मुंबई - Riteish Deshmukh Paach Futacha Bachchanकीर्तनातून प्रसिद्धीस आलेल्या एका तरुणीची गोष्ट सांगणाऱ्या 'पाच फुटाचा बच्चन' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सुप्रसिद्ध अभिनेते रितेश देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या दिमाखात लाँच करण्यात आला. चित्रपटाच्या टीजरला भरभरून मिळालेल्या प्रतिसादानंतर आता ट्रेलरमुळे चित्रपटाविषयी आणखी उत्सुकता निर्माण झाली असून, हा चित्रपट ९ ऑक्टोबरला रुपेरी पडद्यावर झळकण्यास सज्ज झाला आहे.
'पाच फुटाचा बच्चन' या चित्रपटात तरूण कीर्तनकार मुलीची गोष्ट आहे. तिच्या कीर्तनात कोल्हापुरी भाषा आहे. संतांचे अभंग तिला मुखोद्गत आहेत. जनमानसात तिचं प्रचंड नाव आहे. उंचीने पाच फूट असलेल्या या तडफदार मुलीला 'पाच फुटाचा बच्चन' म्हणून ओळखलं जातं. या प्रमुख भूमिकेतून श्रुती मधुदीप ही अभिनेत्री पदार्पण करत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. यात तगड्या कलाकारांची फौज आहे. मराठी मनाला भावणाऱ्या कीर्तन या विषयाला हा सिनेमा साद घालतो आहे, असं दिसतं आहे. अवघ्या अडीच मिनिटाचा हा ट्रेलर अत्यंत नाट्यमय असून त्यातील दृश्यांनी प्रेक्षकांची मने खिळवून ठेवली आहेत. या चित्रपटात नेमकं काय घडणार आहे, याची उत्सुकता आता शिगेला पोचली आहे.मूळ प्रायोगिक एकपात्री नाटकातून मांडण्यात आलेल्या या गोष्टीला प्रेक्षकांचा तूफान प्रतिसाद मिळाला होता. मराठी मनाची नस पकडेल अशा या नाटकाचे चित्रपटात रूपांतर झाले आहे. नाटकातून चित्रपटात रूपांतर होण्याच्या या दैदीप्यमान यादीत या चित्रपटाचे नाव जोडले गेल्याने या चित्रपटाविषयीचं कुतूहल वाढलं आहे.Riteish Deshmukh Paach Futacha Bachchan
सुप्रसिद्ध अभिनेते रितेश देशमुख म्हणाले, बच्चनच्या बाजूला उभे राहणं मग ते सहा फुटाचा असो किंवा पाच फुटाचा मला ही थोडी धाकधूक होती. महाराष्ट्राची संस्कृती जपणारा, पुरोगामी विचार पुढे घेऊन जाणारा हा "पाच फुटाचा बच्चन" चित्रपट आहे हे ट्रेलर पाहिल्यावर लक्षात येते. पहिला चित्रपट जेव्हा आपण बनवतो तेव्हा आपल्याला माहित नसत की तो कसा होतो आहे पण महत्वाचं असत ते आपल्याला मिळणारी लोकांची साथ जी अतिशय महत्वाची असते आणि मला वाटत की तुम्हाला ती लाभली आहे.Riteish Deshmukh Paach Futacha Bachchan
राहुल कर्णिक आणि ऑर्फियस स्टुडिओज यांनी पाच फुटाचा बच्चन या चित्रपटाची निर्मिती केली आहे. कौस्तुभ रमेश देशपांडे यांनी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटात श्रुती मधुदीप, गौरी नलावडे, शशांक शेंडे, चिन्मयी सुमित, क्षितिश दाते, पुष्कराज चिरपुटकर, आशय कुलकर्णी, ओमप्रकाश शिंदे, समीर पाटील, विनोद वणवे यांच्या भूमिका आहेत. अभिषेक शेटे यांनी छायांकन, सौरभ प्रभुदेसाई यांनी संकलन, निरंजन पेडगावकर यांनी संगीत, तर प्रदीप आवटे यांनी गीतलेखनाची जबाबदारी निभावली आहे.Riteish Deshmukh Paach Futacha Bachchan
चित्रपटाचा टीजर तसेच आकर्षक शीर्षकामुळेच या चित्रपटाविषयी उत्सुकता वाढली आहे. आता ट्रेलरमुळे चित्रपटाच्या मनोरंजक तरीही विचार करायला लावणाऱ्या गोष्टीचा एक अंदाज येत आहे. गोष्टीची मांडणी, उत्तम अभिनयाचं दर्शनही घडतं. आजच्या तरुणाईचं प्रतिनिधित्त्व करणाऱ्या, तरुणांच्या विचारांचा वेध घेणाऱ्या, तरीही मूल्यात्मक जीवनाचं महत्व सांगणारा हा चित्रपट ९ ऑक्टोबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. नव्या जुन्या कलाकारांचा कसदार अभिनय आणि वेगळ्या धाटणीच्या या गोष्टीला बॉक्स ऑफिसवर दमदार प्रतिसाद मिळेल यात शंका नाही!Riteish Deshmukh Paach Futacha Bachchan