मुंबई (Women Farmers Conference Delhi) : भारतीय किसान संघाच्या अखिल भारतीय महिला किसान कार्यकर्ता संमेलनाचे आयोजन दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते गो-पूजन, भगवान बलराम पूजन आणि ध्वजारोहण केल्यानंतर ‘हम भारत की नारियां वैभव लाएंगी’ या उद्घोषाने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. देशभरातील सर्व प्रांत तसेच गावांमधून हजारोंच्या संख्येने महिला शेतकरी या संमेलनात सहभागी झाल्या. (Women Farmers Conference Delhi)
उद्घाटन सत्रात प्रमुख अतिथी आणि कोटा कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. विमला डूँकवाल यांनी सांगितले की, भारतीय नारीशक्ती सृजन आणि संवर्धनाचे कार्य एकाच वेळी करण्यास सक्षम आहे. नारी ही अन्नपूर्णा आणि दुर्गेचे स्वरूप असून, अधिकारांपेक्षा आधी आपल्या कर्तव्यांचा विचार करणारी शक्ती आहे. (Women Farmers Conference Delhi)
अखिल भारतीय महिला संयोजिका मंजू दीक्षित यांनी संमेलनाची भूमिका मांडताना सांगितले की, भारतातील महिला शेतकऱ्यांकडे पाहण्याच्या पारंपरिक दृष्टिकोनात बदल करण्याची गरज आहे. आज महिला शेतकरी आधुनिक तंत्रज्ञान आणि नव्या ऊर्जेच्या साहाय्याने कुटुंब तसेच देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. या सत्राला अखिल भारतीय अध्यक्ष के. साई रेड्डी, अखिल भारतीय उपाध्यक्ष श्रीमती सुशीला विश्नोई आणि मंत्री वीना सतीश यांनीही संबोधित केले. (Women Farmers Conference Delhi)
समारोप सत्रात अखिल भारतीय महामंत्री मोहिनी मोहन मिश्रा यांनी सांगितले की, २०४७ मधील विकसित आणि निरोगी भारताचे स्वप्न ‘गौ-कृषि-वाणिज्यम्’ आणि सेंद्रिय शेतीशिवाय साकार होऊ शकत नाही. त्यांनी सरकारला विषमुक्त शेती, रोगमुक्त समाज आणि अमृत आहारावर आधारित धोरण तयार करण्याचे आवाहन केले. अखिल भारतीय संघटन मंत्री दिनेश कुलकर्णी यांनी सांगितले की, स्वावलंबी आणि आत्मनिर्भर महिला शेतकऱ्यांना प्रतिष्ठा मिळाल्यास गाव, समाज आणि कुटुंबाचा गौरव आपोआप वाढेल. या प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय संपर्क प्रमुख रामलालजी, राष्ट्र सेविका समितीच्या अखिल भारतीय सह-संपर्क प्रमुख ऋतु शर्मा यांच्यासह भारतीय किसान संघाचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. (Women Farmers Conference Delhi)
विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला शेतकऱ्यांचा सन्मान
संमेलनासाठी देशभरातून प्राप्त झालेल्या प्रवेशिकांमधून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
गौ-कृषि-वाणिज्यम् – सुनंदा सायसिंग (महाराष्ट्र)
सेंद्रिय शेती – दीपाली ओरांव (पश्चिम बंगाल)
बियाणे संवर्धन – कमला बेन (गुजरात)
पशुपालन – अंबा कालिंधी आणि श्रीमती पंपा गराई (पश्चिम बंगाल)
रोजगारनिर्मिती – पुष्पा सिंह (बिहार)
अन्नप्रक्रिया – माया सिन्हा महापात्रा (ओडिशा), सुलता चटर्जी आणि शुक्ला बैरागी (पश्चिम बंगाल)
इंदिरा गांधी स्टेडियममध्ये ‘विविधतेत एकता’चे दर्शन
संमेलनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या महिला शेतकरी आपल्या-आपल्या प्रांतांच्या पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या दिसत होत्या. महिलांनी विविध भारतीय भाषांमध्ये लोकगीते सादर केली तसेच सांस्कृतिक नृत्यांचे सादरीकरण केले. या माध्यमातून भारताची सांस्कृतिक समृद्धी आणि ‘विविधतेत एकता’चे मनोहारी दर्शन घडले. या संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे सहभागी होण्यासाठी आलेल्या महिला शेतकरी कोणत्याही मदतीवर अवलंबून न राहता स्वतःच्या तिकिटाचा आणि प्रवासाचा खर्च करून दिल्लीला पोहोचल्या. विविध सत्रांमध्ये त्यांनी कृषी क्षेत्रासमोरील आव्हानांवर मोकळेपणाने चर्चा केली आणि या समस्यांकडे सरकारने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी केली. (Women Farmers Conference Delhi)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक