अनेक राज्यांत काँग्रेसला मुख्यमंत्रीपद मिळत नाही, त्याचेही कारण व्होट चोरी? अमित शाहांपाठोपाठ फडणवीसांचा सवाल

निवडणुकीतील पराभवावरून भाजपची काँग्रेसवर टीका; आत्मपरीक्षण करून जनादेशाचा सन्मान करण्याचे आवाहन

    11-Oct-2026
 
Devendra Fadnavis on Congress’ Vote Chori Allegations
 
नवी दिल्ली (Devendra Fadnavis on Congress’ Vote Chori Allegations) : निवडणुकीतील पराभवानंतर ‘व्होट चोरी’चे आरोप करणाऱ्या काँग्रेसवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी टीका केली आहे. अनेक राज्यांमध्ये काँग्रेसला कित्येक दशकांपासून मुख्यमंत्रीपद मिळालेले नाही. या पराभवांचे कारणही ‘व्होट चोरी’ आहे का, असा सवाल शाह यांनी उपस्थित केला. शाह यांच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही समाजमाध्यमांवर पोस्ट करत काँग्रेसला लक्ष्य केले. निवडणुकीतील पराभवाची कारणे शोधण्यासाठी काँग्रेसने आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला भाजपच्या दोन्ही नेत्यांनी दिला.
 
दि. ९ ऑक्टोबर २०२६ रोजी कोलकाता येथे भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत बोलताना अमित शाह यांनी काँग्रेसच्या निवडणूक कामगिरीवर प्रश्न उपस्थित केले. तामिळनाडू, पश्चिम बंगाल, सिक्कीम, बिहार, गुजरात, ओडिशा, नागालँड आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये काँग्रेसला दीर्घकाळ मुख्यमंत्रीपद मिळाले नसल्याचा उल्लेख त्यांनी केला. प्रत्येक निवडणुकीतील पराभवानंतर ईव्हीएम, मतदारयाद्या, ‘व्होट चोरी’ किंवा मतदारयादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करण्याऐवजी काँग्रेसने आपल्या राजकीय कामगिरीचे विश्लेषण करावे, असे शाह म्हणाले. काँग्रेसला अनेक राज्यांत सत्ता मिळत नसल्यास त्यासाठी निवडणूक प्रक्रियेला जबाबदार धरणे योग्य आहे का, असा सवाल त्यांनी केला. जनतेने दिलेल्या कौलाचा आदर करून पराभवाची कारणे शोधण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. (Devendra Fadnavis on Congress’ Vote Chori Allegations)

फडणवीसांची समाजमाध्यमांवरून टीका
 
अमित शाह यांच्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही काँग्रेसवर निशाणा साधला. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले, “दशकों तक कई राज्यों में मुख्यमंत्री न बना पाने का जवाब भी क्या कांग्रेस ‘वोट चोरी’ के आरोपों में ढूँढेगी?”
 
तामिळनाडूपासून महाराष्ट्रापर्यंत अनेक राज्यांमध्ये काँग्रेसला दीर्घकाळ मुख्यमंत्रीपद मिळालेले नाही. तरीही निवडणुकीतील पराभवानंतर निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्न का उपस्थित केले जातात, असा सवाल फडणवीस यांनी केला. निवडणूक आयोगाने शपथपत्राद्वारे दाव्यांची पुष्टी करण्यास सांगितल्यानंतर ठोस पुरावे का दिले जात नाहीत, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. आरोप-प्रत्यारोप करण्याऐवजी काँग्रेसने आपल्या निवडणूक कामगिरीचे आत्मपरीक्षण करावे आणि जनादेशाचा सन्मान करावा, असे आवाहन फडणवीस यांनी केले.‘व्होट चोरी’च्या आरोपांवरून दोन्ही पक्षांमधील राजकीय संघर्ष कायम आहे. (Devendra Fadnavis on Congress’ Vote Chori Allegations)
 
 




संबंधित मजकूर