'नाना' स्मृती

    11-Oct-2026
 
 
Nana Patekar
 
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनामुळे मनोरंजनसृष्टीने केवळ एक उमदा कलाकारच गमावलेला नाही, तर कित्येक कलाकारांनी नानांच्या रुपाने त्यांना भेटलेला एक जिवाभावाचा मित्र, एक संवेदनशील माणूसही कायमचा गमावला आहे. ज्येष्ठ कलाकार वंदना गुप्ते आणि मोहन जोशी यांचेही नानांशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. तेव्हा, दै. ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना या दोन्ही कलाकारांनी उजाळा दिलेल्या या ‘नाना’स्मृती...
 
नाना गेला, यावर अजूनही विश्वास बसत नाही! त्याची बातमी समजली आणि झराझरा भूतकाळ डोळ्यांसमोरून गेला. नाना कलाकार म्हणून जितका उत्तम होता, तितकाच माणूस म्हणूनही तो उत्तम होता. त्याची आणि माजी ओळख भारती (आचरेकर)मुळेच झाली होती. कोजागिरीनिमित्त भारतीच्या गच्चीवर ‘गेट-टुगेदर’ ठेवले होते. नाना, निळूभाऊ आले होते. आमच्या इतक्या मस्त गप्पा रंगल्या होत्या. तेव्हा पहिल्यांदा मी नाना पाटेकर या व्यक्तीला भेटले. म्हणजे त्याला तेव्हा नाव, गाव असे काही नव्हतेच मुळात. माहीतही नव्हते की, हा असा कलाकार आहे किंवा काय; पण भारतीमुळे तेव्हा भेट झाली होती. त्यावेळी नानाने इतक्या कविता ऐकवल्या आणि एकदम आवडून जाणारी ‘पर्सनॅलिटी’च निर्माण केली. पहिल्या भेटीतच नाना हे काहीतरी वेगळे रसायन आहे, हे मला जाणवले. नीला पण फार छान होती. मला वाटते, दोघांचे तेव्हा नुकतेच लग्न झालेले. तेव्हाची ही पहिली भेट मला आजही आठवते. कोजागिरीच्या त्या कार्यक्रमात बरेचसे कलाकार होते, म्हणजे ओळखीची माणसे होती आणि नानानेच ती संध्याकाळ अर्थोअर्थी गाजवली होती. अशा काही व्यक्ती अचानक भेटल्याने एकदम स्मरणात राहतात, मलाही नानाच्या बाबतीत तसेच झाले होते.
 
पहिल्या भेटीतच नाना मला एकदम वेगळे वाटला. मी नाट्यसृष्टीत नानाच्या आधी आले. साधारणतः १९७३ साली. तो माझ्या नंतर म्हणजे १९७८ साली आला. नाटकांतही त्याने अनेक उत्तम भूमिका साकारल्या. अनेक पात्रांत तो इतका एकरूप व्हायचा की, त्याचा अभिनय बघणे म्हणजे पर्वणी असायची. नंतर तो कलाकार म्हणून किती मोठा आहे, हे दिसायला लागले. मराठी, हिंदी सिनेमा असे एकेक पाऊल तो पादाक्रांत करत गेला. पण, नाटकात त्याने जी चुणूक दाखवली, ती वेगळीच होती. चित्रपटांमध्ये सामान्य दिसणारी; पण ‘लार्जर दॅन लाईफ’ पात्रे तो साकारायचा. त्याला पडद्यावर बघणे म्हणजे ‘ट्रीट’ असायची, अख्खा पडदा तो व्यापून टाकायचा! नाना स्वतःच एक ‘लार्जर दॅन लाईफ’ सिनेमा होता, असे मला नेहमी वाटायचे. नानाचा अभिनय हा केवळ अभिनय नव्हता; तर तो स्वतःच्या आयुष्याचे, लेखनाचे, दिग्दर्शनाचे आणि निर्मितीचे एकत्रित रूप होता- म्हणजे पूर्ण कलाजीवन! त्याची साधी, मातीशी जुळलेली वागणूक आणि उत्कटता यांनी त्याला खर्‍या अर्थाने विशिष्ट बनवले. असा हा सर्वगुणसंपन्न नाना अगदी मातीतून आलेला आणि मातीतच कसा रुजला आणि मातीतच कसा रमला, हे सगळे बघून असे वाटते की, काय अथांग माणूस होता आमचा नाना!
 
नाना मराठीत ‘स्टार’ होताच; पण हिंदीतही खूप मोठे नाव, वलय त्याने निर्माण केले. हिंदीत त्याने जे काही आपले कौशल्य दाखवले, त्याचा हिंदीतल्या निर्माता आणि दिग्दर्शकांनी पूर्ण फायदा करून घेतला. एक कलाकार म्हणून नाना त्यांनी उत्तम तयार केला. तो मराठीतही रमायचा. पण, हिंदी सिनेमा मात्र जास्त करायचा. तो म्हणायचा की, "मी हिंदी सिनेमा का करतो? ‘रोल’ चांगलाच पाहिजे असे नाही. पण, पैसे मिळतात आणि ते पैसे मला सामाजिक कार्यात वापरता येतात.” ‘स्टार’ असूनही कधी ‘स्टार’पण नानाने मिरवले नाही. कुठल्याही टीव्हीच्या कार्यक्रमात आला, तर तो कसा, कधी, काय लखलखाटात आणि ‘एलईडी’ शाईन होत आहेत, लाईट वगैरे आणि नाना ‘एन्ट्री’ घेतोय, असे कधीच झाले नाही. तो कधी येऊन बसायचा, मिसळायचा की, त्याला ‘स्टार’पण मिरवायचेच नसायचे. तो मातीतला होता आणि मातीतलाच राहिला अगदी शेवटपर्यंत!
 
अभिनेता म्हणून तो काय उंचीचा होता सगळ्यांनाच माहिती आहे. ‘अ‍ॅशन’, ‘इमोशन्स’, विनोदी, क्रूर सगळ्या भूमिका तो उत्तम करायचा. त्याची नाचण्याचीही वेगळीच ‘स्टाईल’ होती. त्याला सगळ्या छटा दाखवणारे हिंदी सिनेमे मिळाले. त्यामुळे तो एवढा उत्तुंग अभिनेता आहे, हे लोकांना जाणवले. त्याची संवादफेकीची एक वेगळीच ‘स्टाईल’ होती. या सगळ्यानेच प्रेक्षकांच्या मनावरही गारुड केले.
 
नाना खर्‍या अर्थाने ‘अभिनयाचा बादशहा’ होता. विशेषतःजेव्हा त्याला ‘नटसम्राट’ चित्रपटातील ‘गणपतराव बेलवलकर’ यांची भूमिका मिळाली, तेव्हा तो त्या पात्राशी अक्षरशः एकरूप झाला होता. रात्रंदिवस तो फक्त आणि फक्त त्या भूमिकेचाच विचार करत असत.
 
हिंदी आणि मराठी अशा दोन्ही माध्यमांनी नानाच्या बहुगुणी क्षमतेला व्यासपीठ दिले, ज्यामुळे लोकांना त्याची खरी ताकद उमगली. त्याने समाजासाठी आणि शेतकर्‍यांसाठी जो आधार आणि जबाबदारी घेतली, ती त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची मोलाची वैशिष्ट्ये आहेत. तो आपले कमावलेले पैसे सामाजिक कार्यासाठी वापरायचा आणि समाजासाठी जबाबदारी उचलण्याची वृत्ती होती.
 
आम्ही चौघी बहिणी गोव्याला फिरायला जाणार होतो, तेव्हा नानाने हक्काने फोन केला की, "काही लागले तर सांगा, आपल्या घरी राहायला जा.” त्याने केअर टेकरलाही सांगून ठेवले होते. पण, आम्ही हॉटेलवरच थांबलो. नानाचे घर मात्र आवर्जून बघून आलो. मस्त घर आहे. समुद्रासमोरचे घर, पारंपरिक शिल्प, घरात पण आपल्या संस्कृतीची जपणूक आणि माणुसकीची भावना ठळकपणे दिसली. प्रसन्न असे घर आहे. नानाचा गणपती तर फेमस होता. माटुंग्याला आमच्याच शेजारी राहायचा. लहानपणापासून प्रत्येक गणपतीला आम्ही नानाकडे जायचो. आधी मित्र म्हणून जायचो, हळूहळू तो ‘स्टार’ झाला. ‘स्टार’ झाल्यावरही त्याने आपले सण-उत्सव सोडले नाहीत.
 
‘नाम फाऊंडेशन’च्या माध्यमातून त्याने उत्तम कार्य केले. शेतकर्‍यांसाठी सदैव तो उभा राहायचा. मला मकरंदचेही कौतुक वाटायचे की, त्याने अगदी योग्य माणूस सोबत घेतला. नानाला सोबत घेतल्यामुळे कामाचा आवाका वाढला, विश्वास निर्माण झाला. नाना आणि मकरंदने ‘नाम’ नावाच्या रोपट्याचे रूपांतर वटवृक्षात केले. शेतकर्‍यांना यंदा नानाची खरी गरज होती. दुष्काळ उभा आहे आणि नेमका नाना आपल्यात नाही, हा विचारच करवत नाही.
 
नानाचा स्वभाव असा होता की, तो कधीही, कुठेही अचानक धडकायचा आणि एकदा त्याच्याशी गप्पांची मैफील जमली की, वेळेचे भान उरायचे नाही. नुकताच नाना स्वप्नात आला होता आणि म्हणाला, "वंदना, आपण एकत्र काम करूयात.” पण, ते स्वप्न आता स्वप्नच राहिले. एवढ्या मोठ्या कलाकारासोबत प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळाली नाही, ही खंत आयुष्यभर उरी राहील. नाना राजासारखा जगलास; पण शेवटी रडवून गेलास, असंख्य आठवणी ठेवून!
-वंदना गुप्ते
(संकलन आणि शब्दांकन :कपिल देशपांडे)




संबंधित मजकूर