काँग्रेसचा एसआयआरला विरोध म्हणजे नाचता येईना, अंगण वाकडे; केशव उपाध्ये यांची टीका

    10-Oct-2026   
 
 
Keshav Upadhye on SIR
 
मुंबई (Keshav Upadhye on SIR): काँग्रेसचा एसआयआरला विरोध म्हणजे नाचता येईना, अंगण वाकडे, खोट्या नॅरेटिव्हचा नवा अध्याय आहे, अशी टीका भाजप उपाध्यक्ष केशव उपाध्ये यांनी केली. आपल्या 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत त्यांनी एसआयआर विरोधात सुरु असलेल्या काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या आंदोलनावर निशाणा साधला.
 
केशव उपाध्ये म्हणाले की, "कधी काळी १९५१ मध्ये ४५ टक्के असणारा काँग्रेसचा मतटक्का आता २१ टक्क्यांपर्यंत खाली घसरला आणि त्यातून काँग्रेसची एसआयआरविरोधी आरडाओरड सुरू झाली. एकीकडे इतिहास विसरायचा आणि दुसरीकडे जनतेची दिशाभूल करायची, हा काँग्रेसचा दुटप्पीपणा आहे." (Keshav Upadhye on SIR)
 
९ एसआयआर प्रक्रियेदरम्यान ७ वेळा काँग्रेस सत्तेत
 
"देशात आजवर नऊ वेळा एसआयआर प्रक्रिया झाली. त्यापैकी सात वेळा काँग्रेस सत्तेत होती. एवढेच नव्हे, तर अटलजी पंतप्रधान असताना सुरू झालेली एसआयआर प्रक्रिया मनमोहन सिंग पंतप्रधान झाल्यानंतर पूर्ण झाली. मग त्यावेळी एसआयआर योग्य आणि आज मात्र त्याला विरोध कशासाठी? सोयीचे राजकारण करण्यासाठी? एसआयआर प्रक्रियेत सहभागी व्हायचे आणि नंतर त्याच प्रक्रियेविरोधात गदारोळ करायचा. सध्याच्या एसआयआर प्रक्रियेत काँग्रेससह विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मिळून ३६ लाख बीएलए-२ म्हणून काम केले. प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी असताना तिच्याबाबत संशयाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न कशासाठी?" असा सवाल त्यांना केला. (Keshav Upadhye on SIR)
 
ते पुढे म्हणाले की, "१४ कोटी मतदारांची नावे वगळल्याचा आरोप करून जनतेत संभ्रम निर्माण केला जात आहे. प्रत्यक्षात या आकडेवारीमागील कारणे समजून घेणे आवश्यक आहे. यामध्ये २.८९ कोटी मतदार मृत झाल्याचे, तर १.०१ कोटी नोंदी दुबार असल्याचे सांगितले जाते. उर्वरित मतदारांच्या बाबतीत बीएलओ वारंवार गेले, मात्र संबंधित मतदारांकडून फॉर्म भरले गेले नाहीत, असा दावा केला जात आहे. महत्त्वाचे म्हणजे, नियमानुसार पात्र मतदारांना फॉर्म-६ भरून मतदारयादीत नाव समाविष्ट करण्याची संधी उपलब्ध आहे. मग ही वस्तुस्थिती जनतेसमोर मांडण्याऐवजी भीती आणि संभ्रमाचे राजकारण कशासाठी?" (Keshav Upadhye on SIR)
 
फॉर्म-७ च्या मुद्द्यावरून राजकीय गदारोळ
 
"फॉर्म-७ च्या माध्यमातून नाव वगळण्याबाबत आक्षेप घेतले जात असताना, संबंधित आकडेवारी आणि प्रत्येक आक्षेपाची पडताळणी होणे आवश्यक आहे. सुमारे ९ लाख बूथवर विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी आक्षेप नोंदविल्याचा दावा केला जात आहे. मात्र, आक्षेप नोंदविणे आणि बेकायदेशीरपणे नावे वगळली जाणे या दोन वेगळ्या बाबी आहेत. मतदारयादी शुद्धीकरणाच्या प्रक्रियेला विरोध करून लोकशाही मजबूत होत नाही, उलट पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित होतात. जनतेचा विश्वास संपादन करण्यात अपयश आले की, व्यवस्थेवर आरोप करायचे, पराभवाची कारणे शोधण्याऐवजी नवनवे नॅरेटिव्ह उभे करायचे आणि स्वतःच्या राजकीय अपयशाचे खापर दुसऱ्यांवर फोडायचे या काँग्रेसच्या राजकारणाला जनता ओळखते. काँग्रेसने आधी स्वतःच्या घसरत्या जनाधाराचे आत्मपरीक्षण करावे. प्रत्येक संस्थेवर संशय घेऊन आणि एसआयआर विरोधात आरडाओरड करून जनतेचा विश्वास परत मिळणार नाही," असेही केशव उपाध्ये म्हणाले. (Keshav Upadhye on SIR)
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर