१ साली तडक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ प्रचारक म्हणून कार्य करीत असतानाच, अनभिषिक्त सम्राज्ञी इंदिरा गांधी यांनी दि. २५ जून १९७५ रोजी देशावर लादलेल्या आणीबाणीच्या काळात नरेंद्रभाई भूमिगत झाले.
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘मोवडी मंडळा’ने, नरेंद्रभाई यांना १९९५ मध्ये भारतीय जनता पक्षाचे क्रियाशील कार्यकर्ते होण्याचा आदेश दिला. ते भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून गुजरातमध्ये कार्यरत झाले. विधानसभेच्या २००२ ते २०१२च्या, तसेच १९९५च्या व १९९८च्या निवडणूक विजयांमध्ये, नरेंद्र मोदी यांचे मोठे योगदान होते. ते २००१च्या ऑक्टोबरमध्ये गुजरातचे मुख्यमंत्री झाले व त्यानंतर सरळ चार विधानसभा जिंकत, मोदींनी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार पाहिला. २००९च्या लोकसभा निवडणुकीसाठीही ते भाजपचे ‘रणनीतिकार’ होते. नरेंद्र मोदी हे हिंदुत्ववादी विचारसरणीचे नेते असून, संघाचे कडवे स्वयंसेवक आहेत. मोदी हे गुजरात राज्याच्या विकासासाठीच ओळखण्यात येतात. त्यांच्या अर्थकारणाचीही प्रशंसा सर्वत्रच करण्यात येते. परंतु, २००२च्या दंगलीत त्यांच्या भूमिकेबद्दल आक्षेप घेण्यात आले.
 
२००१ मध्ये केशुभाई पटेल यांची प्रकृती बिघडली होती आणि पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाला काही विधानसभा जागा गमवाव्या लागल्या. २००१ मध्ये भुज येथे झालेल्या भूकंपात प्रशासनाच्या चुकीच्या हाताळणीमुळे सत्तेचा गैरवापर, भ्रष्टाचार आणि कमकुवत प्रशासनाचे आरोप झाले. त्यामुळे भाजपचे राष्ट्रीय नेतृत्व मुख्यमंत्रिपदासाठी नवीन उमेदवार शोधू लागले. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना केशुभाई पटेल यांना हटविण्याची इच्छा नव्हती, तसेच नरेंद्र मोदी यांना सरकारमधील अनुभव नसल्याचेही सांगण्यात येत होते. नरेंद्र मोदी यांनी, केशुभाई पटेल यांची उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्याची ऑफर नाकारली. गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून दि. ७ ऑटोबर २००१ रोजी नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि दि. २ फेब्रुवारी २००२ रोजी राजकोट -२ मतदारसंघातील पोटनिवडणूक जिंकून, गुजरात राज्य विधानसभेत प्रवेश केला. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार अश्विन मेहता यांचा १४ हजार ७२८ मतांनी पराभव केला.
 
दि. २ फेब्रुवारी २००२ रोजी, अयोध्येतील धार्मिक सोहळ्यानंतर परत येणार्‍या हिंदू यात्रेकरूंच्या रेल्वेला गोध्राजवळ आग लागली आणि अनेकजणांचा त्यात होरपळून मृत्यू झाला. या घटनेनंतर जाहीर निवेदन करताना, नरेंद्र मोदी यांनी त्याला ‘दहशतवादी हल्ला’ म्हणून घोषित केले आणि स्थानिक मुस्लिमांनी त्यांचा निषेध केला. दुसर्‍याच दिवशी विश्व हिंदू परिषदेने राज्यभरात ‘बंद’ची हाक दिली. ‘बंद’दरम्यान दंगल सुरू झाली आणि मुस्लीमविरोधी हिंसाचार गुजरातमध्ये पसरला. रेल्वे पीडितांचे मृतदेह गोध्रा ते अहमदाबाद येथे हलविण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे, हिंसाचार आणखी वाढला. नरेंद्र मोदींवर गोध्रा हत्याकांड आणि दंगलप्रकरणी आरोप करण्यात आले; परंतु विशेष चौकशी पथकाने मुख्यमंत्र्यांविरुद्ध कोणतेही पुरावे नसल्याचे कथन केल्यावर, डिसेंबर २०१३ मध्ये दंडाधिकारी न्यायालयाने निषेध याचिका फेटाळली, नरेंद्रभाई दोषमुक्त झाले.
 
भारतीय जनता पक्षाचे बंडखोर नेते केशुभाई पटेल, काशीराम राणा यांच्या बंडखोरीला धूप न घालता, तसेच सोनिया गांधी, डॉ. मनमोहन सिंग यांच्यासह तमाम विरोधकांना अंगावर घेत, नरेंद्र मोदी यांनी एकहाती सत्ता मिळवली. दि. ३१ ऑक्टोबर २०१३ रोजी नरेंद्र मोदी यांनी केवडिया येथे पोलादीपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे, ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ या नर्मदेच्या भव्य पात्रात भूमिपूजन केले. नरेंद्र मोदी यांचा प्रभाव गुजरातमध्ये वाढू लागला. त्यांची पकड मजबूत झाली आणि गुजरातचा सर्वांगीण विकास घडविताना, मोदींनी ‘६ कोटी गुर्जर भाषिकांचा पोशिंदा’ म्हणून जबाबदारी पार पाडली. गुजरात हे ‘विकासाचे मॉडेल’ म्हणून देशवासीयांसमोर आले. इतके की, या विकासाच्या ‘गुजरात मॉडेल’चे ‘महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट’ बनविणार्‍या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तोंडभरून कौतुक केले. हिंदी चित्रपटसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन यांनी, "चलो एक बार गुजरात की सफर करने” असे सांगत, तमाम देशवासीयांना गुजरातप्रेमाची भुरळ घातली. हाच विकासपुरुष देशाचा पंतप्रधान व्हायला हवा, असेही राज ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.
 
२०१३ मध्ये भारतीय जनता पक्षाने, नरेंद्र मोदी यांच्या नावाची २०१४च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषणा केली. यानंतर मोदींनी संपूर्ण वर्षभर देशभरात झंझावाती दौरा केला आणि २०१४च्या लोकसभा निवडणुकीत, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार दणदणीत मतांनी निवडून आले. भारतीय जनता पक्षाचे २८२ उमेदवार निवडून आले आणि काँग्रेसेतर पक्षाची एकहाती सत्ता दिल्लीच्या तख्तावर प्रतिष्ठापित झाली. मुंबईमधून लोकसभेच्या सहापैकी सहा जागा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या निवडून आल्याच; परंतु नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडे यांच्यासह असंख्य नेते दिल्लीच्या संसदेत पोहोचले. समाजाच्या सर्वच थरांतील नेते एका माळेत गुंफून, सामाजिक समता प्रस्थापित केली. गुजरातमध्ये १३ वर्षे मुख्यमंत्री म्हणून कार्य केलेल्या नरेंद्र मोदींना संसदेचा अनुभव नसतानाही, संपूर्ण भारतात झंझावाती दौरा करून भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता स्थापन केली आणि संसद भवनाच्या पायरीवर माथा टेकवून, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अर्धपुतळ्यासमोर नतमस्तक होत संसद भवनात प्रवेश केला. "मी पंतप्रधान नव्हे, तर १४० कोटी भारतीयांचा प्रधानसेवक आहे,” असे नम्रतापूर्वक त्यांनी सांगितले आणि दि. २६ मे २०१४ रोजी देशाचे १५वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.
 
नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान झाल्यावर, गुजरात विधानसभेत त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्यात आला. तेव्हा शंकर सिंह वाघेला यांच्यापासून सर्वपक्षीय नेत्यांनी मोठमोठाली भाषणे करून, प्रचंड अपेक्षा व्यक्त केल्या. परंतु, त्यावेळी विधानसभा अध्यक्ष असलेल्या वजूभाई वाळा यांनी, एकाच वायात सांगितले की, "नरेंद्रभाई मोदी यांनी गुजरातमध्ये मुख्यमंत्रिपदावर असताना देशाच्या पंतप्रधानांकडून ज्या-ज्या अपेक्षा व्यक्त केल्या होत्या, त्या सर्व अपेक्षा आता ते स्वतः त्या पदावर आले असल्याने त्यावर सही करावी.” अतिशय योग्य भूमिका वजुभाई वाळा यांनी मांडली. १९४७ पासूनची सगळी समीकरणे बदलून टाकीत संकल्प, सेवा, सिद्धी प्राप्त केली. ‘योजना आयोगा’चे ‘नीती आयोगा’त परिवर्तन केले. वस्तू आणि सेवा कर लागू करीत, देशाच्या अर्थव्यवस्थेत सुसूत्रता आणण्यासाठी प्रयत्न केला. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, जम्मू-काश्मीरसंबंधित घटनेचे ‘३७० कलम’ हटवून जम्मू-काश्मीर हा देशाचा अविभाज्य भाग असल्याचे, तसेच लेह लडाख यांचाही प्रश्न मार्गी लावत पाकिस्तानला ठणकावून सांगितले.
 
रशियाबरोबरची मैत्री टिकवितानाच, अमेरिकेशी आणि चीनशीही दोस्तीचा हात मिळविला. ज्या नरेंद्र मोदींना परदेशात जाण्यापासून काही वर्षांपूर्वी ‘व्हिसा’ नाकारून रोखण्यात आले, त्याच मोदींनी नाकावर टिच्चून निधड्या छातीने हवाईसफर सुरू केली. मोठ्यांपासून छोट्या-छोट्या देशांबरोबर मैत्रीचे संबंध निर्माण केले. २०१४, २०१९ आणि २०२४च्या लोकसभा निवडणुकीत चढत्या क्रमाने विजय संपादित करून, भारतीय जनता पक्षाचे स्थान देशात भरभक्कम केलेच; पण नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशातील विविध राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या अधिपत्याखाली ‘डबल इंजिन’, ‘ट्रिपल इंजिन’ सरकारे आणण्याचा विक्रमही करून दाखविला. पहिल्यांदा ‘सबका साथ, सबका विकास’ ही घोषणा केली. नंतरच्या काळात ‘भाजप-२’ सरकारमध्ये ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ हे सूत्र अंगीकारून वाटचाल केली आणि ‘भाजप-३’ या कारकिर्दीत ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’ हे सूत्र अमलात आणून, १४० कोटी जनतेला विकासाच्या वाटचालीत जोडले.
 
२०४७ साली भारताच्या स्वातंत्र्याला १०० वर्षे पूर्ण होत असून, त्यावर्षी ‘विकसित भारत’ ही संकल्पना साकार करण्यासाठी ते आणि त्यांचे सर्व सहकारी अथक परिश्रम घेत आहेत. या १२ वर्षांच्या कारकिर्दीत अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिर आकारास येऊन, प्रभू श्रीरामाने आपल्या हयातीत १४ वर्षांचा वनवास भोगला असला, तरी ५०० वर्षांपासून वनवासात असलेल्या श्रीराम मंदिर जन्मभूमीला नरेंद्रभाई यांच्या कुशल नेतृत्वाखाली मोकळा श्वास घेता येईल, अशी परिस्थिती निर्माण केली. केवळ मंदिर नव्हे, तर मंदिरापर्यंत जाण्यासाठी हरतर्‍हेच्या पायाभूत सुविधा अगदी पंचतारांकित नाही, तर सप्ततारांकित पद्धतीने निर्माण करण्यात आल्या. जमिनीवरून, हवाईमार्गाने लोक थोड्याच कालावधीत तेथे पोहोचू शकतात. ‘वंदे भारत’ या रेल्वेगाड्यांचे जाळे निर्माण करण्यात आले, तद्वतच मेट्रोचे जाळेही विकसित होत आहे. ‘बुलेट ट्रेन’सुद्धा लवकरच धावण्याच्या प्रतीक्षेत आहे. आमदार संजय उपाध्याय यांनी वसई-दिवामार्गे बोरिवली ते कर्जत-कसारा आणि पुन्हा त्याच मार्गाने उपनगरी रेल्वेसेवा जोडण्याच्या प्रकल्पाची संकल्पना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना समजावून सांगत सामान्यांची वेळ, पैसा आणि मेहनत वाचविण्याचे शिवधनुष्य उचलले आहे. सामान्य माणसापासून उच्चभ्रू वर्गातील लोक हा विकास पाहून आनंदले आहेतच; तर देश-विदेशातील लोकांनीही आश्चर्याने तोंडात बोटे घातली आहेत.
 
समाजातील प्रत्येक घटकाला स्थान देताना, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना अभिप्रेत असलेली ‘अंत्योदया’ची संकल्पना साकार करण्यात येत आहे. लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या ‘संपूर्ण क्रांती’मधील समाजाच्या शेवटच्या माणसाला विकासाची फळे केवळ चाखायलाच नव्हे; तर ती ग्रहण करायला मिळावीत, यासाठी अथक परिश्रम घेण्यात येत आहेत. नावे भिन्न असली, तरी पंडित दीनदयाळ उपाध्याय आणि लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या संकल्पना एकच आहेत. सर्वच आघाड्यांवर वेगवान घोडदौड सुरू असून, नरेंद्र मोदी यांच्या गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाचा १३ वर्षांचा आणि देशाच्या पंतप्रधानपदाचा १२ वर्षांच्या कारकिर्दीचा एकूणच रौप्यमहोत्सव, हा सर्वांत मोठ्या लोकशाही देशाचा महत्त्वाचा टप्पा म्हणावा लागेल.
 
वडनगर, गुजरातमध्ये जन्म झाला असला, तरी तीनही लोकसभा निवडणुका नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील वाराणसीमधून जिंकल्या. तसेच मतदान झाले की, ते मतमोजणीसाठी न थांबता केदारनाथ, बद्रीनाथ येथे ध्यानधारणेत मग्न राहात, हे खास त्यांचे वैशिष्ट्य. दि. ३१ ऑटोबर २०१३ रोजी डभोई (वडोदरा) जवळच्या केवडिया येथे भूमिपूजन करण्यात आलेल्या, ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चे दि. ३१ ऑटोबर २०१८ रोजी लोकार्पण करून लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना नरेंद्र मोदींनी मानाचा मुजरा केला. इच्छा असली की, कार्य सिद्धीस जाऊ शकते; हेच यानिमित्ताने नरेंद्र मोदी यांनी जगाला दाखवले. आपल्या नेतृत्वाखालील सर्वांना समान न्याय देताना, प्रधानसेवक नरेंद्र दामोदरदास मोदी यांनी आपला अमीट ठसा उमटविला आहे. आध्यात्मिक मार्गाने मार्गक्रमण करणार्‍या नरेंद्र मोदी यांनी, ज्येष्ठांनासुद्धा तितकेच महत्त्व असल्याचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना प्रणिपात करून दाखवून दिले. समोर म्हणावा तितका प्रबळ विरोधी पक्ष नसल्याने किंबहुना, विरोधक स्वतः अंधारात चाचपडत असल्याने, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील ‘अश्वमेध यज्ञ’ फलद्रूप झाल्याशिवाय राहणार नाही, हे निःसंशय! ‘विकसित भारत’ संकल्पना अस्तित्वात आणण्यासाठी, तसेच सेवेतून सिद्धी प्राप्त करण्यासाठी नरेंद्रभाई मोदी यांना उदंड आयुष्य आणि ठणठणीत आरोग्य प्राप्त होवो, या मनःपूर्वक शुभेच्छा!
 
  -योगेश त्रिवेदी
(लेखक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत.)
९८९२९३५३२१




संबंधित मजकूर