|| गीतासार भाग २७ ||

    01-Oct-2026

Gita Saar 
 
वेदव्यासांच्या महाभारत कथांमधील सत्याशय लावताना जेथे बुद्धिदेवता गणेशांनाही खोल चिंतन करावे लागले, तेथे सर्वसामान्यांची काय कथा? इतरांच्या गहन विचारांतीही लक्षात न येणारे आध्यात्मिक रहस्य सुलभ कथारूपांनी लिहिताना, व्यासांना ते सहजपणे कसे सुचले, याचेच आश्चर्य वाटते. धन्य ते व्यास आणि धन्य तो काळ, ज्यावेळी महाभारतातील असा गहन ‘व्यासार्थ’ तेव्हाचा समाज समजत असेल! यावरूनच व्यासकालीन समाज आजचपेक्षाही बुद्धिमान असावा, याची साक्ष पटते आणि व्यासांसकट त्याकाळच्या सर्व समाजास हात जोडले जातात.
 
उत्तर गोग्रहण युद्धातील संमोहनास्त्र आणि वस्त्रहरण
 
उत्तर गोग्रहणात उत्तेरकडून चाल करून येणार्‍या कौरव सैन्याशी तोंड देण्याअगोदर, दक्षिणेकडून विराट नगरीवर हल्ला करणार्‍या त्रिवर्ग राजाबद्दल समजण्यासाठी आपल्याला व्यासांप्रमाणे विचार करावा लागेल. विराट नगरीची दक्षिण दिशा म्हणजे, साधकाच्या साधनाकालातील दक्षिण म्हणजे अपक्व पूर्वावस्था होय. असल्या अर्ध कच्च्या अवस्थेत, साधकातील त्रिवर्गरूप तीन वृत्ती आपल्या पिंडरूप विराट अस्तित्वाशीच बंड करून युद्ध करु पाहतात. ‘सत्त्व, रज, तम’ या तीन वृत्ती, अपरिपक्व साधनेच्या दक्षिण काळात पिंडरूप विराट नगरीवर दक्षिण बाजूने हल्ला करतात. त्यांचा बिमोड करण्याकरिताच, साधकातील विराट राजाला सामोरे जावे लागते. राजा विराट अशा तर्‍हेने साधनेतील दक्षिण अवस्थेत त्रिवर्ग राजाकडून म्हणजे, तीन वृत्तींच्या आक्रमक अवस्थांना शांत करण्याकरिताच दक्षिण द्वारावर त्रिवर्गाशी झुंजतो. इतयातच उत्तर द्वारावर कौरव सेना गोग्रहण करण्याकरिता येऊन ठेपते. त्रिवर्गाशी (तीन वृत्ती) झुंज देण्यात राजा विराट व्यग्र होता. अशा अडचणींच्या वेळी, उत्तर दिशेवर दुर्योधन आणि त्याचे अभिनिवेशी कौरव, विराट राजाच्या राजधानीवर गोग्रहण करण्याचा घाट घालतात. परंतु साधकाच्या उत्तर साधनावस्थेत पूर्ण तयार असलेला अर्जुन बृहन्नडा रूपाने, त्या कौरव सेनेचा पाडाव करून सर्व कौरव सेनेलाच संमोहित करतो. नंतर संमोहित सेनेची सर्व वस्त्रे काढून त्यांना नग्न, म्हणजेच वृत्तिहीन करतो. एक तर त्या काळी घरोघरी भरपूर गोधन असताना, केवळ गायींना पळविण्यासाठी दुर्योधनाने हल्ला का करावा? शमी वृक्षावर एका शवाखाली अर्जुनाने आपली शस्त्रास्त्रे ठेवली. कोणतेच शव चार दिवसांच्या वर तसेच राहू शकत नाही. एका वर्षानंतर ते शव तसेच सापडणे अगदीच अशय. शिवाय, एकटा अर्जुन बृहन्नडेच्या रूपाने सहस्रावधी शूर कौरव सैन्याशी आणि कर्ण, भीष्म, कृप, द्रोण, अश्वत्थामा आदी अतिरथींशी युद्ध करून त्यांना जिंकणेही अशय.
 
अर्जुनाने संमोहास्त्र टाकल्यावर संमोहित कौरवांची वस्त्रे एकटा उत्तर काढतो, असे म्हटले आहे. दुसर्‍यांच्या वापरलेल्या वस्त्रांचे अर्जुन काय करणार होता? शिवाय, सहस्रावधी कौरवांची वस्त्रे एकटाच उत्तर काढणेही असंभवच. एकेका कौरवाला १५-२० मिनिटे धरल्यास, सहस्रावधी कौरवांची वस्त्रे न थकता व न थांबता काढण्यास उत्तराला अनेक महिने लागले असते! परंतु वरील प्रकारचा सामूहिक वस्त्रहरणाचा खेळ उत्तराने एका घटकेत उरकला; यावरूनच ‘वस्त्रहरण’ म्हणजे ‘वृत्तिहरण’ असले पाहिजे. संस्कृत काव्यात वृत्तींना वस्त्रांची उपमा देतात. वस्त्र जसे शरीराला झाकते, तद्वत् वृत्ती चित्ताला. कौरव वृत्तीचे असे वस्त्रहरण उत्तर एका घटकेत करू शकतो. वृत्तिशून्य झाल्याशिवाय, निर्विकल्प समाधी अवस्था प्राप्त होणे शक्यच नाही.
 
गोग्रहणाची घटना नेमकी विजयादशमीला घडली, असे म्हणतात. भगवान श्रीरामचंद्रांनीसुद्धा रावणाला याच दिवशी मारले. मग हे विजयादशमीचे मुहूर्त कोणते? साधकाने साधनाकाळात आपले वृत्तियुद्ध जिंकल्यानंतर, त्यांची पाच कर्मेंद्रिये आणि पाच ज्ञानेंद्रिये अशा एकूण दहा इंद्रियांवर साधक विजय मिळवितो. म्हणूनच साधनाकाळात वृत्तियुद्ध केल्यावर, साधक आपल्या दश इंद्रियांवर जो विजय मिळवितो, त्यालाच वेदव्यास व वाल्मीकी ‘विजयादशमी’ म्हणतात. असल्या वृत्तियुद्धात अर्जुनाकडून जय प्राप्त झालेल्या विराट राजाने, महाभारत युद्धात पांडवांचा पक्ष घेतल्यास नवल नाही.
 
अर्जुनाने विराट नगरीवरचा असा प्रखर कौरवी हल्ला विफल केल्याने, विराट राजा अर्जुनावर प्रसन्न झाला. त्याने आपली पुत्री उत्तरा हिला अर्जुनाला देण्याचे ठरविले. परंतु, अर्जुन आर्य संस्कारात वाढल्याने, त्याने विराटाची वरील विनंती मान्य केली नाही. कारण उत्तरेला त्याने शिष्या मानून नृत्य, संगीत शिकवल्याने, आपल्याच शिष्येशीच लग्न करून तिच्यासोबत पत्नीसारखा व्यवहार करायचा काय? पण यातून मार्ग काढत, शेवटी अर्जुनाने आपला पुत्र अभिमन्यूचा उत्तरेचा विवाह लावला. म्हणजे अभिमन्यू नामक साधक अवस्था आता साधनेतील उत्तर वा उन्नत अवस्थेत गेली, असाच वरील कथेचा आशय असला पाहिजे. व्याही असलेला असा विराट राजा महाभारतात, पांडवांचा पक्ष घेऊन वृत्तिरूप कौरवाशी लढण्यास तयार होतो. पांडवांना वृत्तिरूप महाभारत युद्धात साथ देणारे सर्वजण, असेच सद्वृत्तीचे वृत्तिरूप साधक होत. तर, कौरव पक्षाला त्या युद्धात साथ देणारे सर्व लोक कुवृत्तिरूप दुर्जन.
 
द्रुपद
 
पंच पांडवांची पत्नी द्रौपदी हिचा पिता द्रुपद. याच द्रुपदाचा पुत्र धृष्टद्युम्न होय, ज्याने प्रथम दिवशी पांडवसेनेची व्यूहाकार रचना केली. कथा मोठी विचित्रच आहे. कौरव-पांडवांना शस्त्रास्त्रविद्या शिकविणारे राजगुरू म्हणजे द्रोणाचार्य होत. कौरव-पांडवांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर, द्रोणाचार्यांनी कौरव-पांडवांजवळ दक्षिणा मागितली. इतर सर्व शिष्य द्रोणाचार्यांना धनाची दक्षिणा द्यायला तयार होते; परंतु द्रोणाचार्यांना धनाची दक्षिणा नको होती. पांचाल देशाचा राजा द्रुपदाला युद्धात जिंकून, त्याला एखाद्या गुलामासारखे आपल्यासमोर आणण्याची दक्षिणा द्रोणाचार्य मागू लागले. द्रुपदासारख्या पराक्रमी अतिरथी राजाला, त्याच्या सहस्रावधी चतुरंग सेनेला युद्धात हरवून, जिंकून एखाद्या गुलामासारखे द्रोणाचार्यांसमोर उभे करणे गंमत होती काय? कौरव-पांडवरूप बालके हे अचाट कृत्य कसे करणार? शेवटी कोणीच तयार होत नाही, असे पाहून गुरू द्रोणाचार्यांनी आपली दक्षिणापूर्ती करण्यास वीर अर्जुनाला सांगितले. स्वसामर्थ्याने अर्जुनाने एकटे लढून द्रुपदाला युद्धात जिंकून, त्याला एखाद्या गुलामाप्रमाणे गुरू द्रोणाचार्यांसमोर उभे केले आणि आपली गुरूदक्षिणा द्रोणाचार्यांना समर्पित केली. सहस्रावधी चतुरंग सेना असलेल्या पराक्रमी द्रुपद राजाला एकट्या किशोर वयाच्या अर्जुनाने हरवून, त्याला एखाद्या गुलामासारखे द्रोणाचार्यांसमोर उभे करणे शक्य आहे काय? यावरूनच वरील कथेत, अन्य व्यास आध्यात्मिक रहस्य असले पाहिजे, हे उघड आहे.
 
 
योगिराज हरकरे
(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)
९७०२९३७३५७




संबंधित मजकूर