‘बजरंग दला’ची ४२ वर्षांची ध्येययात्रा!

    10-Oct-2026
 
 Bajrang Dal 42 Years Journey
 
देव, देश आणि धर्माचे कार्य स्वत:च्या बाहुबलावर पूर्ण करण्यासाठी तत्पर असलेल्या तरुणांची वाहिनी सुरु करण्याच्या इराद्याने बीजारोपण केलेला ‘बजरंग दल’रुपी वृक्ष, आता ४२ वर्षांचा झाला. अहोरात्र झटणार्‍या बजरंगींच्या बाहुबलावर विश्वास ठेवून, असंख्य धर्मकार्य करणार्‍या ‘बजरंग दला’च्या प्रवासाचा आढावा घेणारा हा लेख...
 
ज्या ठिकाणी बजरंग दलाचा जन्म झाला आणि ज्या प्रारंभिक कार्यासाठी या संघटनेची निर्मिती झाली, त्या कार्याच्या पूर्ततेचा सुखद अनुभव मनात साठवूनच बजरंग दलाचे आठ माजी प्रमुख दि. २ एप्रिल रोजी अयोध्याधाम येथे पोहोचले होते. तेथेच पूजाअर्चा केल्यावर त्यांनी, श्रीराम जन्मभूमी मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या आपले आराध्य दैवत बजरंगबली यांच्या मंदिरावर सामूहिकरीत्या ध्वजारोहण केले. हे दृश्य त्या सर्व योद्ध्यांच्या डोळ्यांत कृतज्ञतेचे अश्रू आणणारेच ठरले.
 
१९८४ मध्ये विश्व हिंदू परिषदेने, अयोध्येत ‘श्रीराम-जानकी रथयात्रा’ काढली. मात्र, तत्कालीन सरकारने या यात्रेला सुरक्षा पुरविण्यास नकार दिला. त्यानंतर पूजनीय संत आणि श्रद्धेय अशोक सिंहलजी यांना श्रीरामाचे हे कार्य स्वतःच्या बाहुबलाच्या जोरावर पूर्ण करू शकेल, अशा युवकांच्या एका संघटित वाहिनीची आवश्यकता जाणवली. रथयात्रेच्या सुरक्षेसाठी त्यांनी, हिंदू युवकांची एक संघटितशक्ती उभी केली. या संघटनेला ‘बजरंग दल’ असे नाव देण्यात आले. पुढे विश्व हिंदू परिषदेच्या या युवा संघटनेवर, श्रीराम मंदिर आंदोलनाला गती देण्याची आणि देशभरातील हिंदू युवकांना संघटित करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली.
 
प्रारंभी बजरंग दलाची धुरा विनय कटियार यांच्याकडे सोपविण्यात आली. त्यांच्यानंतर अनुक्रमे जयभान सिंह पवैया (ग्वाल्हेर, मध्य प्रदेश), डॉ. सुरेंद्र कुमार जैन (रोहतक, हरियाणा), प्रकाश शर्मा (कानपूर, उत्तर प्रदेश), सुभाष चौहान (कंधमाल, ओडिशा), राजेश पांडे (रीवा, मध्य प्रदेश), मनोज वर्मा (कन्नौज, उत्तर प्रदेश), सोहन सिंह (धार, मध्य प्रदेश) आणि नीरज दोनेरिया (आग्रा, उत्तर प्रदेश) यांनी, बजरंग दलाचे ‘राष्ट्रीय संयोजक’ म्हणून जबाबदारी सांभाळली. आज बजरंग दलाने ४२ वर्षांचा टप्पा पूर्ण केला असतानाच, या संघटनेची धुरा राजस्थानातील पाली इथल्या ४१ वर्षीय किशन प्रजापत यांच्या हाती आहे.
 
‘सेवा, सुरक्षा आणि संस्कार’ हे ध्येयवाय घेऊनच, बजरंग दल कार्यरत आहे. देशभरातील युवकांमध्ये राष्ट्र, धर्म, संस्कृती आणि संस्कारांची जोपासना करण्याबरोबरच शौर्य, सुरक्षा आणि स्वावलंबनाची भावना विकसित करण्यासाठीही संघटना सातत्याने सक्रिय आहे. देशाच्या कोणत्याही भागात ‘लव्ह जिहाद’, अवैध धर्मांतरण, गोहत्या, जिहादी दहशतवाद किंवा हिंदू श्रद्धेवरील आघाताचा विषय असो अथवा सामाजिक समरसता, धार्मिक यात्रा, तीर्थक्षेत्रे, मठ-मंदिरे, पूजनीय संत, मातृशक्ती, गोमाता आणि भारतमातेच्या सुरक्षेचा प्रश्न असो; बजरंग दल सदैव कटिबद्धतेने उभे असल्याचे दिसते.
 
सेवाकार्य : दरवर्षी लाखो युनिट रक्तदान, वृक्षारोपण, मंदिरांची स्वच्छता, तीर्थक्षेत्रांतील व्यवस्था व सुरक्षा, आजारी गायी आणि गरजू रुग्णांसाठी रुग्णवाहिकासेवा, तसेच अपघात, नैसर्गिक आपत्ती आणि महामारीच्या काळात तातडीने मदतकार्य अशा विविध सेवा, बजरंग दलाचे कार्यकर्ते निःस्वार्थ भावनेने करतात. युवकांना शारीरिकदृष्ट्या सुदृढ बनविण्यासाठी दररोज बलोपासना केंद्रे चालविणे; भक्तीतून शक्ती आणि शौर्याची प्रेरणा मिळवण्यासाठी साप्ताहिक ‘हनुमान चालीसा’ पठणाचे आयोजन करणे, तसेच विद्यार्थ्यांमध्ये संस्कार आणि मूल्यशिक्षण रुजविणे, अशी अनेक कार्येही संघटनेच्या माध्यमातून होतात. आतापर्यंत लाखो गोमातांची कसाईखान्यांकडे होणारी रवानगी रोखण्यात आल्याचा, तसेच ‘लव्ह जिहाद’च्या घटनांमधून हजारो भगिनींची सुटका केल्याची नोंद संघटनेकडे आहे. मंदिरे आणि संतांवरील आघातांबरोबरच देश, धर्म आणि संस्कृतीवर होणार्‍या कोणत्याही हल्ल्याला, बजरंग दलाने नेहमीच ठामपणे प्रत्युत्तर दिले आहे.
 
आपल्या ४२ वर्षांच्या वाटचालीत विश्व हिंदू परिषदेच्या या युवा संघटनेने, समाजाच्या सहभागातून अनेक जनजागरण अभियानांचे आयोजन केले. कालांतराने या अभियानांनी जागतिक स्तरावरही नोंद घेण्याजोगे विक्रमही प्रस्थापित केल्याचे, संघटनेकडून सांगण्यात येते. १९८४ मध्ये युवकांच्या सहभागातून सुरू झालेल्या ‘श्रीराम जन्मभूमी मुक्ती’ आंदोलनाने, देशातील लाखो गावांमधील ६५ कोटी लोकांना जोडले. रस्त्यापासून संसदेपर्यंत आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत आपला आवाज बुलंद करत, ४९६ वर्षांच्या संघर्षानंतर देशाच्या स्वाभिमानाचे पुनर्जागरण घडवून आणण्यात आले. अखेर दि. २२ जानेवारी २०२४ रोजी, अयोध्येत प्रभू श्रीरामललांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली आणि या ऐतिहासिक दिवसाची सुवर्णाक्षरांनी नोंद झाली.
 
जिहादी दहशतवादाला आव्हान : १९९५ मध्ये दहशतवाद्यांनी अमरनाथ यात्रेला धमकी देत, ही यात्रा बंद पाडण्याचा इशारा दिला होता. यात्रेला येणारा कोणीही परत जाणार नाही, अशीच धमकी त्यांनी दिली होती. त्यावेळी बजरंग दलाच्या आवाहनाला प्रतिसाद देत, ५१ हजार बजरंगी आणि अन्य एक लाख शिवभक्तांनी ‘जय भोले’चा जयघोष करत, दुर्गम अमरनाथ यात्रेच्या दिशेने कूच केले. त्यानंतर ही यात्रा रोखण्याचे धाडस कोणीही करू शकले नाही.
 
पुंछ जिल्ह्यातील सीमावर्ती भाग हिंदूविहीन करण्याच्या जिहादी कटाची चाहूल घेत, बजरंग दलाने २००५ मध्ये ‘बाबा बुढा अमरनाथ यात्रे’ला पुन्हा प्रारंभ करून दिला. त्यामुळे या भागातून हिंदूंचे पलायन थांबण्यास मदत झाली, तसेच समाज आणि सुरक्षा दलांचे मनोबलही वाढले. याशिवाय, मेवातमधील ‘नल्हड महादेव यात्रा’, कर्नाटकातील ‘दत्तपीठ यात्रा’ आणि अयोध्येपासून जनकपूरपर्यंत निघणारी ‘श्रीराम-जानकी विवाह वरात यात्रा’ अशा उपक्रमांतूनही, सामाजिक समरसता आणि एकात्मतेची भावना जागृत केली जात आहे.
 
श्रीरामसेतूचे रक्षण : प्रभू श्रीरामांच्या आदेशानुसार, नल आणि नील यांनी बांधलेल्या श्रीरामसेतूचे तत्कालीन सरकारच्या कथित हस्तक्षेपापासून रक्षण करण्यासाठी, विश्व हिंदू परिषदेने मोठे जनआंदोलन उभारले होते. तत्कालीन केंद्र सरकारने, सर्वोच्च न्यायालयात प्रभू श्रीरामांच्या अस्तित्वाबाबतच प्रश्न उपस्थित केल्याचा आरोपही करण्यात आला. त्यावेळी देशभरात अवघ्या चार तासांचे यशस्वी ‘चक्काजाम’ आंदोलन करण्यात आले. परिणामी, सरकारला त्याच दिवशी नमते घ्यावे लागले. दिल्लीतील सुवर्ण जयंती पार्क येथे जमलेल्या लाखो रामभक्तांच्या जनसागरापुढे, सरकारचा हट्ट टिकू शकला नाही.
 
१९८४ पासून आजपर्यंत बजरंग दलाने देश, धर्म, संस्कृती आणि राष्ट्राच्या रक्षणासाठी नेहमीच अग्रभागी राहून भूमिका बजावली आहे. ‘सेवा, सुरक्षा आणि संस्कार’ हा मूलमंत्र घेऊन संस्कृत भाषा, वेद पाठशाळा आणि संस्कारांचे संवर्धन करण्यासाठीही संघटनेने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. मात्र, धर्मांतर, ‘लव्ह जिहाद’, गोहत्या, जिहादी दहशतवाद, धार्मिकस्थळांची सुरक्षा, संस्कृती आणि संस्कारांचा र्‍हास, परकीय घुसखोरी, तसेच लोकसंख्येतील असमतोल यांसारखी अनेक आव्हाने आजही समाजासमोर उभी आहेत. या आव्हानांचा मुकाबला करून, हिंदू समाजाला त्यांपासून मुक्त करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याची भूमिका संघटनेकडून मांडली जाते.
 
विनोद बन्सल
(लेखक विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत.)




संबंधित मजकूर