माध्यमांचे मुख्य कार्य घडलेली घटना आहे तशी लोकांपर्यंत पोहोचविण्याचे असते. असे असले, तरीही भारतीयांप्रति पूर्वग्रह बाळगणार्या अनेक पाश्चात्य वृत्तवाहिन्या आजही भेदाभेद बाळगताना दिसतात. कॅप्टन स्मित मच्छार यांच्या शौर्याविषयी वार्तांकन करताना, याचा अनुभव जगाने घेतला. पाश्चात्य वृत्तवाहिन्यांच्या या कृतीचा आढावा घेणारा हा लेख...
कॅप्टन स्मित मच्छार अनेक भारतीयांसाठी आणि खासकरुन पाश्चात्त्य माध्यमांसाठी, एक अस्वस्थ करणारा नायक झाला. दि. ३० सप्टेंबर २०२६ रोजी इस्रायलकडे जाणार्या ‘फ्लायदुबई’च्या विमानात, एक अभूतपूर्व संकट निर्माण झाले. उड्डाणानंतर काही क्षणांतच विमान सुमारे १४ हजार फूट खाली आले. परिस्थिती इतकी गंभीर होती की, विमानातून ‘७५००’ हा ट्रान्सपॉण्डर कोडही प्रसारित करण्यात आला. आंतरराष्ट्रीय विमानवाहतूक व्यवस्थेत, हा कोड विमान अपहरणाचा किंवा बेकायदेशीर हस्तक्षेपाचा इशारा मानण्यात येतो.
यानंतर विमानाने सौदी अरबच्या ‘तबुक’ विमानतळावर आपत्कालीन ‘लॅण्डिंग’ केले. भारतीय वंशाचे कॅप्टन स्मित मच्छार यांनी, ओमानी सहवैमानिकाच्या विमानावर नियंत्रण मिळवण्याच्या आणि विमान कोसळवण्याच्या प्रयत्नाला प्रतिकार केला. यात ते स्वतः गंभीर जखमी झाले. मात्र, त्याही अवस्थेत त्यांनी ‘कॉकपिट’चे दार उघडून, प्रवासी आणि ड्युटीवर नसलेल्या वैमानिकांना मदतीसाठी आत येण्याची संधी दिली. त्यांच्या आणि इतरांच्या संयुक्त प्रयत्नांमुळेच, हल्लेखोराला जेरबंद करुन, विमानावरील नियंत्रण पुन्हा स्थिर करण्यात यश आले. या घटनेची पार्श्वभूमी हळूहळू समोर येत असतानाच, अनेक पाश्चिमात्य आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांनी या घटनेचे केलेले वार्तांकन वादाचा विषय ठरले आहे. विशेषतः योजलेले शब्द, बातमीची मांडणी आणि मच्छार यांच्या शौर्याकडे झालेल्या दुर्लक्षावर प्रश्न उपस्थित होत आहेत.
माध्यमांमधील शब्दांची निवड आणि कथानकाची चौकट
घटना घडल्यावर विविध माध्यमांच्या सुरुवातीच्या मथळ्यांकडे पाहिले असता, एक विशिष्ट नमुना असल्याचे दिसते. ‘सीएनएन’ने याचे वर्णन, ‘दोन वैमानिकांमधील हिंसक वाद’ असे केले. ‘न्यूयॉर्क टाईम्स’ने ‘वैमानिक आणि सहवैमानिकामधील वादानंतर विमान वळविण्यात आले’ असे म्हटले. वास्तविक विमानातून ‘७५००’ हा ‘ट्रान्सपॉण्डर’ कोडही प्रसारित करण्यात आला होता. आंतरराष्ट्रीय विमानवाहतूक व्यवस्थेमध्ये, हा कोड विमानाच्या अपहरणाचा किंवा बेकायदेशीर हस्तक्षेपाचा इशारा मानला जातो. ‘एएफपी’ या वृत्तसंस्थेने, ‘ आपापसातील झटापटीमुळे दोन वैमानिक जखमी’ असा सूर लावला. ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने तर ‘कॉकपिटमधील संघर्षात दोन्ही वैमानिक जखमी’ झाल्याचीच मांडणी केली, तर ‘स्काय न्यूज’ने ‘वैमानिकांमधील भांडणानंतर विमान सुरक्षित उतरले’ असे म्हटले होते. ‘बीबीसी’नेदेखील ‘दोन वैमानिकांमधील भांडणामुळे विमान वळविण्यात आले’ अशीच बातमी दिली.
वरील सर्व मथळ्यांमध्ये एक समान बाब दिसते. घटनेचा केंद्रबिंदू असलेला, ‘कॉकपिटचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न’, ‘७५०० आपत्कालीन कोड’ आणि ‘विमानातील शेकडो प्रवाशांच्या जीवाला निर्माण झालेला धोका’ हे मुद्देच या माध्यमांनी दुय्यम ठरवले. त्याऐवजी ही घटना भांडण, वाद, झटापट किंवा संघर्ष अशा शब्दांभोवती कथा रंगवण्याचा प्रयत्न केला. दिवसेंदिवस ‘वेस्टर्न मीडिया’ अत्यंत बेजबाबदार होत असून, हा बेजबाबदारपणा भारताची किंवा भारतीयांची प्रशंसा करण्याचा प्रश्न येतो, त्यावेळी अधिकच वाढतो.
भाषिक चौकटीचा परिणाम
संकटकाळातील पत्रकारितेत सावध भाषा वापरणे आवश्यक असते. कारण, भाषेची निवड ही केवळ तांत्रिक बाब नसून, ती लोकांच्या मनात घटनेबद्दलची प्रतिमा तयार करते. जर एखादा वैमानिक ‘७५००’ हा आपत्कालीन कोड वापरत असेल, शारीरिक हल्ल्याचा सामना करतानाही विमानावरील नियंत्रण टिकवून ठेवत असेल; तर त्या घटनेला भांडण म्हणणे हे दिशाभूल करणारेच ठरते. अशाप्रकारची शब्दरचना भ्रम पसरवते. वास्तविक पाहता, उपलब्ध माहितीनुसार ही दोन कर्मचार्यांमधील हा साधा वाद नव्हता. तर विमानाच्या सुरक्षिततेला निर्माण झालेला तो गंभीर धोकाच होता. अशा वेळी ‘भांडण’ हा शब्द वापरल्यास, घटनेचे गांभीर्य कमी होऊन वाचकांसमोर अपूर्ण चित्र जाते.
नायकाकडे झालेले दुर्लक्ष!
या घटनेच्या सुरुवातीच्या वृत्तांकनात, कॅप्टन स्मित मच्छार यांचे नाव, राष्ट्रीयत्व आणि त्यांच्या भूमिकेचा अनेक ठिकाणी उल्लेखच आला नव्हता. ‘दोन वैमानिक’ या सर्वसाधारण शब्दप्रयोगामध्ये हल्लेखोर आणि प्रतिकार करणार्यातील मूलभूत फरकच अस्पष्ट झाला. ‘कॉकपिट’मधील संघर्षात एक व्यक्ती विमानावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करीत होती, तर दुसरी व्यक्ती १७४हून अधिक प्रवाशांचे प्राण वाचविण्यासाठी झुंजत होती. परंतु, सुरुवातीच्या अनेक बातम्यांत दोघांनाही एकाच पद्धतीने चित्रीत करण्यात आले.
यामुळे एका शौर्यकथेचे रूपांतर ‘दोन वैमानिकांमधील वाद’ अशा संदर्भहीन कथेत झाले. परिणामी, कॅप्टन मच्छार यांच्या धैर्यालाही सुरुवातीला अपेक्षित महत्त्व मिळाले नाही.
संस्थात्मक सावधगिरी की भारतद्वेष?
सुरुवातीच्या टप्प्यात कोणत्याही घटनेला अपहरण, दहशतवादी कृत्य किंवा तत्सम स्वरूप देण्यापूर्वी, अधिकृत तपासाची प्रतीक्षा करणे आवश्यक असते. पण, उपलब्ध तांत्रिक माहिती; ‘७५००’ आपत्कालीन कोड आणि आपत्कालीन ‘लॅण्डिंग’मुळे, हा कर्मचार्यांमधील साधा वाद नसल्याचे स्पष्ट संकेत मिळत होते. तरीही,याकडे पूर्ण दुर्लक्ष करण्यात आले.
‘अस्वस्थ करणारा नायक’
कॅप्टन मच्छार यांनी जखमी अवस्थेतही असामान्य धैर्य दाखवले. यामुळे त्यांना ‘नायक’ म्हणून गौरविले जाणे स्वाभाविकच. परंतु, त्यांची ओळख, पार्श्वभूमी आणि वैचारिक पूर्वग्रहांमुळे, काही माध्यमे आणि विश्लेषक त्यांना नायक म्हणण्यास संकोच करत आहेत. जर संबंधित वैमानिकाची सामाजिक, धार्मिक किंवा सांस्कृतिक पार्श्वभूमी वेगळी असती; तर माध्यमांचीही प्रतिक्रिया वेगळी असती. याचमुळे माध्यमांतील राजकारणाबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.
माध्यमे, ओळख आणि दुहेरी निकषांचा प्रश्न
लोकशाही व्यवस्थेत माध्यमांची भूमिका माहिती देण्यापुरतीच मर्यादित नसते. ती समाजात कोणाला ‘नायक’ मानायचे, कोणत्या घटनांना महत्त्व द्यायचे यावरही प्रभाव टाकते. म्हणूनच, नायकाचे मूल्यमापन करताना आपण व्यक्तीच्या कृतींकडे पाहतो की, त्याच्याकडे ओळखीच्या चष्म्यातून पाहतो? असा प्रश्न उपस्थित होतो. जर एखाद्या व्यक्तीने शेकडो जीव वाचविण्यात निर्णायक भूमिका बजावली असेल, तर तिच्या धैर्याचे मूल्यांकन तिच्या कृतींच्याच आधारे व्हायला हवे.
निष्कर्ष : ‘फ्लायदुबई’ विमानाचे प्रकरण केवळ विमानवाहतुकीतील आपत्कालीन परिस्थितीचे उदाहरण नाही. ते आधुनिक माध्यमांच्या भाषिक चौकटी, बातम्यांचा प्राधान्यक्रम आणि नायकाच्या सार्वजनिक आकलनाचा अभ्यास करण्यासाठी महत्त्वाचे प्रकरण झाले आहे. ‘कॉकपिट’मध्ये घडलेली घटना ही साधे भांडण नव्हते, तर विमानाच्या सुरक्षिततेशी संबंधित अत्यंत गंभीर परिस्थिती होती. अशा वेळी कॅप्टन स्मित मच्छार यांनी दाखविलेले धैर्य, नेतृत्व आणि व्यावसायिकतेची नोंद घेणे आवश्यक आहे.
अनेक भारतीयांसाठी आणि पाश्चात्त्य माध्यमांमधील अनेकांसाठी कॅप्टन स्मित मच्छार हा एक अस्वस्थ करणारा नायक ठरला होता. त्याने जरी अत्यंत शौर्य दाखवले असले, तरी त्याचे कौतुक करण्यास त्यांना अडचण वाटली. त्याचे नाव कॅप्टन ‘स्मिथ’ किंवा ‘सलीम’ असते, तर त्यांनी नक्कीच त्याच्या शौर्याचे भरपूर कौतुक केले असते. केवळ मतपेटीच्या राजकारणामुळे अनेकजण कॅप्टन मच्छार यांच्याकडे दुर्लक्ष करत आहेत. तसेच पाश्चात्त्य माध्यमांना भारतीयाच्या शौर्याविषयी बोलणे पसंत नाही. ते त्याचे महत्त्व कमी करून सांगतात. पण, वास्तवात त्या परिस्थितीत जोखीम घेऊन पुढे येणे आणि शौर्य दाखवणे, हे सहज कोणीही करू शकत नाही.
इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू, सौदी अरब आणि ‘यूएई’च्या राजकीय नेतृत्वाने, रुग्णालयात जाऊन कॅप्टन स्मित यांचे कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही, व्हिडिओ कॉलद्वारे कॅप्टन स्मित यांच्याशी संवाद साधला. तरीही, अनेक भारतीय आणि पाश्चात्त्य माध्यमांमधील मोठी वृत्तपत्रे व दूरचित्रवाणी वाहिन्यांनी, या घटनेकडे आजही पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. यामागील कारणे काय असतील, याचा वाचकांनी स्वतःच निष्कर्ष काढावा.