दिल्लीतील वाहतूक व्यवस्थापन होणार स्मार्ट; १,७८९ कोटींच्या ‘इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम’ला मंजुरी

 
Delhi Intelligent Traffic Management System
 
मुंबई(Delhi Intelligent Traffic Management System): राजधानी दिल्लीतील वाहतूक कोंडीवर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीच्या बैठकीत दिल्ली पोलिसांच्या इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम प्रकल्पाला १,७८९.५२ कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली. हा प्रकल्प २४ महिन्यांत तीन टप्प्यांत राबविला जाणार असून त्यानंतर पाच वर्षे देखभाल व संचालन केले जाणार आहे. (Delhi Intelligent Traffic Management System)
 
या प्रकल्पांतर्गत दिल्लीतील ४२ प्रमुख वाहतूक मार्गिकांचा समावेश करण्यात येणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रिअल-टाइम वाहतूक माहितीच्या आधारे सिग्नलचे नियंत्रण केले जाईल. त्यामुळे वाहतुकीच्या स्थितीनुसार सिग्नलची वेळ आपोआप बदलून कोंडी आणि अनावश्यक विलंब कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. दिल्लीमध्ये सध्या सुमारे ७१ लाख सक्रिय नोंदणीकृत वाहने आहेत. वाहनसंख्येच्या तुलनेत रस्ते पायाभूत सुविधांचा विस्तार कमी असल्याने उपलब्ध रस्त्यांचा अधिक कार्यक्षम वापर करण्यासाठी ही यंत्रणा उपयुक्त ठरणार आहे. (Delhi Intelligent Traffic Management System)
 
या नव्या प्रणालीमुळे रुग्णवाहिका आणि अन्य आपत्कालीन वाहनांसाठी ‘ग्रीन कॉरिडॉर’ उपलब्ध करून देणे शक्य होईल. वाहतूक कोंडी, अपघात किंवा रस्त्यावरील अन्य घटनांची रिअल-टाइम माहिती मिळाल्याने दिल्ली पोलिसांना तातडीने वाहतूक वळविता येणार आहे. या प्रकल्पांतर्गत १,०९२ अॅडॅप्टिव्ह ट्रॅफिक कंट्रोल सिस्टिम आणि १,०२९ अंमलबजावणी केंद्रे उभारली जातील. लाल सिग्नल तोडणे, वेगमर्यादा ओलांडणे, चुकीच्या दिशेने वाहन चालवणे, हेल्मेट व सीटबेल्टचा वापर न करणे, बेकायदा पार्किंग आणि वाहन चालवताना मोबाईल वापरणे यांसारख्या उल्लंघनांवर स्वयंचलित कारवाईला बळ मिळणार आहे. वाहतूक नियंत्रण केंद्रांद्वारे सिग्नल, अंमलबजावणी आणि नागरिकांना माहिती देण्याची व्यवस्था एकाच प्लॅटफॉर्मवर आणली जाणार आहे. रस्त्यावरील वाहतूक, वळण मार्ग, पार्किंगची उपलब्धता याबाबत माहिती डिजिटल फलक आणि इतर माध्यमांतून नागरिकांना मिळेल. दिल्ली पोलिस हा प्रकल्प राबवणार असून सी-डॅक तांत्रिक सल्लागार म्हणून काम करणार आहे. (Delhi Intelligent Traffic Management System)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर