॥सौंदर्यलहरी भाष्य भाग ३७॥

    01-Oct-2026
 
 Saundarya Lahari Commentary
 
जपो जल्पः शिल्पं सकलमपि मुद्राविरचना
गतिः प्रादक्षिण्य-क्रमण-मशनाद्या हुति-विधिः|
प्रणामः संवेशः सुखमखिल-मात्मार्पण-दृशा
सपर्या पर्याय-स्तव भवतु यन्मे विलसितम्॥२७॥

अन्वय : हे भगवति! मे यत् विलसितम्, तत् अखिलम् आत्मार्पण-दृशा तव सपर्या-पर्यायः भवतु| जल्पः जपः (भवतु), सकलम् अपि शिल्पं मुद्राविरचना (भवतु), गतिः प्रादक्षिण्य-क्रमणम् (भवतु), अशनाद्याः आहुति-विधिः (भवतु), संवेशः प्रणामः (भवतु), सुखम् (अपि तव सपर्या-पर्यायः भवतु)|
 
शब्दार्थ : आदि शंकराचार्य या श्लोकात ईश्वरी उपासनेचे, एक अत्यंत वेगळेच स्वरूप आपल्यासमोर मांडतात. ते म्हणतात, हे भगवती! आत्मसमर्पणाच्या दृष्टीने माझ्याकडून जे जे घडते, ते सर्व तुझ्याच उपासनेचे विविध रूप होवो. माझे सामान्य बोलणे तुझा जप होवो; माझ्या हातून होणारी प्रत्येक क्रिया तुझ्या मुद्रांची रचना होवो; माझे चालणे तुझी प्रदक्षिणा होवो; भोजनादि क्रिया तुला दिलेली आहुती होवो; माझे शयन तुला केलेला प्रणाम होवो आणि मला प्राप्त होणारे सर्व सुखही तुझ्या सेवेचेच रूप होवो. हा श्लोक ज्ञानयोगाच्या सर्वोच्च लक्षणांपैकी एक मानता येतो.
 
‘जपो जल्पः’ या दोन शब्दांतच, या अवस्थेचे पहिले दर्शन घडते. मंत्राचा विधिपूर्वक उच्चार केला की, तो जप. दैनंदिन व्यवहारासाठीचे बोलणे म्हणजे जल्प. जप पवित्र, जल्प लौकिक; जप उपासना, जल्प व्यवहार. पण ज्ञानाच्या अवस्थेत हा भेद कोठून येणार? वाणीची शक्तीच जर देवी असेल, बोलणारा जीव तिच्याच चैतन्याने बोलत असेल आणि उच्चारला जाणारा शब्दही तिच्याच वाशक्तीचे प्रकटीकरण असेल, तर जप संपल्यानंतर देवी संपते आणि जल्प सुरू झाल्यावर संसार सुरू होतो, असे कसे म्हणता येईल? म्हणूनच येथे जल्पालाच जपाचे स्वरूप प्राप्त होते. याचाच अर्थ निरर्थक बोलणे किंवा असत्य बोलणेदेखील जप ठरते, असा नव्हे. उलट, ज्याची वाणीच देवीला समर्पित आहे, त्याच्या मुखातील प्रत्येक शब्दावर आत्मार्पणाचे संस्कार असणे अपेक्षित आहे.
 
‘शिल्पं सकलमपि मुद्राविरचना’ याचा अर्थ अधिकच गहन आहे. पूजेमध्ये हातांच्या विशिष्ट रचनांना ‘मुद्रा’ म्हणतात. त्या विधीचाच एक भाग असतात. पण, येथे केवळ पूजेच्या वेळी केलेल्या मुद्रा अभिप्रेत नाहीत. साधकाच्या हातून होणारे प्रत्येक शिल्प, प्रत्येक कर्म देवीच्या मुद्रेचेच स्वरूप धारण करते. हात फुले वाहतात, तेव्हाच ते पवित्र आणि तेच हात संसारातील कर्तव्य करतात, तेव्हा लौकिक हा भेद संपतो. ज्ञानयोग माणसाला कर्मत्याग शिकवत नाही; तो कर्मामधील कर्तृत्वाभिमानाचा त्याग शिकवतो. म्हणूनच, हात काम करीत राहतात, परंतु ‘हे मी करीत आहे,’ हा अहंकार हळूहळू विरघळतो.
 
‘गतिः प्रादक्षिण्यक्रमणम्’ ही कल्पना तर आणखीच विलक्षण. मंदिरातील देवतेभोवती फिरणे म्हणजेच प्रदक्षिणा. कारण, देवता मध्यभागी आहे आणि भक्त तिच्याभोवती फिरत आहे. परंतु ज्या साधकाला संपूर्ण विश्वच देवीचे स्वरूप दिसू लागले आहे, त्याने प्रदक्षिणा करायची तरी कुणाला? तो घरातून बाहेर पडला, रस्त्यावरून चालला, कार्यक्षेत्रात गेला किंवा पुन्हा घरी आला; तर त्याचे प्रत्येक पाऊल तिच्याभोवतीच पडणार आहे. त्यामुळे त्याची ‘गती’च ‘प्रदक्षिण्यक्रमण’ होते. देवालयाच्या प्रदक्षिणामार्गावर देवी आहे आणि संसाराच्या रस्त्यावर नाही, हा भेद अज्ञान आहे. सर्वत्र तिचेच अस्तित्व अनुभवणे हीच ज्ञानाची दिशा.
 
त्यानंतर ‘अशनाद्या आहुतिविधिः’ असे म्हटले आहे. भोजन ही सर्वांत सामान्य लौकिक क्रिया; पण तीच येथे यज्ञाची ‘आहुती’ होते. याचाच गूढार्थ भगवद्गीतेतील ‘ब्रह्मार्पणं ब्रह्म हविर्ब्रह्माग्नौ ब्रह्मणा हुतम्’ या ज्ञानयज्ञाशी जोडल्यास, अधिक स्पष्ट होतो. अर्पण ब्रह्म आहे, हवि ब्रह्म आहे, अग्नी ब्रह्म आहे आणि आहुती देणाराही ब्रह्म आहे अशी दृष्टी प्राप्त झाली, की यज्ञातील द्वैत संपते. ‘सौन्दर्यलहरी’तील या श्लोकात याच तत्त्वाचा जीवनव्यापी विस्तार दिसतो. भोजन करणारा, भोजनरूप अन्न आणि ते ग्रहण करणारी शरीरातील जीवनशक्ती, यांच्यात देवीचीच शक्ती कार्यरत असल्याची दृष्टी आली की, भोजनही यज्ञकर्म होते. त्यामुळेच येथे भोजनाचा त्याग नाही; भोक्तृत्वाच्या अहंकाराचा त्याग आहे.
 
‘प्रणामः संवेशः’ अर्थात शयनदेखील प्रणाम होतो. सामान्यतः देवतेसमोर शरीर झुकविणे, म्हणजेच प्रणाम आणि निद्रेसाठी शरीर आडवे करणे, म्हणजे शयन. परंतु, आत्मार्पणाच्या अवस्थेत शरीरही ‘माझे’ राहिलेले नसते. दिवसभर देवीच्या शक्तीने कार्यरत असलेले शरीर, शेवटी तिच्याच चरणी ठेवले जाते अशी अंतर्दृष्टी निर्माण झाली, तर निद्राही समर्पण होते. जागृतीमध्ये तिची सेवा आणि निद्रेत तिच्यापासून विलगता, असे दोन भाग उरत नाहीत. जीवनातील जागरण आणि विश्रांती दोन्ही तिचेच होतात.
 
यानंतर येणारे ‘सुखमखिलम्’ हे पद विशेष चिंतन करण्यासारखे आहे. अध्यात्म म्हणजे सुखाचा निषेध, संसाराचा त्याग किंवा प्रत्येक आनंदाबद्दल अपराधभाव निर्माण करणे, असा अर्थ येथे नाही. साधकाला प्राप्त होणारे सुखही देवीच्या सपर्येचे रूप होऊ शकते. पण, त्यासाठी पुढचा शब्द अत्यंत निर्णायक आहे, आत्मार्पण-दृशा. हा या संपूर्ण श्लोकाचा प्राण आहे. ‘मला जे सुख मिळेल, ते देवीची पूजा’ असा स्वैर अर्थ येथे अजिबात अभिप्रेत नाही. कारण सुखासकट संपूर्ण जीवन पूजा होण्यासाठी, प्रथम ‘आत्मार्पण’ घडले पाहिजे. भोगाची इच्छा, अहंकार आणि ‘माझ्यासाठी’ हा आग्रह जसाच्या तसा ठेवून प्रत्येक भोगाला ‘देवीची पूजा’ म्हणणे, म्हणजे या श्लोकाचा विपर्यास होईल.
 
‘आत्मार्पण-दृशा’ या पदामुळे हा श्लोक केवळ भक्तियोगाचा न राहता, ज्ञानयोगाच्या भूमिकेवर पोहोचतो. भक्तीच्या आरंभीच उपासक म्हणतो, ‘देवी, हे फूल मी तुला अर्पण करतो.’ पुढे तो म्हणतो, ‘माझे कर्म तुला अर्पण करतो.’ त्यापुढे-‘माझे जीवन तुला अर्पण करतो.’ पण आत्मार्पणाच्या सर्वोच्च अवस्थेत अर्पण करण्यासाठी एखादी वस्तू शिल्लक राहत नाही; अर्पण करणारा ‘मी’च अर्पित होतो. जोपर्यंत ‘मी कर्ता आहे, मी पूजा करतो आणि देवी माझी पूजा स्वीकारते,’ ही त्रिपुटी आहे, तोपर्यंत द्वैत शिल्लक आहे. ज्ञानाच्या परिपाकात हे कर्तृत्वाभिमानी ‘मी’पण विरघळू लागते. मग साधकाकडून घडणार्‍या क्रिया ‘माझ्या क्रिया’ न राहता, देवीच्या शक्तीचे विलसन म्हणून अनुभवास येतात.
 
या श्लोकाचा शेवट ‘सपर्या पर्यायस्तव भवतु यन्मे विलसितम्’ असा होतो. ‘सपर्या’ म्हणजे सेवा, पूजा, उपासना आणि ‘पर्याय’ म्हणजे दुसरे रूप. माझ्याकडून जे जे विलसित होते, प्रकट होते, घडते, ते सर्व तुझ्या सपर्येचे दुसरे रूप होवो. येथे ‘विलसितम्’ हा शब्दही अत्यंत अर्थगर्भ आहे. ‘मी करतो’ या कर्तृत्वप्रधान भाषेपेक्षा ‘माझ्यातून ते प्रकट होते,’ हा भाव त्यात जाणवतो. आणि हाच ज्ञानयोगाचा केंद्रबिंदू आहे. क्रिया थांबत नाही; क्रियेचा कर्ता म्हणून उभा असलेला अहंकार निवळत जातो.
 
या श्लोकाचा अर्थ संसार सोडून साधना करणे असा नसून, संसार आणि साधना यांच्यातील कृत्रिम भेदच संपविणे, असा आहे. ज्ञानप्राप्त साधकाला देव शोधण्यासाठी प्रत्येक वेळी देवघरात जावे लागत नाही; कारण देवघरातून बाहेर पडल्यावरही तो देवीच्या विश्वातून बाहेर पडत नाही. त्याची वाणी तिची, कर्मशक्ती तिची, गती तिची, प्राणशक्ती तिची आणि अनुभवणारे चैतन्यही तिचेच. म्हणूनच पूजा संपवून व्यवहार सुरू करण्याची वेळ त्याच्या जीवनात येतच नाही. साधनेच्या आरंभी जीवनामध्ये पूजा असते; ज्ञानाच्या परिपाकात जीवनच पूजा होते. प्रारंभी साधक देवीला म्हणतो, ‘हे माझे आहे आणि मी तुला अर्पण करतो.’ आत्मार्पण परिपूर्ण झाले की प्रश्नच बदलतो, ‘जेव्हा सर्व काही तुझेच आहे, तेव्हा अर्पण करणारा मी तरी तुझ्यापेक्षा वेगळा कुठे आहे,’ याच बिंदूवर, भक्ती आत्मसमर्पणात आणि आत्मसमर्पण ज्ञानात विलीन होते. ‘सौन्दर्यलहरी’चा हा श्लोक केवळ साधकाच्या अंतर्मनात घडणार्‍या अद्वैतदृष्टीचा उद्घोष आहे, साधक पूजा करीत नाही; त्याचे अस्तित्वच सपर्या बनते. (क्रमश:)
 
सुजीत भोगले
९३७००४३९०१




संबंधित मजकूर