विनोदनिर्मिती हे वरकरणी सोपं वाटत असलं, तरी खूपच कठीण काम. विनोदनिर्मितीतूनच नकळत डोळ्यांत पाणी आणणं आणि बरं त्यातूनही सामाजिक संदेश देणं, हे त्याहून कठीण. पण, दिग्दर्शक मिलिंद कवडे हे आता या पॅटर्नमध्ये माहीर होत चालले आहेत, असेच म्हणावे लागेल. कारण, त्यांचा ‘अफरातफरी’ हा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट करमणुकीच्या बाबतीत ‘येड्यांची जत्रा’, ‘४ इडियट्स’, ‘टकाटक’, ‘श्री गणेशा’ या चित्रपटांच्या एक पाऊल पुढे आहे. ‘अफरातफरी’ बघितल्यावर कवडे दोन गोष्टींमधील विसंगतता पकडण्यात, अर्थात गंभीर विषयात हलकीफुलकी बाजू शोधण्यातही तरबेज झाल्याचं दिसत. डॉ. मोहन आगाशे, संजय नार्वेकर, शशांक शेंडे, ओंकार भोजने, प्राजक्ता हनगमकर, नेहा खान, किरण माने अशी तगडी स्टारकास्ट एकत्र हाताळणं मोठीच गोष्ट, पण मिलिंद हे काम अगदी सुरुवातीपासून करत आले आहेत. ‘प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करण्यासाठी बनवलेला चित्रपट’ असंच ‘अफरातफरी’बद्दल म्हणता येईल.
चित्रपटाची कथा तीन भावांच्या अवतीभोवती फिरते. त्यांच्या वडिलांनी घेतलेली एक कोटी रुपयांची खास विमा पॉलिसी आणि त्यांच्या मृत्यूनंतर ती रक्कम मिळवण्यासाठी, या भावांमध्ये सुरू होणारी चढाओढ, यातून चित्रपटात मोठा गोंधळ निर्माण होतो. पैशांच्या लोभापायी नाती कशी बदलतात आणि त्यातून कोणते विनोदी प्रसंग घडतात, सगळ्यांच्या आयुष्यात नेमका काय गोंधळ उडतो, हे सगळंच जाणून घेण्यासाठी तुम्हाला ‘अफरातफरी’ बघावा लागेल.
तुम्ही प्रियदर्शन, अनिस बझ्मी स्टाईल चित्रपटांचे चाहते असाल, तर या चित्रपटाचा तुम्ही मनमुराद आनंद घ्याल. अनेक पात्र, सगळ्यांचं एकच लक्ष, त्यातून उडणारा भरपूर सारा गोंधळ, एकमेकांशी चढाओढ, धावपळ हे या चित्रपटाचं वैशिष्ट्य! पण राहुल भातणकर यांचे संकलन थोडे अधिक सफाईदार असण्याची गरज होती; कारण काही ठिकाणी चित्रपट उगाचच ताणल्यासारखा वाटतो. पण, प्रासंगिक विनोद हे या चित्रपटाचं सगळयात मोठं बलस्थान आहे. कुठेही कमरेखालची विनोदनिर्मिती करण्यात आलेली नाही, हीही चित्रपटाची जमेची बाजू.
शशांक शेंडे यांनी तुफान बॅटिंग चित्रपटात केली आहे. या वर्षात वैविध्यपूर्ण भूमिकांमध्ये ते दिसत असून, या सिनेमातही त्यांनी कमाल केली आहे. संजय नार्वेकरांचेही टायमिंग भन्नाट आहे. त्यांचे वनलाईनर मजा आणतात. ओंकार भोजने तर विनोदी खेळपट्टीवरील कसलेला खेळाडू. प्रत्येक बॉल येईल त्या दिशेला त्याने भिरकावला आहे. ओंकार आणि नार्वेकर चित्रपटाची जान आहेत. धीरगंभीर भूमिकेत नेहमी दिसणार्या किरण माने यांनीही, या सगळ्या अवलियाना उत्तम साथ देत मजा आणली आहे. मिलिंद कवडे यांची अजून एक किमया म्हणजे, नेहा खानला ज्या पद्धतीने सादर केलंय. कमाल! प्राजक्ताने नेहमीप्रमाणे जोरदार हिटिंग करत, आपली भूमिका चोपली. तिची फटकेबाजी बघून बर्याच दृश्यांत तुम्ही पोट धरून हसाल. आसावरी जोशींना बर्याच दिवसांनी मराठीत धमाल भूमिकेत बघून मजा येते. ‘द ग्रेट’ डॉ. मोहन आगाशे यांनी दशरथ तात्यांची भूमिका चोख बजावत, सगळ्या संघाला तोलामोलाची साथ दिली आहे. इतर कलाकारांनीही छोट्या छोट्या भूमिकेत मजा आणली.
मिलिंद कवडे यांनी सगळी पात्रं एकत्र आणून, अर्धी बाजी आधीच जिंकली होती. काही गोष्टी खटकतात, पण मसाला चित्रपटात थोडं वर-खाली चालतंच. थोडंसं पटकथेवर काम केलं असतं, तर हा चित्रपट उत्तम विनोदी चित्रपट झाला असता. चित्रपटाचं संगीत मात्र निराश करतं. वरुण लिखते यांचे संगीत आणि अभिनय जगताप यांचे पार्श्वसंगीत ठीकठाकच झाले आहे. विनोदी चित्रपटाला लागणारा थोडा ‘फास्ट स्पेस’ जाणवतो. हजरत शेख यांचे कॅमेरा वर्क उत्तम आहे. ‘ओल्ड स्कूल ड्रामा’ असलेला हा चित्रपट डोकं बाजूला ठेवून हलकीफुलकी कॉमेडी बघायची असेल, तर नक्कीच तुमचं मनोरंजन करेल!
बॅनर : स्कायलाईन सिनेमॅटिक, येन मूवीस स्टुडिओज
निर्माता : युसूफ शेख, देव गुप्ता
कथा, पटकथा आणि दिग्दर्शन - मिलिंद कवडे
कलाकार : डॉ. मोहन आगाशे, शशांक शेंडे, संजय नार्वेकर, ओंकार भोजने, आसावरी जोशी, प्राजक्ता हनगमकर, नेहा खान, किरण माने
अवधी : २ तास
- कपिल देशपांडे