बॉलीवूडमध्ये ‘फ्रेंचायझी’ चित्रपटांचा बोलबाला!

    10-Oct-2026
Bollywood Franchise Movies 2026
 
यंदाच्या वर्षात अनेक ‘फ्रेंचायझी’ चित्रपट प्रदर्शित झाले. काहींनी छप्परफाड कमाई केली, तर काहींना सरासरी यश मिळाले. ‘फ्रेंचायझी’ चित्रपट असणे, हे यशाची हमी देत नाही. परंतु, आकडेवारीवरून असे दिसून येते की, ‘फ्रेंचायझी’मुळे चित्रपटांना सुरुवातीचा फायदा मिळतोय; पण सुरुवातीला जी वातावरणनिर्मिती होते, ती नंतर तो चित्रपट कसा आहे, यावर टिकून राहते. एकूणच, या सगळ्या गोष्टींचा घेतलेला हा आढावा...
 
२०२६ हे वर्ष संपायला आता उरले उणेपुरे तीन महिने. पण, या वर्षभरात प्रदर्शित झालेल्या अनेक ‘सिक्वेल’ आणि ‘फ्रेंचायझी’ चित्रपटांनी बॉस ऑफीसवर दमदार कामगिरी केली आहे. तथापि, काही चित्रपट सरासरी होते आणि एक चित्रपट तर ‘फ्लॉप’ही झाला. याचा अर्थ असा की, ‘फ्रेंचायझी’ चित्रपट असणे, हे यशाची हमी देत नाही. परंतु, आकडेवारीवरून असे दिसून येते की, ‘फ्रेंचायझी’मुळे चित्रपटांना सुरुवातीचा फायदा मिळतोय; कारण चित्रपटनिर्माते प्रेक्षकांना आधीच माहीत असलेल्या कथा आणि पात्रांवर अधिकाधिक अवलंबून असल्यामुळे तेच सगळं पेरण्याचा प्रयत्न करतायेत. पण, सुरुवातीला जी वातावरणनिर्मिती होते, ती नंतर तो चित्रपट कसा आहे, यावर टिकून राहते.
 
२०२६ मध्ये आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या १२ प्रमुख ‘सिक्वेल’ आणि ‘फ्रेंचायझी’ चित्रपटांपैकी, सहा चित्रपट ‘हिट’ किंवा त्याहून अधिक यशस्वी ठरले. दोन चित्रपट अर्ध-यशस्वी ठरले. तीन चित्रपट सरासरी होते. केवळ एक चित्रपट ‘फ्लॉप’ झाला. या यादीत ‘दृश्यम ३’, ‘बॉर्डर २’, ‘धुरंधर : द रिव्हेंज’, ‘धमाल ४’, ‘आवारापन २’ आणि ‘मिर्झापूर : द मुव्ही’ यांसारख्या ‘हिट’ चित्रपटांचा समावेश आहे. ‘द केरळ स्टोरी २’ आणि ‘वेलकम टू द जंगल’ यांनीही बॉस ऑफीसवर ‘सेमी-हिट’ कामगिरी केली. याउलट, ‘मर्दानी ३’, ‘पती पत्नी और वो दो’ आणि ‘कॉकटेल २’ यांनी सरासरी कामगिरी केली, तर ‘वध २’ बॉस ऑफीसवर ‘फ्लॉप’ ठरला. त्यामुळे चालू वर्षात ‘फ्रेंचायझी’ चित्रपटांचा बोलबाला दिसून आला.एकप्रकारे हे वर्ष चित्रपटसृष्टीसाठी आतापर्यंत दिलासादायक ठरले आहे. तसेच यामुळे असेही म्हणता येईल की, प्रेक्षक चित्रपटांपासून पूर्णपणे दूर झालेले नाहीत. मात्र, प्रत्येक चित्रपटासाठी ते चित्रपटगृहात जातीलच असेही नाही.
 
यावर्षीचे ‘फ्रेंचायझी’ चित्रपटाचे सर्वांत मोठे उदाहरण म्हणजे ‘धुरंधर : द रिव्हेंज.’ या चित्रपटाने एक हजार कोटींहून अधिक कमाई केली. या चित्रपटाचा पहिला भाग प्रेक्षकांमध्ये आधीच लोकप्रिय झाला होता. त्यामुळे साहजिकच दुसर्‍या भागासाठी, प्रेक्षकांना पात्रांची आणि कथेच्या जगाची पुन्हा ओळख करून देण्याची गरज नव्हती. ‘फ्रेंचायझी’ चित्रपटांचा हाच फायदा असतो की, प्रेक्षक ज्या जगात प्रवेश करत आहेत, ते त्यांना आधीच माहीत असते.‘दृश्यम ३’ हे त्याचं आणखीन एक उदाहरण. ‘दृश्यम’ ‘फ्रेंचायझी’ची लोकप्रियता या भागाला मिळालेल्या जबरदस्त यशाने दाखवून दिली. विजय साळगावकरचे पडद्यावरील पुनरागमन अजय देवगणसाठी फायदेशीर ठरले. कारण, या चित्रपटाने अवघ्या पाच दिवसांत आपल्या बजेटच्या जवळपास दुप्पट कमाई केली. इतकेच नाही, तर ‘दृश्यम ३’ हा भारतात २०० कोटी रुपयांची निव्वळ कमाई करणारा अजय देवगणच्या कारकिर्दीतील सर्वांत वेगवान चित्रपट ठरला. देशभरातील ८७ लाखांहून अधिक प्रेक्षकांनी अवघ्या पाच दिवसांत हा चित्रपट पाहिला, यावरून प्रेक्षकांचा उत्साह दिसून येतो. ‘बॉर्डर २’नेपण ‘फ्रेंचायझी’ चित्रपटांना मिळत असलेल्या लोकप्रियतेबद्दल दाखवून दिलं.
 
१९९७ मध्ये प्रदर्शित झालेला ‘बॉर्डर’ हा हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वांत अविस्मरणीय चित्रपटांपैकी एक. त्याचा ‘सिक्वेल’ जवळपास तीन दशकांनंतर आला. या चित्रपटाने ३४० कोटी रुपयांचं गल्ला जमविला. ही केवळ एका ‘सिक्वेल’ची कमाई नव्हती. यामागे पहिल्या चित्रपटाच्या आठवणी, देशभक्तीची भावना आणि सनी देओलची दीर्घ काळ टिकलेली प्रतिमा यांचाही आधार होता. ‘आवारापन २’ हे या ट्रेंडचे आणखी एक उदाहरण. पहिला चित्रपट प्रदर्शित होऊन अनेक वर्षे उलटली असली, तरी त्याच्या ‘सिक्वेल’बद्दलची चर्चा कायम आहे. गंमत म्हणजे, २००७ साली प्रदर्शित झालेला ‘अवारापन’ बॉस ऑफीसवर ‘फ्लॉप’ ठरला होता. काळानुरूप या चित्रपटाला कल्ट-लासिकचा दर्जा मिळाला. बरं, कुठलाही जास्त गाजावाजा न करता ‘आवारापन २’ प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाने भारतात १४६ कोटी कमाई केली आणि तो ‘ब्लॉकबस्टर’ ठरला. ‘धमाल ४’नेसुद्धा एक ‘कॉमेडी फ्रेंचायझी’ म्हणून आपल्या प्रतिष्ठेचा फायदा उचलला; १६४ कोटींची कमाई या चित्रपटाने केली आणि तो ‘हिट’ ठरला. अक्षय कुमारचा मल्टी स्टार आणि बिग बजेट ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटानेही बॉस ऑफीसवर तब्बल १७५ कोटींची कमाई करत या ‘फ्रेंचायझी’ची लोकप्रियता दाखवून दिली. ‘मिर्झापूर : द मुव्ही’ हे या ट्रेंडचे एक उत्तम उदाहरण. त्याची सर्वांत मोठी ताकद आधीपासून अस्तित्वात असलेला चित्रपट नसून, एक लोकप्रिय ‘ओटीटी फ्रेंचायझी’ होती. यावरून हे दिसून येते की, डिजिटल माध्यमावरील मजबूत प्रमोशनमुळे चाहतावर्ग चित्रपटगृहांपर्यंत आणला जाऊ शकतो. या संपूर्ण ‘ट्रेंड’ची दुसरी बाजूही आहे. जर केवळ वारसाच एखाद्या चित्रपटाला ‘हिट’ बनवू शकत असता, तर त्याचे प्रत्येक ‘सिक्वेल’ यशस्वी झाले असते, पण तसे नाही. ‘वध २’ हा चित्रपट ‘फ्लॉप’ झाला. ‘मर्दानी ३’, ‘पती पत्नी और वो दो’, ‘द केरळ स्टोरी २’ आणि ‘कॉकटेल २’ यांना सरासरी कामगिरीवर समाधान मानावे लागले. यावरून हे स्पष्ट होते की, ‘फ्रेंचायझी’ चित्रपटांना प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा फायदा होऊ शकतो. पण, त्यापलीकडे, चित्रपटाची कथा, सादरीकरण आणि प्रेक्षकांची प्रतिक्रिया यावरच त्याची कमाई अवलंबून असते.
 
एकूणच काय २०२६ हे वर्ष, ‘फ्रेंचायझी’ चित्रपटांसाठी उत्तम ठरल्यामुळे भविष्यातही अनेक निर्माते आता ही वाट धरण्याची शयता आहे. अनेक बड्या अभिनेत्यांनी त्यांच्या गाजलेल्या चित्रपटांची ‘सिक्वेल’ आणण्याची तयारी सुरू केली असून, लवकरच त्यांच्या औपचारिक घोषणाही होतील.
 
२०२६ मधील ‘फ्रेंचायझी’ चित्रपट
हिट - दृश्यम-३, मिर्झापूर द मूव्ही, धुरंधर-२, बॉर्डर-२, आवारापन-२, धमाल-४
सेमी हिट - वेलकम टू द जंगल, द केरळ स्टोरी २
सरासरी - कॉकटेल २, मर्दानी ३
फ्लॉप - वध २, पती पत्नी और वो दो
 
- कपिल देशपांडे




संबंधित मजकूर