आयोध्येच्या पावन भूमीत गेलेली व्यक्ती रामललाच्या दर्शनाला गेली नाही, असे चुकूनही होणे नाही. मात्र, अखिलेश यादव यास अपवाद ठरल्याचे दिसले. माजी मंत्री पवन पांडे यांच्या निवासस्थानी ‘श्रीमद्भागवत’ कथेला ते उपस्थित राहिले. परंतु, ज्या रामललांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून कोट्यवधी भाविक येतात, त्याच रामललांच्या चरणी नतमस्तक होण्याचे धाडस अखिलेश यादव दाखवू शकले नाहीत. अयोध्येत येऊनही प्रभू श्रीरामांचे दर्शन न घेता, माघारी फिरण्याच्या करंटेपणाने समाजवादी पक्षाचे ‘व्होटबँके’चे लाचार राजकारण पुन्हा एकदा उघडे पाडले. राममंदिरात जाऊन दर्शन घेतल्यास आपल्या विशिष्ट अल्पसंख्याक मतपेढीला धक्का बसेल आणि ती हातातून निसटेल, याच भीतीने त्यांना पछाडले असल्याचे दिसते. ज्या पक्षाचा इतिहासच कारसेवकांवरच्या रक्ताने माखला आहे, त्या पक्षाच्या नेत्यांमध्ये प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेण्याचे नैतिक धैर्य येईल तरी कुठून?
काही दिवसांपूर्वीच राम मंदिरातील दान अपहार प्रकरणावरून अखिलेश यादव व त्यांच्या पक्षाने, थेट मंदिर प्रशासनाला आणि सत्ताधारी भाजपकडून चालवल्या जाणार्या व्यवस्थेला लक्ष्य केले होते. राजकीय पोळ्या भाजण्यासाठी राम मंदिराच्या नावाने बोंबाबोंब करणार्या विरोधकांचे हे फुगे, तपासाअंती फुटलेच. चोरीचा मुख्य सूत्रधार मंदिर प्रशासनातील नसून बँकेचा कर्मचारी असल्याचेच उघडकीस आल्यावर, विरोधक पुरते तोंडघशी पडले आहेत. ज्या राम मंदिराच्या नावाने चिखलफेक केली, सत्य समोर आल्यानंतर तेथे साधे प्रायश्चित्त घेण्याचे किंवा रामललांच्या चरणी लीन होण्याचे सौजन्यही अखिलेश दाखवू शकले नाही. मंदिर प्रशासनावर बेछूट आरोप करायचे आणि सत्य समोर आल्यावर त्याच मंदिराकडे पाठ फिरवायची, ही कसली नीती? २०२७च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची नांदी आतापासूनच वाजली आहे. एका बाजूला अयोध्येत जाऊन धार्मिक कथेला हजेरी लावायची आणि दुसरीकडे रामललांचे दर्शन टाळून तुष्टीकरणाचा अजेंडा जपायचा, हा ‘स्टंट’ उत्तर प्रदेशातील सुजाण जनता उघड्या डोळ्यांनी पाहात आहे. श्रद्धेचा वापर केवळ राजकीय सोयीनुसार करणार्यांना आणि श्रीराम मंदिरासारख्या पवित्र विषयावर चिखलफेक करणार्यांना, जनता २०२७च्या निवडणुकीत मतांच्या माध्यमातूनही चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही.
धुंदीत हरवलेले सत्य...
वैयक्तिक आदरातिथ्य, चमकधमक आणि सेलिब्रिटी म्हणून मिळणारा पाहुणचार याच्या धुंदीत, अनेकदा देशापुढील भीषण वास्तव झाकले जाते. गायक मिका सिंह याने नुकत्याच एका ‘पॉडकास्ट’मध्ये व्यक्त केलेले विचार, याच मानसिकतेचे ज्वलंत उदाहरण ठरावे. ‘पाकिस्तानी मुसलमान खूप चांगले असून, ते गुरुद्वारांची मनापासून स्वच्छता आणि त्यांची देखभाल करतात,’ असा दावा मिका सिंहने केला. वास्तविक पाहता, मिका सिंहचा हा दावा पाकिस्तानातील शीख समुदायाच्या संघर्षाची चेष्टा करणाराच. पाकिस्तानात ‘ननकाना साहिब’, ‘करतारपूर साहिब’ आणि ‘पंजा साहिब’ यांसारखी शीख धर्माची अत्यंत पवित्र स्थळे आहेत. मात्र, पाकिस्तान सरकार किंवा जनता शीख समुदायाला कशी वागणूक देते, याकडे पाहणेही महत्त्वाचे.
पाकिस्तान संसदेच्या अल्पसंख्याक समितीच्या आकडेवारीनुसार, पाकिस्तानात ५३२ गुरुद्वारे असले; तरी केवळ ३७ गुरुद्वारेच कार्यरत आहेत! उर्वरित ४९५ गुरुद्वारांचे काय झाले? लाहोर जिल्ह्यातील ४२ ऐतिहासिक गुरुद्वारांपैकी, फक्त पाच वापरात आहेत. १४ गुरुद्वारांवर मुसलमानांचा अनधिकृत ताबा आहे. तर आठ भग्नावस्थेत असून, १४ गुरुद्वारांच्या जागी नवीन इमारतींची उभारणी झाली आहे. मिका सिंहने दाखला दिलेल्या ‘ननकाना साहिब’वरच, जानेवारी २०२०मध्ये झालेली दगडफेक जगाने पाहिली. जून २०२६ मध्ये १२५ वर्षे जुन्या ‘श्री गुरू सिंह सभा’ गुरुद्वाराचीही, एका स्थानिक व्यावसायिकाने परवानगी न घेता तोडफोड केली. ऑगस्ट २०२६ मध्ये क्वेट्टातील ऐतिहासिक ‘गुरुद्वारा श्री गुरू सिंह सभा’ची इमारतही, शिखांचा विरोध डावलून व्यापारी संकुलासाठी पाडण्यात आली. पाकिस्तान नेहमीच भारतातील काही कलाकारांचा वापर, स्वतःची डागाळलेली आंतरराष्ट्रीय प्रतिमा सुधारण्यासाठी करतो. जेव्हा एका कलाकाराला तिथे ‘गुरुद्वारा साफ करताना’ एखादी व्यक्ती दिसते, तेव्हा ती पाकिस्तानातील घटणार्या शीख लोकसंख्या, जबरदस्तीची धर्मांतरे आणि नष्ट केली जाणारी वारसास्थळे यांकडे सोयीस्करपणे डोळेझाक करते. पाकिस्तानातील उरल्यासुरल्या गुरुद्वारांची दूरवस्था आणि तिथल्या शीख-हिंदूंच्या अस्तित्वावर आलेले संकट हीच खरी वस्तुस्थिती आहे; मग मिका सिंहसारख्या कलाकारांना ती मान्य असो वा नसो!