‘ती’ परंपरा का मोडली?

    01-Oct-2026   
Vikhroli Parksite Ganesh Visarjan Controversy
 
गेली ६५ वर्षे विक्रोळी पार्कसाईट येथे अग्निशमन दल हे गणेश विसर्जनाच्या दिवशी बाप्पांना सायरन वाजवून मानवंदना द्यायचे. मात्र, यावर्षी अग्निशमन दलाने मानवंदना दिली नाही. मनसेचे स्थानिक पदाधिकारी गणेश चुक्कल यांनी आरोप केला की, "उबाठाचे स्थानिक कार्यकर्ते इम्रान शेख यांच्या दबावामुळेच अग्निशमन दलाने ही मानवंदना दिली नाही. इम्रान यांची आई उबाठा या पक्षाची स्थानिक नगरसेविका आहे.” अर्थात, यात तथ्य आणि सत्य काय आहे, हे बाहेर येईलच. पण, दि. ४ ऑक्टोबर रोजी मनसे आणि उबाठा यांचा संयुक्त मोर्चा आहे. या पार्श्वभूमीवर वस्तीपातळीवर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचे काय सुरू आहे? पण, याचे सोयरसुतक दोन्ही ठाकरे बंधूंना असण्याचे काहीच कारण नाही. कारण, त्यांच्या मते कार्यकर्ता हा कधीच नेता होऊ शकत नाही. तो केवळ पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार काम करण्यासाठी आणि त्यामुळे काही त्रास होईल ते सहन करण्यासाठीच असतो. थोड्याबहुत फरकाने हे सर्वच पक्षात आहे म्हणा!
 
याअनुषंगाने विक्रोळी पार्कसाईट पुन्हा वादाच्या भोवर्‍यात सापडले. हा तोच परिसर आहे, जिथे काही महिन्यांपूर्वी मागासवर्गीय समाजाच्या एका अल्पवयीन गतिमंद मुलीवर बेकरीमध्ये काम करणार्‍या सलमानने जीवे मारण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केला होता. हा तोच परिसर आहे, जिथे कुठे काहीही घडले की, इथे कट्टरपंथी उन्माद करतात. वर्षानुवर्षे इथे ‘कौम’च्या व्यक्तीशिवाय इतर कोणतेही नेतृत्व उभे राहिले नाही. कारण, एकगठ्ठा मतदान कोणाला करायचे, हा शहाणपणा ‘कौम’ला आहे. या परिप्रेक्ष्यात इतर समाजाचे तर सतराशेसाठ वाटे. मुद्दा आहे की, अग्निशमन दलाने यावर्षी त्यांची परंपरा का तोडली? याचा पाठपुरावा करणे गरजेचे आहे. हा जरी जीवन-मरणाचा प्रश्न नसला, तरी समाजाचे डोळे उघडण्यासाठी हे महत्त्वाचे आहे. या परिप्रेक्ष्यात मनसेने केलेले आरोप खरे असतील, तर उबाठा पक्षाची यावर काय भूमिका आहे? अर्थात, त्यांच्या नवमतदारांच्या लांगूलचालनासाठी ते गप्पच बसतील. दुसरीकडे हिंदूंच्या सण-परंपरांना विरोध करायचा किंवा त्यांच्याशी स्पर्धा करायची, हे का सुरू आहे? ही अशी स्पर्धा करणार्‍यांनी हिंदूंच्या संस्कृती-जीवनमूल्यांशी पण स्पर्धा करावी.कट्टरतावाद सोडा; पण ते होणे नाही! त्यामुळेच तर पार्कसाईटची ही परंपरा यावर्षी खंडित झाली असेल का?
 
यांचे काय करायचे?
 
‘भारत जोडो’च्या नावाने यात्रा झाल्या, ‘छात्रों की गूंज’च्या नावाने तद्दन फालतू मिमिक्री करून झाली. मात्र, हाती ‘भोपळा’ आला. त्यामुळे भारतीय निवडणुकीत तोंडावर आपटलेल्या राहुल गांधी यांनी जणू ठरवले आहे की काय? की, "देखो भय्या, आपण सत्तेत नाही आहोत, म्हणून देशात अजिबात शांतता असता कामा नये. ‘ईव्हीएम’, संविधान, अगडा-पिछडा आणि आता मतचोरी हे मुद्दे काढत राहायचे. लोकांना काय, मीडियामध्ये आपण दहावेळा बोलताना दिसलो की, ते खरेच मानणार.” याच दृष्टिकोनातून सध्या सर्वत्र अस्थिरता माजवण्याचे प्रयत्न होताना दिसतात. तर, या राहुल गांधींची नक्कल करत आपल्या महाराष्ट्रातसुद्धा ठाकरे बंधू तेच करताना दिसत आहेत. समाजात, देशात अस्थिरता-गोंधळ माजवून सत्ता पलटवायची ही माओ-कम्युनिस्टांची पद्धत हे सगळे विरोधी पक्ष का वापरत आहेत?
 
या परिप्रेक्ष्यात महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी, तसेच शरद पवार यांचा मिळून असलेला अडीच वर्षांचा सत्ताकाळ आठवा. ‘कोरोना’मुळे जग थांबले, सत्ताधार्‍यांनी भ्रष्टाचार केले आणि लोक अक्षरशः किड्यामुंगीसारखे मेले. केंद्र सरकारने महाराष्ट्राची कमान सांभाळली. लोकसहभागातून राज्यात आणि देशात ‘कोरोना’ हरला. मात्र, या सगळ्या घडामोडीत सत्ताधारी उबाठा आणि काँग्रेस पक्षाविरोधात एक तरी मोर्चा किंवा आंदोलन झाल्याचे पाहिले का? ‘डफली गँग’ डफली वाजवत सत्ता पालटा, असे म्हणत केकाटताना दिसली का? नाही. कारण, त्यावेळी विरोधी पक्ष असलेल्या भाजपने सत्तेसाठी समाजाला अस्थिर करण्याचे कटकारस्थान केले नाही. कुणाला चिथावून किंवा उकसवून आंदोलन-मोर्चे काढण्याचे बळ दिले नाही. मात्र, या आयामात आता काय आहे? तर ठरावीक संघटनांचे आणि विरोधी पक्षाचे दररोज मोर्चे-आंदोलन आणि त्याद्वारे समाजाला, खास करून मुंबई शहराला वेठीस धरण्याचे काम सुरू आहे. मुंबई शहर स्वप्नांचे शहर आहे. पण, या असल्या आंदोलनजीवी आणि सत्तापिपासू राजकारण्यांमुळे मुंबईकरांना दररोज मनस्ताप सहन करावा लागत आहे. उठसूट ‘मुंबईला येऊ, आंदोलन करू’ म्हणणार्‍या या मोर्चे काढणार्‍यांचे काय करायचे?
 
९५९४९६९६३८




योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
संबंधित मजकूर