स्त्रीशक्तीची ‘मनीषा’पूर्ती

    10-Oct-2026
Dr Manisha Shete Woman Priest
 
समाजप्रवाहाच्या विरोधात जात, पौरोहित्यासारख्या ‘पुरुषांच्या क्षेत्रा’त आपले स्थान निर्माण करून, जर्मनी-दुबईपर्यंत झेप घेणार्‍या पुरोहिता डॉ. मनीषा शेटे यांच्याविषयी...
 
ज्या देशातील नागरिकांनी एका स्त्रीला ‘राष्ट्रपती’ म्हणून स्वीकारले आहे, त्या देशातली स्त्री केवळ दुहिता किंवा अबला असू शकते का? ‘इस्रो’मधील मुलींचे कौशल्य, राजकारणातील स्त्रियांचे स्थान, क्रीडाक्षेत्रातील मुलींचे उज्ज्वल यश, अशा असंख्य गोष्टींचा विचार केल्यास; तर भारतीय संस्कृतीत स्त्रियांना दुय्यम दर्जा नसून, त्यांना समसमानच वागणूकच दिली जात असल्याचे आपल्याला दिसते. ‘पुरुषांचे क्षेत्र’ असणार्‍या क्रिकेट आणि सैन्यातही, आता भारतीय महिलांनी ‘तिरंग्या’ला मानाचे स्थान मिळवून दिले आहे. पण, आजही ‘पुरुषांचे’ म्हटले जाणारे असे एक क्षेत्र आहे; ते म्हणजे ‘पौरोहित्य’!
 
‘हल्ली काहीही ‘फॅड’ निघतात’, ‘स्त्री-पुरुषांमध्ये विधात्यानेच फरक केला असताना, आज-कालच्या स्त्रियांना समानता का हवीय?’ असे असंख्य कुत्सित स्वर कानी पडत असतानाच, वैदिक काळातील गार्गी, मैत्रेयी इत्यादी स्त्रीपुरोहिता असलेल्या सनातन आर्य संस्कृतीपासून, कालौघात ‘चूल आणि मूल’पर्यंत पोहोचलेले बंदिस्त जीवनाचा सारासार विचार मूळ शास्त्रासह समजावून सांगणार्‍या रा. स्व. संघाचे समर्पित कार्यकर्ते प्रा. यशवंतराव लेले यांची भेट घडली आणि डॉ. मनीषा शेटे यांच्या जीवनाला खर्‍या अर्थाने वाट सापडली. लेले गुरुजींच्या मार्गदर्शन आणि आशीर्वादाने, स्त्रीपुरोहिता डॉ. मनीषा शेटे हे नाव आज संपूर्ण भारतासह विदेशांतही पोहोचले आहे.
 
मनीषा मुळे या यांचे बालपण पुण्यातले. ‘हुजुरपागा’ शाळेत त्यांचे शिक्षण झाले. लहानपणापासून त्यांना विविध कलांची आवड. तसेच भाषाप्रेमामुळेच, हिंदी भाषेत ‘पंडित’ पदवीही मिळवली. मध्यमवर्गीय घरातील मनीषा यांनी कलांची आवड असतानाही, तत्कालीन समाजाधारणेनुसार सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेतूनच पदवीचे शिक्षण घेतले. त्यानंतर लगेचच त्यांचे वैवाहिक जीवन सुरू झाले.
 
अतिशय सामान्य जीवन जगणार्‍या मनीषा यांच्या यजमानांनी, त्यांच्या गुणवत्ता आणि क्षमता पारखून त्यांना ‘भारतविद्या शाखे’चे (इंडोलॉजीचे) शिक्षण घेण्यास प्रोत्साहन दिले. याच अभ्यासाने मनीषा यांना जीवनाचे गमक गवसले. त्यांच्या आवडीचे कला, इतिहास, समाज आणि संस्कृती हे सर्वच विषय त्यांना अभ्यासता आले. उत्तम यश मिळवत, त्या पुण्यातीलच ‘ज्ञानप्रबोधिनी’मध्ये ‘संत्रिका’ विभागात, संशोधनकार्यासाठी रुजू झाल्या. ‘ज्ञानप्रबोधिनी’चे संस्थापक सदस्य प्रा. यशवंतराव लेले यांच्या मार्गदर्शनाखाली ‘यजुर्वेदा’तील राष्ट्रदर्शन, ‘तुकारामगाथे’तील सामाजिक परिस्थिती अशा नवनव्या विषयांवर संशोधन करत, मनीषा यांनी इंग्लंडपर्यंत झेप घेतली. यातूनच त्यांना ‘पीएचडी’चीही संधी मिळाली.
 
तरीही, ‘स्त्री घराबाहेर पडली की, संसार उघड्यावर पडतो’ या लोकोक्तीला छेद देत, मनीषा यांनी गृहस्थी धर्मासाठी काहीकाळ अल्पविराम घेतला. नंतर २००६ साली, नव्या जोमाने पुन्हा त्या आपल्या कार्यात रुजू झाल्या. संशोधनादरम्यान, शेजारच्या कक्षातील पौरोहित्याच्या वर्गांकडे मनीषा यांचे मन नेहमी धाव घेई. याच उत्सुकतेपोटी त्यांनी पौरोहित्याचे शिक्षण घेतले. याच दरम्यान त्यांनी ‘पीएचडी’ही पूर्ण केली. शिवय, पौरोहित्याचाही सराव सुरू केला. ‘ज्ञानप्रबोधिनी’त एक संशोधिका, विद्यार्थिनी म्हणून सुरू झालेला डॉ. मनीषा यांचा प्रवास ‘पौरोहित्य विभाग समन्वयक’ म्हणून काही वर्षे सेवा बजावत, आज ‘विभागप्रमुखा’पर्यंत येऊन पोहोचला आहे.
 
"पौरोहित्य फक्त पुरुषांनीच करावे, असे शास्त्रात लिहिले नसल्याने ते स्त्री-पुरुष दोहोंनी करणेच अध्याहृत असले पाहिजे. मधल्या काळात झालेल्या परकीय आक्रमणांमुळे, स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी त्यांच्यावर काही बंधने घालण्यात आली. त्यांपैकीच एक हेही असावे. त्याचबरोबर अपाला, घोषा, सूर्या, शची, गोधा, अदिती, विश्ववारा, अत्रेयी या स्त्रियांच्या रचना जर ‘ऋग्वेदा’त असतील; तर मंत्रोच्चाराने स्त्रियांच्या शरीरावर विपरीत परिणाम होतो, हे निव्वळ अशास्त्रीयच म्हणावे लागेल,” असे डॉ. मनीषा सांगतात. आजही कित्येक घरांतील पूजा स्त्रीच करते, मुलांवर संस्कार आईच करते. मग, स्त्रीने हे १६ संस्कार आणि अन्य काही पूजाविधी का करू नयेत? ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः| यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफलाः क्रियाः॥’ असे शास्त्र सांगत असताना, स्त्रियांना निषिद्ध केल्यास तुमचे ईप्सित साध्य होईल का?
 
पण, आज परिस्थिती हळूहळू बदलत आहे. डॉ. मनीषा यांच्या विद्यार्थ्यांमध्ये, ७० टक्क्यांपेक्षा अधिक महिलाच आहेत. दिवसेंदिवस हे प्रमाण वाढते आहे. ‘पुरुष गुरुजी असताना, तुम्ही हे काम का करता?’, ‘तुमच्याऐवजी दुसरं कोणी उपलब्ध नाही का?’ अशा असंख्य प्रश्नांना सामोरे जात प्रवास सुरू केलेल्या डॉ. मनीषा यांना, आज जेव्हा ‘आम्हाला महिला पुरोहितच हवीय’ असे सांगितले जाते, तेव्हा त्यांना समाधान मिळते. आज समाजात स्त्रीपुरोहितांनाही मानाची वागणूक मिळत असून, अजिबात बढेजाव न करता, अतिशय साध्या वेशात वावरणार्‍या त्या अनेक कुटुंबांच्या जणू ‘फॅमिली पुरोहित’च झाल्या आहेत. स्त्रीला जर संधी लाभली तर ती नक्कीच त्याचे सोने करते, याचेच मूर्तिमंत उदाहरण असलेल्या डॉ. मनीषा शेटे या स्त्रीशक्तीला त्रिवार वंदन!
 
ओवी लेले
९८६९३४५७५३




संबंधित मजकूर